राजे गडावर येताहेत, हे पाहून खेळण्याचे किल्लेदार झुंजारराव पवार आपल्या शिबंदीनिशी धावत राजांच्या सामोरे आले. हातांत पट्टे चढवलेले राजे सर्वांसह गडाकडं चालत होते. राजांच्या डाव्या खांद्यावर जखमेची खूण दिसत होती. राजांबरोबर यशवंत चालत होता. राजे गडाच्या दाराशी आले. तो बिकट गड चालून येताना, आधीच लढलेले वीर दमले होते, श्वास जड झाले होते.
गडावरून चौफेर नजर फिरवीत राजे म्हणाले,
‘हा खेळणा कसला! हा तो विशाळगड आहे. झुंजारराव, क्षणाचाही विलंब न लावता तोफेचा आवाज द्या. त्या गजाखिंडीत आमचे बाजी, फुलाजी, आमचे मावळे आमच्यासाठी प्राणपणानं खिंड लढवीत आहेत. बाजी होते, म्हणूनच आम्ही या संकटातून तरलो. आम्ही बाजींना पहिल्या तलवारीचा आणि पालखीचा मान देणार आहोत. झुंजारराव, तोफेचा आवाज द्या. तो आवाज ऐकण्यासाठी बाजी उतावीळ झाले असतील. आमच्या स्वराज्यासाठी आज बाजींनी आपल्या पराक्रमाने गजाखिंडीची पावन खिंड बनवली आहे.’
‘झुंजारराव! विलंब न करता तोफेचा आवाज द्या!’
हातात इटा घेऊन, तोल सावरत बाजी पावलं टाकीत होते. सारा चेहरा घामानं डवरला होता. डोळ्यांत रक्त उतरलं होतं. सर्वांगावर रक्ताची तांबडी कलाबूत चढली होती. बाजी खिंडीच्या सामोरे आले. त्यांनी इटा पेलला आणि ते गर्जले,
‘या s s’
झोकांड्या देत येणाऱ्या बाजींचं रूप महाकाय द्वारपालाप्रमाणे पुढं सरकत होतं. बाजींचं ते रूप पाहून मावळ्यांना आपल्या जखमांच्या वेदनांची जाणीव राहिली नव्हती. बाजींनी इटा पेलला आणि त्याच वेळी तोफेचा आवाज झाला.
समोरचा शत्रू, त्याचं हे सर्व बळ विसरून बाजींच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. त्यांनी विचारलं,
‘तोफेचा आवाज झाला! झाला ना?’
शेजारचा वीर म्हणाला,
‘धनी! तोप झाली.’
त्याच वेळी दुसरी तोफ धडाडली. बाजींच्या चेहऱ्यावरचे सारे भाव पालटले. विराट हास्य उमटलं_
‘राजे! लाज राखलीत!’ म्हणत बाजी खाली कोसळले.
बाजींना उचलून मागं नेण्यात आलं. कुणीतरी साचलेल्या पाण्यातून मुंडासं भिजवून आणलं. ते बाजींच्या कपाळावर थापलं.
क्षणभर बाजी शुद्धीवर आले. भोवताली वाकून पाहणाऱ्या माणसांवरून त्यांनी नजर फिरवली. प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते.
बाजी हसले,
‘रडता कशाला? त्या मसूदची खोड मोडा. आम्ही जातो. राजांना आमचा मुजरा सांगा ss मुजरा ss’
बाजींनी हात उंचावला; पण कपाळी नेण्याआधीच तो कोसळून पडला.
बाजींचे उघडे डोळे कुणीतरी मिटले. डोळे टिपून माणसं आपल्या तलवारी घेऊन उठली.
गडावरून तोफांचे आवाज उठत होते_!
भर दुपारी सुद्धा गड गार वाऱ्यात आणि विरळ धुक्यात गारठून गेला होता. राजांच्या बरोबर आलेल्या धारकऱ्यांच्या जखमांवर उपचार चालू होते. ‘हर हर महादेवs’चा गजर अस्पष्टपणे त्यांच्या कानांवर येत होता.
झुंजारराव पवार राजांच्या जवळ आले. ते म्हणाले,
‘राजे! आपण थोडी विश्रांतीss’
‘नाही, झुंजारराव! जोवर बाजी दिसत नाहीत, तोवर आम्ही या जागेवरून पाऊलही उचलणार नाही. झुंजारराव, आमची चौकशी करण्याऐवजी गडाची शिबंदी एकत्र करा आणि बाजींच्या मदतीला जा.’
झुंजारराव निघून गेले.
राजे एकटेच उभे होते. बराच वेळ गेला आणि धावत आलेल्या यशवंतनं सांगितलं,
‘राजे, गडावर पालखी येते आहे.’
‘पालखी?’ राजे चिंतातूर झाले. ‘यशवंत, तू पालखीला सामोरा जा. बाजी जखमी झाले असतील. आम्ही वाड्याकडं जातो. वैद्यांना बोलवून घेतो. बाजींना सांभाळून घेऊन या.’
राजे वाड्याकडं चालू लागले. वाड्यात येताच ते आज्ञा सोडत होते,
‘वैद्यांना इथं बोलवून घ्या.
‘बाजी येतील. त्यांचा पाठलाग होईल….
‘तोफा आणि शिबंदी सज्ज ठेवा….’
राजांना प्रत्येक क्षण घटकेसारखा भासत होता. त्यांच्या जिवाला चैन नव्हती. वाट पाहत थांबणं अशक्य होतं. राजे तसेच वाड्याच्या बाहेर पडले. राजे धावत गडाच्या दरवाज्याकडं जात होते. दरवाजा दिसू लागला आणि त्याच वेळेला दरवाज्यातून येणारी पालखी राजांच्या नजरेत आली.
पालखीभोवती माणसांचं कडं पडलं होतं. जसजशी पालखी जवळ येत होती, तसं राजांना सर्वांचं रूप स्पष्ट होत होतं. जखमांनी घायाळ झालेले वीर नतमस्तकानं पालखीसमोर चालत होते. कुणाच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. जड पावलांनी ते येत होते.
पालखी वाड्यासमोर आली आणि राजे पुढं झाले. पालखीवर हात ठेवून यशवंत चालत होता. राजांना साऱ्यांनी वाट करून दिली. तेव्हा पालखी जमिनीवर ठेवली होती. पालखीवरचं लाल अलवानाचं आच्छादन तसंच झाकलेलं होतं. यशवंतच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. राजांनी विचारलं,
‘यशवंता! अरे, बाजी जखमी झालेत ना?’
यशवंतनं नकारार्थी मान हलवली.
‘अरे! ते जखमी झाले नाहीत, तर रडतोस कशाला?’ सारं बळ एकवटून राजांनी विचारलं. पण त्या पालखीवरचं अलवान उचलण्याचं धारिष्ट राहिलं नव्हतं.
यशवंत कसाबसा म्हणाला,
‘राजे! आपले बाजी, फुलाजी गेलेss’
‘गेले?’ राजे उद्गारले.
कुणीतरी पालखीची कनात वर केली. पालखीत रक्तबंबाळ झालेले बाजी, फुलाजी एकमेकांच्या मिठीत झोपी गेले होते.
राजांचा ऊर भरून आला. डोळ्यांत अश्रू उभे राहिले. सारा चेहरा मनस्तापानं तांबडा बुंद झाला. छातीवर मूठ मारत ते ओरडले,
‘बाजी! काय केलंत हे! पालखीचा मान कुठं जात होता का? त्यासाठी हे करायला हवं होतं? बाजी, फुलाजी….काय केलंत हे!’
राजांना आपले अश्रू आवरत नव्हते. रडणाऱ्या यशवंताला त्यांनी आधारासाठी मिठी मारली. आणि दोघांच्याही भावनांचे बांध फुटले. ते सावरण्याचं सामर्थ्य कुणालाही राहिलं नव्हतं.
🚩-:समाप्त:-🚩