पुणे/नवी दिल्ली : सध्या राज्याचे आकाश म्हणजे “पाऊस दाटलेला, जोरदार पावलांनी” अशी स्थिती आहे. त्यात हवामान खात्याचा इशारा (IMD Alert) आलाय, की आणखी 3-4 दिवस राज्यभर मुसळधार कायम राहील. मात्र, हा पाऊस म्हणजे परतीचा मान्सून नाही. हवामान अंदाज अन् पावसाचा इशारा सविस्तर जाणून घेऊया.
पुण्यात 2 दिवस बदा-बदा बरसला
राज्यावर 5 सप्टेंबर पासूनच ढग दाटलेले आहेत. 5 तारखेला राज्यात काही ठिकाणी सरी बरसल्या. मंगळवारी, 6 तारखेला बहुतांश ठिकाणी अधूनमधून सरी कोसळत होत्या. काही ठिकाणी तर अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस बरसला. 6ला मध्यरात्री राज्यात अनेक ठिकाणी 15-20 मिनिटात पावसाने धुमशान माजविले. हा पाऊस आज, बुधवार, 7 सप्टेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी मुक्कामीच होता. पुण्यात तर तो बदा-बदा बरसला.
हवामान अंदाज : पाऊस दाटलेला; जोरदार कोसळणार
आयएमडी, पुणेचे प्रमुख शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी पुढील 3,4 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या किंवा मध्यम गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 10 सप्टेंबरपासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आताचा हा पाऊस परतीचा मान्सून नव्हे, मग का पडतोय इतका?
भारताचा पूर्व तटीय ओडिशाकडील भाग, गुजरात आणि महाराष्ट्रात गेले 2 दिवस सध्याचा हा पाऊस कोसळत आहे. हवामान खात्याकडून आणखी 3-4 दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 8 सप्टेंबरपासून तर तो आणखी जोर धरणार आहे. मात्र, हा परतीचा मान्सून नसल्याचेही आयएमडीने स्पष्ट केले आहे. मग हा पाऊस का कोसळतोय इतका, याचे अनेकांना कोडे पडले आहे. 7 सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा हा परिणाम आहे. त्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे चक्रीवादळ तयार झाल्यापासून पुढील 48 तासात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
राज्याच्या काही जिल्ह्यात अतिजोरदार पाऊस
हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार, येत्या दोन दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 8 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. या बातमीतील छायाचित्रात दर्शविलेल्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. {सर्वाधिक धोक्याचा भाग लाल (रेड ॲलर्ट), अतिजोरदार पावसाचा नारंगी (ऑरेंज ॲलर्ट) तर जोरदार पावसाचा भाग पिवळ्या रंगात (यलो ॲलर्ट) दाखविलेला आहे. हिरव्या रंगाच्या क्षेत्रात पावसाचा कुठलाही इशारा नाही }
पुणे, नगर परिसरात तुफानी पाऊस
पुणे शहर, जिल्ह्याचा उत्तर भाग आणि नगरसह नाशिक जिल्ह्याच्या काही भागात तुफान पाऊस कोसळत आहे. या बातमीतील छायाचित्रानुसार, या जिल्ह्यांवर घनदाट ढग जमा झालेले आहेत. (Thunder Clouds) दक्षिण कोकण, गोव्यातही आधी, काल ही स्थिती होती. पुण्यातील तळेगाव ढमढेरे येथे काल अवघ्या 3 तासात 75 मिलिमीटर पाऊस झाला. पुणे शहर भागात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाला.
मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबणार
भारतीय भूविज्ञान संस्थेचे माजी सचिव आणि मान्सूनचे अभ्यासक माधवन राजीवन यांनी सध्याच्या चक्रीवादळ आणि पावसाने परतीच्या मान्सूनचा प्रवास लांबणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर सध्या देशात मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. मध्य भारत, ओडिशा, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळात तो आणखी आठवडाभर सक्रीय राहील. त्यामुळे त्याच्या परतीच्या प्रवासाला अजून सुरुवात झालेली नाही. सध्याचा सक्रीय मान्सून ओसरल्यावर परतीच्या प्रवासाचे चित्र स्पष्ट होऊ शकेल असे राजीवन यांनी म्हटले आहे.
सध्याचा राज्यातील गडगडाटी पाऊस परतीचा नाही
राज्यात सध्या पडणारा गडगडाटी पाऊस हा परतीचा (रिटर्न मान्सून) असल्याचा समज होऊ शकतो. मात्र, सध्याचा पाऊस हा मान्सून परतण्यास उशीर झाल्याने वातावरणातील उष्णता वाढल्याने पडत आहे. आर्द्रतेचे कायम असलेले प्रमाणही त्याला कारणीभूत आहे. याशिवाय बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्रही पावसाला जोर देत आहे.
या सध्याच्या क्षेत्रानंतर 2-3 दिवसात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज आहे. या सर्व घडामोडी आणि तत्कालीन हवामान बदलामुळे रिटर्न मान्सूनला उशीर होण्याची शक्यता आहे. राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर दिसत आहे. गणेश विसर्जनावेळी तो आणखी वाढेल.
रिटर्न मान्सून नेहमीपेक्षा उशिराच
मुंबईतील प्रादेशिक हवामान अधिकारी सुषमा नायर यांनी सांगितले, की चक्रीवादळामुळे होणारा गडगडाटी पाऊस हा शक्यतोवर सकाळी किंवा संध्याकाळीच पडतो. तर पुणे आयएमडीचे प्रमुख होसाळीकर यांनी सांगितले, की देशातून दरवर्षी साधारणतः 17 सप्टेंबरच्या सुमारास नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजे मान्सून देशातून परतायला सुरुवात होते. तर राज्यातून त्याचा परतीचा प्रवास 5 ऑक्टोबरच्या असापास सुरू होतो. मात्र, यंदा हा देशातून परतीचा मान्सून सरासरी तारखेपेक्षा उशिरा सुरु होऊ शकतो. कमी दाबाच्या क्षेत्रांची शक्यता असताना, रिटर्न मान्सूनचा नेमका अंदाज वर्तविण्यात अडचणी असतात, असेही त्यांनी सांगितले.
आपणास या बातम्याही वाचायला नक्की आवडेल 👇👇
Comments 3