पावसाची चाहूल येताच मुंग्यांची रांग जशी आपली अंडी घेऊन धावताना दिसते, तशी जावळीच्या रानातून प्रतापगडाकडं माणसांची वर्दळ चालू होती. राजरस्त्यानं घोड्यांची पथकं धावत होती. असंख्य मावळे पायवाटेनं गडाकडं जात होते. प्रत्येकाजवळ कोणतं ना कोणतं शस्त्र दिसत होतं.
बाजीप्रभू आपल्या पथकासह दौडत प्रतापगडाकडं जात होते. महाबळेश्वरचा डोंगर ओलांडला आणि प्रतापगडाकडं पाहून ते चकित झाले. एखाद्या जत्रेचं स्वरूप प्रतापगडाला आलं होतं. जिकडं बघावं, तिकडं मावळे दिसत होते.
प्रतापगडाच्या पहिल्या दरवाज्याशी बाजी पायउतार झाले.
बाजी, फुलाजी, यशवंता यांचं स्वागत नेताजी पालकरांनी केलं.
बाजी नेताजींना म्हणाले,
‘काका, काय बेत आहे?’
‘बेत कसला?’ नेताजी म्हणाले, ‘संकट मोठं आलंय्. अफजलखानाचा तळ वाईला पडलाय्. त्यापायी राजांनी सारी शिबंदी प्रतापगडावर गोळा केलीय्.’
‘अस्सं!’ बाजी म्हणाले.
दोघे बोलत गडावर गेले. वाड्याकडं जाताना बाजींच लक्ष चौफेर फिरत होतं.
गडाच्या केदारेश्वराचं दर्शन घेऊन सारे राजवाड्याकडं गेले.
राजवाड्याच्या चौकात मावळे गोळा झाले होते.
बाजी, फुलाजी वाड्यात गेले. राजे नौगाजीत बसले होते. येसाजी, तानाजी, बहिर्जी, मोरोपंत, सुर्याजी, ही मंडळी राजांच्या भोवती आदबीनं उभी होती. कान्होजी जेधे राजांच्या उजव्या बाजूला उभे होते.
बाजींच्या आधीच बांदल देशमुख राजांच्या सामोरे उभे असलेले पाहून बाजींना समाधान वाटलं. राजांचं लक्ष बाजींच्याकडं जाताच राजे म्हणाले,
‘या बाजी, फुलाजी! आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. केवढी शिबंदी घेऊन आलात?’
‘सातशे!’
‘ठीक!’ राजांनी समाधान व्यक्त केलं.
रात्री सर्वांची पंगत बसली. सारे मानकरी, मावळे राजांच्या मांडीला मांडी लावून एका पंगतीत बसले होते. राजांच्या उपस्थितीमुळं वाढलेली भाजी-भाकर सुद्धा सर्वांना मेजवानीसारखी वाटली.
रात्री खलबतखान्यात नेताजी, बाजी, फुलाजी, तानाजी, येसाजी, बहिर्जी, मोरोपंत वगैरे मंडळी जमा झाली होती. साऱ्यांचं लक्ष शिवाजी राजांच्याकडं लागलं होतं.
‘आमचे गोपिनाथपंत खानाशी बोलणी करीत आहेत. खानांनी आम्हांला वाईला बोलावलं आहे.’
‘मग जाणार?’ बाजींनी विचारलं.
‘कुणी सांगावं! कदाचित जावंही लागेल.’ राजे म्हणाले.
बाजींच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
‘का हसलात, बाजी?’ राजांनी विचारलं.
‘आपणहून वाईच्या छावणीत आपण जाल, असं वाटत नाही.’ बाजींनी सांगितलं.
‘खान साधा आलेला नाही. वीस हजारांची फौज आहे. शेकडो तोफा, दारूगोळा आणि अगणित संपत्ती घेऊन तो आमच्या पारिपत्यासाठी वाईत तळ देऊन बसला आहे. त्याच्यापुढं आमची ताकद कुठंच लागत नाही.’
‘सलूख करावा!’ मोरोपंत म्हणाले.
‘सलूख! मग आजवर येवढी धडपड केली, ती कशासाठी? आमच्या शब्दाखातर ज्यांनी जीव वेचले, त्याला कोण जबाबदार?’ राजे निश्चयानं म्हणाले, ‘नाही. खानास मारल्याविना राज्य साधणार नाही. एक त्यांनी तरी रहावं; नाहीतर आम्ही!’
‘एकदम येवढ्या निकराला जाण्यापेक्षा…’ जेधे म्हणाले.
त्यांना वाक्य पुरं करू न देता राजे म्हणाले,
‘जेधेकाका, आपण वयानं, मानानं मोठे! आम्ही निकराला जात नाही. गेले आहेत अफजलखान. चढे घोड्यानिशी आम्हांस पकडून नेणार आहेत. ती त्यांची प्रतिज्ञा आहे.’
‘वाट बघ, म्हणावं!’ बाजी म्हणाले.
‘वाट बघतच तो वाईला बसला आहे. बाजी, यापुढं अनेक संकटं आम्हांवर येणार आहेत. ती एकापेक्षा एक अशी वरचढ असणार. त्यांना सामोरं जायला आपलं बळ वाढवायला हवं! खान आपल्या पावलांनी आला आहे. खानानं आणलेल्या तोफा, हत्ती, घोडदळ, बाडबिछायत आणि संपत्ती हे सर्व मिळायला हवं. तसं झालं, तर एका रात्रीत आपले मावळचे बारा गडकोट मातब्बर बनतील. हा डाव हरुन चालणार नाही.’
राजांच्या त्या विश्वासपूर्ण बोलण्यानं साऱ्यांच्या मनात उत्साह संचारला होता.
नेताजी म्हणाले,
‘आज्ञा झाली, तर खानाच्या छावणीवर चालून जाऊ.’
‘मुळीच नाही. कोणत्याही उपायानं खान वाई सोडून जावळीत उतरायला हवा.’
‘उतरेल?’ बाजींनी विचारलं.
‘बघू!’ म्हणत राजे उठले.
साऱ्यांनी राजांना मुजरे केले आणि निरोप घेतला.
राजांचं भाकीत खरं ठरलं. खान जावळीच्या खोऱ्यात राजांना भेटायला येणार, हे निश्चित झालं. त्या बातमीनं साऱ्यांना आनंद झाला होता. पण बाजी मात्र चिंताग्रस्त होते.
एके दिवशी धीर करून त्यांनी राजांच्यापुढं चिंता व्यक्त केली,
‘राजे, खान फौज-फाटा घेऊन येणार, म्हणे!’
राजांच्या चेहऱ्यावरचं स्मित ढळलं नाही.
‘बाजी, तो आपल्या सर्व ताकदीनुसार येणार आहे. त्याच्या संगती घोडदळ, हत्ती, उंट, शेकडो तोफा असणार, यात शंका नाही.’
‘येवढी फौज आणण्याचा हेतू?’
‘सरळ आहे. झाला, तर तह. म्हणजे आमची कैद. ते जमलं नाही, तर लढाई. खान थोर सेनापती आहे. वाईत बसून काही होणार नाही, हे तो पुरं जाणतो. त्याला गडाखाली तळ मिळाला, तर ते त्याला हवंच आहे.’
‘आणि हे माहीत असून त्याला आपण तळ दिलात?’ बाजींनी विचारलं.
राजांनी सांगितलं,
‘बाजी, आम्हांला नुसते खान नको आहेत. आम्हांला त्यांचा गोट हवा आहे.’
कृष्णेच्या काठावर खानाच्या तळाची तयारी सुरू झाली. रान तोडून ती जागा साफ करण्यात आली. महाबळेश्वरच्या रडतोंडी घाटावरून खान उतरणार होता. ती वाट झाडं-झुडपं तोडून शक्यतो सोयिस्कर केली.
खान येण्याचा दिवस जसा जवळ येत होता, तशा राजांच्या आज्ञा सुटत होत्या.
राजांनी बाजींना सांगितलं,
‘बाजी! तुम्ही, जेधे आणि नेताजी यांनी महाबळेश्वरच्या माथ्यावर राहावं. खानाचा तळ पारावर असेल. त्यावर नजर ठेवावी.’
‘राजे, त्यापेक्षा आपल्या संगती…’
‘नाही, बाजी! आमची चिंता करू नका. पण एक लक्षात ठेवा. काही विपरीत घडलं, तर खानाचा एक माणूस जावळीतून बाहेर पडत नाही, याची दखल घ्या. तुम्ही, जेधे, नेताजी वडिलधारी माणसं. महाबळेश्वरच्या माथ्यावर आमच्या वतीनं तुम्ही खानाचं स्वागत करा. आमचा घात झाला, तर साऱ्यांना सावरा. मासाहेबांना धीर द्या. आम्ही रुजवलेलं स्वराज्याचं रोपटं वाढेल, इकडं लक्ष द्या.’
‘राजे ss’ बाजी भावानाविवश झाले.
‘बाजी! जगदंबेच्या कृपेनं आम्ही या संकटातून तरून जाऊ, यात आम्हांला संशय नाही, पण दुर्दैवानं तसं घडलं नाही, तर कचदिल होऊ नका. माणसं कर्तव्यापोटी जगतात. कार्य करीत असता मरतात. पण त्यांच्या मृत्यूनं हताश न होता, ती का जगली, कशासाठी जगली आणि मेली, याची जाणीव ठेवायला हवी.’
‘जशी आज्ञा!’ बाजी म्हणाले.
‘बाजी, तुम्ही चिंता करू नका. पण एक लक्षत ठेवा, आम्ही विजयी होऊन गडावर येऊ तेव्हा, तोफांची इशारत केली जाईल. गनिमांपैकी जो हत्यार, फिरंग खाली ठेवून शरण येईल, त्याला मारू नका. पण जो हत्यार उगारेल, त्याची गय करू नका. कापून काढा. ही आज्ञा आम्ही सर्वांनाच दिली आहे.’
गडावरुन एकेका मानकऱ्याचं दळ हालत होतं. राजांनी सांगितल्याप्रमाणे जावळीच्या रानात ती दळं पसरत होती.
बाजी आपल्या दळासह महाबळेश्वरवर आले. बाजींनी महाबळेश्वराला राजांच्या सुरक्षिततेसाठी अभिषेक केला.
जेधे, नेताजी आपल्या शिबंदीसह बाजींना मिळाले.
आता सारे वाट पाहत होते अफजलखानाची.
सौजन्य :- सर्व क्रमशः लेख ( श्री. सागर पाटील – सोशल मिडिया )