गडाची वर्दळ दिवसेंदिवस वाढू लागली. बाजींनी बांदल-मावळे गडावर आणले. गंजीखान्यात गवत रचलं जात होतं. अंबरखान्यासाठी खरेदी करून आणलेली धान्याची पोती नीट लावली जात होती. गडकोटाचे पहारे वाढवले होते. दररोज गडावर बातम्या थडकत होत्या. राजे, फुलाजी, त्र्यंबकजी, गंगाधरपंत गड फिरत होते. गडाच्या मोकळ्या जागेतून अनेक छपऱ्या, घरटी उभारली जात होती.
राजांनी विचारलं,
‘ही घरटी कशासाठी?’
‘गडाची शिबंदी वाढते आहे. एवढया शिबंदीला निवारा हवा.’
‘छान केलंत! पण बाजी, गडाची शिबंदी केवढी ठेवायची, याचा पक्का विचार केला पाहिजे. गड वेढ्यात पडेल. पण वेढा किती दिवस, वर्षे, महिने चालेल, हे कोण सांगणार? त्या शिबंदीची उपासमार होऊ लागली, तर…’
‘त्याचा विचार केला आहे.’ बाजींनी सांगितलं, ‘गडाची शिबंदी तीन हजार राहील. आणि गडाचे गंगा-जमना हे अंबरखाने धान्यानं भरून घेतले आहेत. अजूनही गडावर धान्य येतं आहे.’
‘जुलूम-जबरदस्ती करून धान्य गोळा करू नका.’
‘नाही, राजे तसं घडत नाही. उद्या तो सिद्दी जौहर आला, तर साऱ्या गावांना झळ पोहोचणार आहे, हे सर्वांना माहीत आहे. बाजारभावापेक्षाही दुप्पट किंमत देऊन आम्ही धान्य खरीदतो आहोत.’
‘कारण?’
‘त्या बिचाऱ्यांना या संकटकाळी घरदार सोडून जावं वाटलं, तर त्यांना जाता यावं.’
राजांना समाधान वाटलं, ते म्हणाले,
‘बाजी, एवढं साऱ्यांना कळलं, तर किती बरं होईल; पण एवढी संपत्ती…’
‘त्यालाही कमतरता नाही. रुस्तुमेजमा आणि फाजलखान यांच्या लढाईत गवसलेला खजिना आपणच गडावर पाठविला आहे.’
राजे हसले, मनमोकळेपणानं हसले,
‘छान! म्हणजे, आम्हीच तुम्हांला उधळण करायला शिकवली, असंच ना!’
दररोज मध्यरात्रीपर्यंत सदर-इ-महलमध्ये बैठक भरत होती. मोहिमेचे आराखडे आखले जात होते. बहिर्जी नाईक आणि आबाजी प्रभू यांना मुलखात पेरलेल्या गुप्त हेरांकडून सर्व बातम्या येत होत्या. सिद्दी जौहर मिरज ओलांडून कोल्हापूरच्या वाटेला लागला होता. राजे किंचित चिंतातुर होते.
‘राजे, आता वेढा पडायला फारसा अवधी लागणार नाही.’
‘आबाजी, सिद्दी जौहरची छावणी काय म्हणते?’
‘महाराज!’ आबाजी म्हणाले, ‘सिद्दी जौहरची फौज समुद्रासारखी पसरली आहे. तो येताना दरबारातून त्याला सलाबतजंग हा मान दिला आहे. चाळीस हजार फौज आणि जवळ जवळ वीस हजार घोडदळ त्याच्या संगती आहे.’
‘बोला!’ राजे म्हणाले.
‘सिद्दी जौहरच्या संगती फाजलखान, रुस्तुमेजमा, सादतखान, बाजी घोरपडे, सिद्दी मसूद वगैरे सरदार आहेत. तोफा, बाड-बिछायत, गंजीखाना यांसह तो येत आहे. आणि….’
‘आणि काय?’
‘शिवाय श्रृंगारपूरचे राजे सूर्यराव सुर्वे, पालवणीचे जसवंतराव, सावंतवाडीचे भोसले सावंत त्यांच्या मदतीला आले आहेत.’
‘आम्ही ते गृहीतच धरलं होतं. या वक्ताला नेताजी, दारोजी जवळ असायला हवे होते. नेताजी आपल्या फौजेनिशी कर्नाटकात आहेत आणि दारोजी राजापुरास आहेत.’
‘एका दृष्टीनं झालं, ते बरं झालं.’ बाजी म्हणाले.
‘मतलब?’
‘आम्ही वेढ्यात अडकलो, तर बाहेरची फौज धावून येईल. वेढा मोडायला वेळ लागणार नाही.’ बाजींनी सांगितलं.
‘आबाजी! तुम्ही आणि बहिर्जी कोल्हापूर गाठा. आपल्या नजरबाजांच्या बातम्या जोवर पाठवता येतील, तोवर पाठवा.’
राजांनी सर्वांना निरोप दिला. सारे गेले.
एकटे राजे सज्जावर उभे होते. ज्या कमानीतून सारा मुलूख दिसायचा, त्या कमानीतून फक्त अंधार दिसत होता. दाट धुकं उतरत होतं. काही क्षण तो काळोख निरखून राजे सदरमहाल उतरले.
मशालीच्या उजेडात राजे राजवाड्याकडे जात होते.
दिवस उलटले. उन्हाळा आला. हिरवागार दिसणारा मुलूख उन्हाच्या तावानं करपू लागला. डोंगर-कडांवर पिवळी झाक उमटू लागली. गडावरची हवा जरी थंड असली, तरी सारा मुलूख वाढत्या उन्हात गदगदत होता.
भर दुपारच्या वेळी राजे गडाचा पाहणा करून फिरत दौलती बुरूजावर आले होते. संगती त्र्यंबक भास्कर, बाजी होते. दौलती बुरूजावरून दिसणारा डोंगरदऱ्यांनी रेखलेला तो अफाट मुलूख डोळ्यांत मावत नव्हता.
‘बाजी! या बुरूजाचं नाव सार्थ ठेवलं आहे. दख्खन दौलतीवर नजर ठेवणारा हा दौलती बुरूज!’ राजांचा हात तोफेवर विसावला होता. नजर उत्तरेवर खिळली होती. तिकडं बोट दाखवत राजांनी विचारलं,
‘बाजी! या पर्वतरांगांच्या शेवटी दूरवर खेळणा ना?’
‘जी! तोही गड मजबूत आहे. निसर्गानंच त्याला वरदान दिलं आहे.’ थोडी उसंत घेऊन बाजी म्हणाले, ‘राजे, ऊन वाढतं आहे.’
‘हो! जाऊ या. या गडाला आशीर्वाद लाभला आहे. उन्हाळ्याची जाणीवही या गडावर होत नाही. येव्हाना दोन-तीन वळीव यायला हवे होते.’
राजे दौलती बुरूज उतरले आणि वाड्याच्या दिशेनं चालू लागले.
क्रमशः
सौजन्य :- सर्व क्रमशः लेख ( श्री. सागर पाटील – सोशल मिडिया )