दोनप्रहरी विठोजी आपल्या घराच्या पडवीत घोरत झोपला होता. दोनप्रहर टळत आली होती आणि त्याच वेळी सखूबाई पडवीत आली. निवांतपणे झोपी गेलेल्या बापाला उठवणं तिच्या जिवावर आलं. तिनं हाक मारली,
‘आबाss येss आबाss’
‘कोन!’ म्हणत विठोजीनं डोळे उघडले. सखूला पाहून त्यानं विचारलं, ‘काय झालं?’
‘गडावर लई मानसं येऊ लागल्यात. गडाखाली घोडी, बैलगाड्या जमल्यात. वर्दी आली, म्हनून जागं केलं.’
विठोजीच्या डोळ्यांवरची झोप उडाली. तो ताडकन् उठून उभा राहिला.
‘माझं पागोटं आन!’ विठोजीनं सांगितलं. आणि तो चूळ भरायला परसात गेला. परसातून जेव्हा आला, तेव्हा सखूबाई पागोटं घेऊन उभी होती. विठोजीनं पागोटं चढवलं आणि तो घराबाहेर पडला.
विठोजी गडाच्या दरवाज्याजवळ गेला आणि गडावरुन दिसणारं दृश्य तो बघतच राहिला.
गडाच्या पायाथ्यापासून वरपर्यंत माणसांची रांग लागली होती. प्रत्येकाजवळ ओझं होतं. गडाखाली बैलगाड्यांचा तळ पडला होता. गडावर सामान येत होतं. त्यात बाडबिछायत होती. धान्याची पोती होती.
पाठीवरच्या ओझ्यानं दमलेली माणासं विठोजीकडं बघून न बाघितल्यासारखं करीत आत जात होती. गडात गेलेला एकजण बाहेर आला. विठोजीकडं पाहत त्यानं विचारलं,
‘तुम्ही किल्लेदार?’
‘व्हय!’
‘बारदान, सामान ठेवायचं कुठं?’
‘ठेवा माझ्या डोक्यावर! गडावर बसायला छपरी मिळायची मारामार आनि एवढं सामान आनलासा. गडावर अंबारखानं हाईत, असं वाटलं का तुला?’
‘त्या भडिमारानं तो इसम चकित झाला. धीर करून त्यानं विचारलं,
‘मग सामान गडाखाली जाऊ दे?’
‘चल, सांगतो तुला.’ म्हणत विठोजी चालू लागला.
गडावर देवीची छपरी उभी होती. तिथं जाऊन विठोजीनं आज्ञा केली,
‘या छपरीत दाण्याची पोती ठेवा. आनि उरलेलं बारदान आमच्या घरात घाला.’
विठोजी डोक्याला हात लावून सारी वर्दळ पाहत होता. सामानाच्या पाठोपाठ गडावर घोडी आली. शिलेदार आले. विठोजीचे दोन्ही सोपे बाडबिछायतीनं भरले होते. घरासमोर राहुट्या, पाली व सामान पडलं होतं.
बाबाजी सर्वांमागून गडावर आले. त्यांनी विठोजीची भेट घेतली. त्यांना धीर दिला,
‘विठोजी, काळजी करू नका. आमची माणसं आपली व्यवस्था करून घेतील. त्यांची तोशीस तुम्हाला पडणार नाही.’
‘बाजी कवा येणार?’
‘इथली व्यवस्था झाली, की येतील.’ बाबाजींनी उत्तर दिलं.
दुसऱ्या दिवसापासून गडाचं रूप बदललं. गडावर सोईस्कर जागा बघून घरटी उभारण्यात आली. गडाचे कातळ सोलून राहुट्या, पाली उभा राहिल्या. गंजीखाना सजला. विठोजीला काही करावं लागत नव्हतं. होणारी घडामोड तो नुसत्या डोळ्यांनी पाहत होता.
एके दिवशी सकाळी बाबाजी विठोजीकडं आलं. त्यांनी सांगितलं,
‘विठोजी, आज बाजी प्रभू देशपांडे गडावर येतील.’
‘कवा?’ विठोजीनं विचारलं.
‘संध्याकाळपर्यंत ते गडावर यावेत.’
‘येऊ देत!’ विठोजी म्हणाला, ‘आमी नावाचं गडकरी, तुमी कराल, ते खरं!’
‘तसं नाही, विठोजी!’ बाबाजी म्हणाले, ‘राजांची आज्ञा आहे. गड वसवताना तुम्हांला कोणतीही तसदी द्यायची नाही.’
विठोजी त्या बोलण्यानं समाधान पावला. तो म्हणाला,
‘बाबाजी! किल्लेदार म्हनून घेतो आनि तुमी मानसं आलासा, त्यांची उठाठेव करायला नको? आता आमांस्नी पूर्वीचं दीस ऱ्हायले न्हाईत. धरलं, तर चावतं; सोडलं, तर पळतं, अशी गत झालीया आमची. काय करावं, तेबी समजत न्हाई.’
बोलता-बोलता विठोजीचे डोळे पाण्यानं भरले. ओठ थरथरले. बाबाजीनं त्याच्या पाठीवर हात ठेवला.
‘विठोजी, ही तुमचीच हकीकत नाही. साऱ्या मुलखात हेच घडतंय्. तुमी काळजी करू नका. ह्या दिवसांत तुम्ही गडावर टिकाव धरलात, तेच पुष्कळ झालं.’
‘काय करनार! नाव गडकरी हाय, नव्हं?’ विठोजी म्हणाला.
‘तुमी निवांत राहा. काम लागलं, तर तुम्हांला केव्हाही सांगेन. समजलं?’
‘व्हय!’ विठोजीनं सांगितलं.
बाबाजी गडाच्या व्यवस्थेसाठी वळले. ते दूर जाईपर्यंत विठोजी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं.
कट्ट्यावर बसून विठोजींनी चिलमीची पिशवी काढली. चिलमीची छापी कटोऱ्यातल्या पाण्यात भिजवली. काळ्याशार चिलमीत तंबाखू ठासून भरली. ओली छापी पिळून चिलमीला लावली आणि त्यानं साद घातली.
‘पोरीss’
सखू धावत बाहेर आली.
तिनं एकवार विठोजीकडं पाहिलं. त्याच्या हातातली चिलीम न्याहाळली आणि तिच्या चेहऱ्यावर हासू उमटलं ती म्हणाली,
‘तोफांचा बार भरलास, जनू! इंगळ आनू?’
‘त्यापायीच साद घातली. पोरी, ह्यो शिवाजीराजा गड सजवनार बघ.’
सखू आत गेली आणि खापरीतून इंगळ घेऊन बाहेर आली. त्यातला फुललेला इंगळ विठोजीनं उचलला. बोटावर फुंक घालीत चिलमीवर ठेवला आणि चिलीम तोंडाला लावून एक झक्कास झुरका घेतला. तो झुरका घेत असता सखू केव्हा आत गेली, तेही त्याला कळलं नाही.
सौजन्य :- सर्व क्रमशः लेख ( श्री. सागर पाटील – सोशल मिडिया )