जळगाव – गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कापसाची फरदड घेऊ नका, असे आवाहन कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. फरदड कपाशीला सिंचन केल्याने पाते, फुले व बोंडे लागण्यात अनियमितता येऊन गुलाबी बोंड अळीला तसेच मावा, तुडतुडे, पांढऱ्या माशीला खाद्य उपलब्ध होते. पर्यायाने गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आणखी मोठ्या प्रमाणावर होतो.
डिसेंबर महिन्यात कपाशीच्या काड्यांमध्ये अळी सुप्त अवस्थेत जाण्याची शक्यता आहे. पुढील हंगामात अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशीच्या शेतीतील अवशेष नष्ट करणे आवश्यक आहे. डिसेंबरनंतर कपाशीचे पीक ठेवल्याने बोंड अळीच्या वाढीसाठी बोंड सतत उपलब्ध होतात. त्यामुळे वाढीस आणखी चालना मिळते. अळीच्या जीवनक्रमाच्या संख्येत यामुळे वाढच होते, असे कृषी विभागातर्फे सांगण्यात येत आहे.
… यामुळेही फरदड घेऊ नका
फरदड कपाशीमध्ये लागणाऱ्या बोंडाचे पोषण चांगले होत नाही. त्यामुळे रुईचा उतारा घटून कापसाला बाजार भाव कमी मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
कापसाचे शेत किमान 6 महिने कापूस विरहित ठेवा
बीटी प्रथिनांचे प्रमाण कमी होऊन प्रतिकारकता निर्माण होते. डिसेंबर महिन्यानंतर शेत पुढील पाच ते सहा महिने कापूस पीक विरहित ठेवल्यास अळीचा जीवनक्रम संपुष्टात येईल. त्यामुळे पुढील हंगामात तिचा प्रादुर्भाव आपोआपच कमी होतो. डिसेंबरनंतर खाद्य उपलब्ध नसल्यास ती सुप्तावस्थेत जाते. या कारणास्तव कपाशीची फरदड घेऊ नये.
कापूस पिकाचा भुगा करून त्याचा खत म्हणून वापर करावा
कापूस पिकाच्या अवशेषांचा भुगा करणाऱ्या यंत्रांचा (श्रेडरचा) वापर करावा व ते सेंद्रिय खतांमध्ये रुपांतरित करावे. पीक काढणीनंतर खोल नांगरटी करून जमीन चांगली तापू द्यावी. पीक काढणीनंतर कपाशीच्या काड्या व्यवस्थित न उघडलेली कीडग्रस्त बोंडे व पालापाचोळा नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे.