पृथ्वीच्या दक्षिणेकडच्या अगदी शेवटच्या टोकाला असलेलं गाव अशी ‘प्युर्टो विल्यम्स’ची ओळख आहे. कोणत्याही देशाच्या सीमेवर राहणाऱ्या लोकांबद्दल, गावांबद्दल आपल्याला मोठं कुतूहल असतं. हे तर पृथ्वीच्या शेवटच्या टोकावरचं गाव. खऱ्याखुऱ्या अर्थानं ‘एंड ऑफ द वर्ल्ड.’ या विलक्षण गावाची ही रंजक माहिती.
प्युर्टो विल्यम्स च्यापुढे कोणतंही गाव, मनुष्यवस्ती काहीसुद्धा नाही. फक्त पाणी, पाणी आणि पाणी… पृथ्वीचं दक्षिणेकडचं अखेरचं टोक मानलं जाणारं प्रसिद्ध ‘केप हॉर्न’ हे या गावापासून बोटीनं अवघ्या पाच-सहा तासांच्या अंतरावर. खऱ्याखुऱ्या अर्थानं ‘एंड ऑफ द वर्ल्ड.’ अंटार्क्टिकाला दक्षिणेच्या टोकाला शेवटी एक नाव दिसून येतं ‘प्युर्टो विल्यम्स.’ हे अगदी छोटं गाव, चिली देशात असून, तिथं त्या देशाचा नाविक तळही आहे. हे गाव म्हणजे खऱ्या अर्थानं ‘एंड ऑफ द वर्ल्ड.’
येथील तापमान ३- ४ अंश सेल्सिअस! थंडगार वारे. सुमारे अडीच ते तीन हजार लोकवस्तीच्या या गावात नाविक दलाचे सैनिक-त्यांचे कुटुंबीय यांच्याबरोबरच स्थानिक नागरिकांची संख्याही बऱ्यापैकी आहे. हे गाव थोडं उंचावर आहे. मध्यवर्ती ठिकाणी शाळेची इमारत, त्याच्या आजूबाजूला छोटी छोटी एकमजली घरं, मुख्य चौकातच माहिती कार्यालय आणि पोस्ट ऑफिस. जगाच्या नकाशावरचं अगदी शेवटचं पोस्ट ऑफिस आणि माहिती कार्यालय. पोस्ट ऑफिसमधून विविध देशांमधल्या आपापल्या गावांना पोस्टकार्ड पाठवण्यासाठी पर्यटकांची येथे चांगलीच रांग लागते.
यासर्व भागांत स्पॅनिशचं वर्चस्व. ग्रामीण भागांत तर स्पॅनिशला पर्यायच नाही. इंग्लिश बोलणारे, समजणारे फार फार कमी लोक. मासेमारी हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. तरुणवर्ग इथं राहणं फारसं पसंत करत नाही. गॅसपासून प्रत्येक गोष्ट कमालीची महाग. कारण इथं काहीच पिकत नाही, तयार होत नाही. इथून २९७ किलोमीटर अंतरावर असलेलं पुंटा ऐरेनास हे सर्वांत जवळचं मोठं शहर. सर्व गोष्टी तिथूनच आणाव्या लागतात. आता इथं एक छोटं सार्वजनिक आणि नाविक दलाचं हॉस्पिटल आहे. अन्यथा थोड्या मोठ्या आजारपणासाठीही पुंटा ऐरेनास हाच पर्याय. तिथं जाणं फार खर्चाचं. प्युर्टो विल्यम्स इथं छोटं विमानतळ आहे. पुंटा ऐरेनास ते प्युर्टो विल्यम्स अशी विमानाची जाऊन-येऊन रोज एक फेरी असते. सव्वा तासाचा प्रवास; पण त्यासाठी १,२१,००० चिलियन पेसो म्हणजे सुमारे २०० अमेरिकन डॉलर्स मोजावे लागतात. सर्वसामान्यांना ते परवडणारं नाही. वैद्यकीय आणीबाणी असेल, तर सरकार सहा हजार पेसोची म्हणजे अवघ्या १० डॉलर्सची सवलत देतं. बोटीच्या प्रवासासाठी साधारणत: २८ तास लागतात आणि ती आठवड्यातून एकदा असते.
या गावचा कारभार केप हॉर्न्स म्युन्सिपाल्टी अँड प्रोव्हेंशिअल गर्व्हनन्सतर्फे चालवला जातो. गावात एक बँक, एक शाळा आणि एक एटीएम अशा सोयी आहेत. सॅटेलाईट टेलिफोन आणि इंटरनेट सर्व्हिस उपलब्ध आहे; पण ही सेवा हवामानवर अवलंबून असते. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन, स्थानिक नागरिकांनी चौकात छोटी छोटी दुकानं थाटली आहेत. त्यात टी-शर्ट, टोप्या आणि अन्य काही वस्तू विक्रीसाठी असतात. इथल्या खाद्यपदार्थांत ‘किंग क्रॅब’ हा सर्वांत लोकप्रिय आणि सहज उपलब्ध होणारा पदार्थ.
येथे सन १९५३ मधलं एक सर्वांत जुनं घर मुद्दाम जतन करून ठेवण्यात आलं आहे. ते बंदराच्या समोर असून, गावात आलेल्यांना ते आवर्जून दाखवलं जातं. प्युर्टो विल्यम्स गावाच्या अगदी मध्यभागी एक स्मारक उभारण्यात आलं आहे. ‘येल्चोकटर’ या चिलियन बोटीच्या पुढच्या भागाची ती भव्य प्रतिकृती असून, तिथं लिहिलेल्या मजकुरावरून, या बोटीची आणि ती चालवणाऱ्या ल्युईस पार्डो या चिलियन नाविक दलाच्या खलाशाची महान कामगिरी समजून येते.
प्युर्टो विल्यम्स हे पृथ्वीवरील दक्षिणेकडचं सर्वांत अखेरचं छोटं गाव. हे गाव १९५३ मध्ये वसलं. आयरिश खलाशी ज्युएन विल्यम्स यानं या जागेची सर्वप्रथम नोंद केली. त्यामुळे त्याच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आलं. प्रशांत आणि अटलांटिक महासागरांतल्या लष्करी वाहतुकीच्या दृष्टीनंही हे महत्त्वाचं बंदर मानण्यात येतं. तसंच अंटार्क्टिका प्रदेशामुळे चिलियन देशाच्या राजकारणात त्याचं स्थान मोठं आहे.
प्युर्टो विल्यम्स गाव अगदी चिमुकलं आणि अपरिचित असं आहे. तिथल्या सोयी खूपच मर्यादित आहेत; पण जगाच्या नकाशावरच्या दक्षिणेकडच्या खऱ्याखुऱ्या अर्थानं अगदी शेवटचं गाव म्हणून त्याचा परिचय आणि आकर्षण हळूहळू वाढत आहे. अंटार्क्टिकाच्या १८-२० दिवसांच्या सफरीवर नेणाऱ्या क्रुझेस आता प्युर्टो विल्यम्सला थांबू लागल्या आहेत. त्यांचा जवळजवळ एक दिवसाचा मुक्काम इथं असतो. क्रुझ लागली, की त्यातले तीनशे-चारशे प्रवासी दिवसभर त्या चिमुकल्या गावात फिरत असतात. ते सारं गाव गजबजून जातं. दुकानांमध्ये घेणाऱ्यांची गर्दी, पोस्टात कार्ड पाठवणाऱ्यांच्या रांगा लागतात; पण हे सर्व हवामानावर अवलंबून असतं. क्षणाक्षणाला निरनिराळी रूपं दाखवणारा निसर्ग. कधी कधी इतका पाऊस, कडाक्याची थंडी आणि पन्नास-साठ किलोमीटरच्या वेगानं वाहणारे वारे… मग पर्यटकांना क्रुझबाहेर न जाण्याच्या सूचना देण्यात येतात. त्या वेळी गावात एकदम शांतता असते. चिलियन नाविक दलाचा हा महत्त्वाचा तळ असल्यानं काही हालचाली मात्र दिसून येतातच. पृथ्वीच्या नकाशावरचं दक्षिणेकडचं अखेरचं टोक असलेल्या प्युर्टो विल्यम्सला भेट देण्याचा रोमांचकारी अनुभवही आयुष्यात एकदा तरी अनुभवलाच पाहिजे…