राजांचं अश्वदल प्रतापगडाच्या रोखानं धावत होतं. बाजी, फुलाजी राजांच्या समवेत होते. महाबळेश्वराचं दर्शन घेऊन राजे महाबळेश्वरचा डोंगर उतरू लागले. दाट रानानं वेढलेल्या त्या मुलखातून राजे जात होते. टापांच्या आवाजानं भयभीत झालेली रानपाखरं आकशात फडफडत असता बाजींना प्रतापगडाचं प्रथम दर्शन झालं.
निबिड अरण्यानं वेढलेला तो प्रतापगड पाहून, बाजींना राजांच्या कल्पकतेचं कौतुक वाटलं. हत्तीच्या सोंडेसारखी सामोरी आलेली माची. त्यावर चढत गेलेची गडाची चढण. तटानं बंदिस्त झालेला गड बाजी निरखीत होते.
गडाच्या प्रथम दरवाज्याला राजे पायउतार झाले. सर्वांसह ते गड चढून गेले. रानमुलखात उभा ठाकलेल्या त्या गडावर सर्वत्र शांतता नांदत होती. गडावरून डोंगर-दऱ्यांनी, किर्रss रानानं भरलेला मुलूख बाजी पाहत होते. भर दुपारच्या वेळीही झाडांची सावली भेदून जमीन गाठायची हिम्मत सूर्यकिरणांत नव्हती, असं ते रान होतं. एखाद्या हिरव्या कंच शेल्याला बदामी किनार लावावी, तसं कोयनेचं पात्र त्या रानातून जात होतं.
तटावरून ते सारं दृश्य बाजी न्याहाळत असता, राजे केव्हा मागं आले, हेही बाजींना कळलं नाही.
‘बाजी! काय पाहता?’ राजांनी विचारलं.
‘केवढी कुबल जागा!’ बाजींनी उत्तर दिलं, ‘मरायला सुद्धा इथं कोणी येणार नाही.’
‘जरूर येईल!’ राजे हसले. ‘बाजी, तो अफजल वाईचा सुभेदार होता. तो धोरणी आहे. तो आपला तळ वाईलाच टाकेल.’
‘त्याचा काय फायदा?’ बाजींनी विचारलं.
‘खूप! आपण इथंच प्रतापगडावर राहू. खानाला जर मुकाबला करायचाच झाला, तर त्याला आपल्या पावलांनी इथं यावं लागेल.’
‘राजे! पण आपण इथं येण्याचे कष्ट…’
‘कष्ट कसले? आमचे सोबती वाड्याच्या सदरेवर हिरिरिनं खानाचा पराभव कसा करायचा, याची स्वप्न रंगवत आहेत. गैरहजेरी होती, ती तुमची. म्हणून आम्ही तुम्हांला हुडकत आलो.’
‘राजे! आपण आम्हांला सांगितलं होतं की, आपली दौलत वाचवणारी खरी दौलत ही रानं आहेत. अगदी खरं! या खोऱ्यात उतरणारा माणूस महामूर्ख म्हणावा लागेल.’
‘अहंकारापोटी असा मूर्खपणा घडतो.’ राजांनी बाजींना सांगितलं, ‘बाजी, चला. सदरेवर सारी आपली वाट पाहत असतील.’
राजे आणि बाजी सदरेकडं जात होते.
सूर्य पश्चिम दिशेकडं झुकत होता.
बाजींच्या वाड्यासमोरच्या चौकात एका कोपऱ्यात खूप गर्दी जमली होती. तात्याबा, यशवंत चौकात उभे होते. मध्यान्हकाळ झाली असताही गडावरची थंडी कमी झाली नव्हती.वाड्याच्या सोप्यावरच्या झोपाळ्यावर बसून बाजीप्रभू चौकातला प्रकार शांतपणे बघत होते.
चौकात उभ्या असलेल्या यशवंत, तात्याबांच्या समोर एक मध्यम वयाचा मावळा किंचित लंगडत आला. तात्याबांचा करडा सवाल उमटला,
‘नाव?’
‘भीमा झुनके.’
‘गाव?’
‘नायनी.’
‘नायनी गावावरून लंगडत आलास?’ यशवंतनं विचारलं.
‘व्हय, जी!’ भीमा म्हणाला.
तात्याबा-यशवंतच्या चेहऱ्यांवर हसू होतं.
बुटक्या उंचीचा, रूंद छातीचा; पण लंगडणारा भीमा ते पाहत होता.
तात्याबानं विचारलं,
‘तू धारकरी हाईस काय?’
‘न्हाई, जी!’
‘भालकरी?’ यशवंतनं विचारलं.
‘न्हाई, जी!’ भीमानं उत्तर दिलं.
‘मग का आलास?’ तात्याबानं विचारलं.
‘दवंडी पिटवली व्हती. शिवाजी राजाला फौजंत मानसं पायजेत, म्हनून.’
‘आनि म्हनून तू आलास? फौजंत लंगडं चालत न्हाईत, बाबा. तुला काय येतंय्, म्हनून घ्यायचं?’ तात्याबानं विचारलं.
‘म्या धारकरी नसंन. भालकरी नसंन. पन म्या तोडपी हाय, न्हानपनी झाडावरनं पडलो आनि पाय दुखवला. कोनचं बी झाड सांगा. ते एका दिसात पाडून दावतो. न्हाईतर नाव सांगनार न्हाई. आनि हां…’ भीमा म्हणाला, ‘झाड पाडंन. पन ते पाडताना एका झाडालाबी धक्का लावनार न्हाई.’
‘गड्या, तुझी येळ चुकली!’ तात्याबा म्हणाला, ‘जवा जासलोड गडाचं काम चालू व्हतं, तवा यायचं व्हतंस.’
‘तवा बी म्या कामावर हुतो.’ भीमा म्हणाला.
त्या उत्तरानं सारे चकित झाले. तात्याबा म्हणाला,
‘ठीक हाय, भीमा! परत कुठलं किल्ल्याचं काम सुरू झालं, तर जरूर तुला बोलवू.’ सदरेवरच्या कारकूनाला तात्याबांनी सांगितलं,
‘ह्याचं नाव लिहून ठेवा.’
बाजींच्या तोंडातला विडा रंगला होता. आपल्या गलमिश्यांवरून बोटं फिरवीत ते सारं पाहत होते. त्यांनी झोपाळ्यानजीकची पितळी पिकदाणी उचलली. त्यात पान थुंकून त्यांनी सांगितलं,
‘तात्याबा! त्याला जमेस धरा. तो आम्हांला हवा आहे.’
‘तोडपी?’ तात्याबा उद्गारला.
‘होय!’ बाजी तुटकपणे सांगते झाले, ‘तो आम्हांला हवा आहे. त्याचं नाव यादीत घाला.’
कारकुनानं भीमाच नाव यादीत घातलं.
भीमानं कृतज्ञतेनं बाजींना मुजरा केला आणि लंगडत-लंगडत निवडलेल्यांच्या गर्दीत जाऊन उभा राहिला.
फुलाजी तो सारा प्रकार पाहत होते. बाजींना फुलाजी येत असलेले दिसताच ते झोपाळ्यावरुन उठले. फुलाजी म्हणाले,
‘बाजी, बैस! पण असल्या लंगड्या-पांगळ्यांची फौज काय कामाची?’
झोपाळ्यावर बसत बाजींनी सांगितलं,
‘तो लंगडा असेल. पण पांगळा नाही… बघू.’
नकळत बाजींनी जमिनीला पाय लावला आणि पायाच्या बळानं झोका दिला. झोपाळा झोके घेत होता.
बाजी आपल्या विचारात रंगले होते.
सौजन्य :- सर्व क्रमशः लेख ( श्री. सागर पाटील – सोशल मिडिया )