पुणे : रब्बी हंगामातील ज्वारी, मका, हरभरा याचा पेरा जवळपास पूर्ण झाला असून या पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. ही अळी पिकांसाठी नुकसानकारक असते. सुरवातीच्या अवस्थेत ही अळी पानांवर उपजीविका करतात. नंतर पोंग्यात शिरून आतील भाग खातात. काही वेळा मक्यासारख्या पिकांवर कीड कणसावरील केस तसेच कोवळी कणसे खातात. त्यामुळे नुकसानकारक असलेल्या लष्करीअळीचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे.
सोयाबीनचा पेरा फायदेशीर
पावसामुळे रब्बी हंगाम लांबणीवर पडलेला आहे. त्यामुळे आता उन्हाळी सोयाबीनचा पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. १५ जानेवारीपर्यंत पोषक वातावरण असल्याने उन्हाळी सोयाबीनचा पेरा फायदेशीर राहील असे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पेरणीपूर्वी बियाणास ३ ग्रॅम कार्बोक्सीन अधिक थायरम ३७.५ टक्के किंवा पेनफ्लुफेन १३.२८ टक्के, १ मिली किंवा थायोफिनेट मिथाईल अधिक पायराक्लोस्ट्रोबिन ३ मिली प्रति किलो बियाणे या बुरशीनाशकाची फवारणी करावी लागेल. त्यामुळे पेरणीनंतर सोयाबीन बहरात येईपर्यंत कोणत्या कीडीचा प्रादुर्भाव होणार नाही.
असा रोखावा प्रादुर्भाव
पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील मका आणि ज्वारी ही बहरात आहेत. मात्र, मध्यंतरीच्या वातावरणामुळे लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के, एसजी ग्रॅम ६ किंवा थायमिथॅाक्झाम १२.६ टक्के अधिक लॅमडा साहलोथ्रीन ९.५ टक्के झेडसी संयुक्त कीटकनाशक ५ मिली किंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी, ४ मिली किंवा स्पायनोटोरम ११.७ एस सी, ५ प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागणार आहे.