परभणी तालुक्यातील असोला येथील रहिवाशी असलेले सेवानिवृत्त कृषी संचालक अनंतराव नारायणराव जावळे-पाटील (वय 65) यांनी कृषी विभागात संपूर्ण कारकीर्द घालविल्यानंतर आता निवृत्तीनंतर आयुष्याची दुसरी कारकीर्द पुन्हा कृषी मध्येच सुरु केली आहे. त्यांनी आपल्या मुळगावी शेती कसायला सुरुवात केली असून ते विविध पिके घेत आहेत. त्यांनी शेतीत प्रयोगशीलता जपत मराठवाड्याला नवीन असणार्या खजूर पिकाची यशस्वी लागवड करून साडेसात एकरातील 450 झाडापासून तीन वर्षांत 37 लाखांचे उत्पन्न घेतले. या तीन वर्षांतील खर्च वजा जाता 19 लाखांचा निव्वळ नफा त्यांना मिळाला. शिवाय, यापुढे अनेक वर्षे आता नियमीत उत्पादन व त्याद्वारे उत्पन्न मिळत राहीलच.
परभणी तालुक्यातील असोला येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेले उच्च कृषी शिक्षीत सेवानिवृत्त कृषी संचालक अनंतराव नारायणराव जावळे-पाटील यांच्या एकत्रित कुटूंबातील परभणी-वसमत मुख्य रोडलगत दोन्ही बाजूंनी एकूण 22 एकर काळी कसदार सुपीक जमीन आहे. कृषीविषयक उच्चतंत्र शिक्षण घेतल्यानंतर अनंतराव जावळे पाटील हे महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्यात अधिकारी पदावर रुजू झाले. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात त्यांनी उत्कृष्टरीत्या काम केल्यानंतर त्यांची कृषी संचालक पदापर्यंत पदोन्नती झाली आणि डिसेंबर 2013 ला कृषी संचालक पदावरुन सेवानिवृत्ती झाली.
कृषीतून पुन्हा कृषीतच…
कृषी खात्यात नोकरी करीत असताना त्यांचे घरच्या शेतीकडे देखील विशेष लक्ष असायचे. गावाकडच्या शेतीत काम करणारे दत्तराव जावळे, प्रभाकर जावळे या भावंडांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन करत असत. त्यानुसार बंधू शेतीत वेगवेगळे पीके घेत. त्यांच्या शेतीत विहीर, बोअरवेल ही सिंचनाची साधने असून पशुधनाचीही संख्या मोठी आहे. परभणी झीरोफाटा रोडवरच असोला शिवारात मोठे फार्म हाऊस आहे. येथे जावळे पाटलांनी सेवानिवृत्ती नंतरचा उर्वरित काळ आधुनिक पद्धतीने शेती करण्यातच घालवण्याचे ठरवून स्वतः ला पूर्ण वेळ झोकून दिले. पत्नी सौ. मंगलाबाई जावळे याही पती सोबत शेतात राबतात. शेतीत शेडनेट, पॉलिहाऊस उभारलेत. त्यात ते मिरची, काकडी, कारले, टोमॅटो, दोडकी असे अनेक भाजीपाला पिके घेतात. तेथेच भाजीपाला रोपवाटिका सुध्दा चालू केली आहे. आणि आता तर मराठवाड्यात अनोख्या अशा खजूर (खारीक) पिकाची मोठ्या क्षेत्रावर लागवड करुन त्यापासून वर्ष 2019 पासून भरघोस उत्पादन घेवू लागलेत. नोकरी निमित्ताने कृषीत सुरु झालेली त्यांची कारकीर्द आता निवृत्तीनंतर पुन्हा खर्या अर्थाने कृषीतच सुरु झाली आहे.
खजूर लागवड प्रयोग केला यशस्वी
खजूर (खारीक) म्हटले की, कोणाच्याही तोंडाला पाणी सुटते, परंतु ती पिकते गुजरात व अन्य राज्यात. मराठवाडा विभागात आता कुठे खजुराची लागवड होवू लागली आहे. खजूराची शेती करणे खुप खर्चिक असल्याने फारसे त्याकडे कोणी वळत नाही. मात्र त्याला अपवाद ठरले आहेत असोल्याचे अनंतराव जावळे व त्यांचे कुटूंबिय. सेवानिवृत्तीनंतर गावाकडच्या शेतीत आधुनिक पिके घेणारे मोठे बंधू अनंतराव यांना त्यांचे सर्वात लहान बंधू जिल्हाधिकारी किशनराव जावळे यांनी आपल्या शेतीत खजूर लागवड करा, असा सल्ला दिल्यानंतर अनंतराव जावळे यांनी गुजरात येथे जाऊन तेथील खजूराच्या बागा पाहिल्या. तेथील खजूर उत्पादक शेतकर्याकडून खजूर पीकाविषयी ईत्यंभूत माहिती घेतली. परंतु या पिकास मराठवाड्याचे हवामान मानते की नाही? हा प्रश्न होता. मात्र, खजूर पिकास उष्ण हवामान लागते.
हे माहीत झाल्याने मराठवाडा उष्ण कटिबंधीय आहेच, यामुळे खजूर लागवडीचा निर्णय पक्का झाला आणि गुजरात मधून बर्ही पिवळ्या रंगाचे फळे येणार्या वाणाचे 450 खजूर शाखीय उत्तीसंवर्धीत रोपे प्रती रोप 3500 रुपये दराने खरेदी करुन आणले आणि 8 बाय 8 मीटर अंतरावर, 1 बाय 1 बाय 1 आकारावर मार्च 2016 ला साडेसात एकरात लागवड केली. शाखीय पध्दतीने तयार केलेली उत्तीसंवर्धीत बर्ही वाणाची खजूर रोपे लागवड केल्यास त्या रोपांना तिसर्या वर्षी फळधारणा होते. शिवाय या वाणाची फळे टिकाऊ असतात. तसेच खजूर पीक हे 52 अंश सेल्सिअस तापमानात तग धरुन राहते. हे पिक पाण्याचा निचरा होणारी पोयट्याची तसेच क्षारयुक्त जमीनीतही येते. या झाडांना जवळपास 100 वर्ष आयुष्य असल्याचे बोलले जाते. या पिकास सुरुवातीला रोपांचा खर्च अधिक असला तरी 40-50 वर्षाच्या कालावधीत उत्पादनातून कमी खर्चात लक्षावधी रुपये उत्पन्न मिळवून देते. जावळे पाटील यांनी 2016 ला लागवड केलेल्या खजूरास तिसर्या वर्षी म्हणजे 2019 ला फळधारणा झाली. त्यामुळे खजूर लागवड प्रयोग यशस्वी झाला. व मराठवाड्यातील मातीत आणि येथील हवामानात खजूर पीक येण्याचे सिद्ध झाले.
व्यवस्थापन
खजूर पिकाच्या झाडांना कोणतेही रासायनिक खत देत नाही. या फळझाडांना त्यांनी केवळ शेणखत दिले. तसेच ठीबक बसवून त्यातूनच जमीन वाफस्यानूसार पाणी दिले. खजूर रोपे काटेरी असल्याने त्यास सरंक्षण करण्याची गरजही नाही. या फळबाग झाडांना सरासरी कोणताही कीडरोग प्रादुर्भाव होत नाही. फक्त फळे धारण झाल्यावर फळावर डंक माशी येते. तीच्या नियंत्रण करण्यासाठी निंबोळी अर्काची फवारणी करावी लागते.
परागीभवन
बर्ही वाणाची लागवड असलेल्या या खजूर झाडांना 2019 ला जानेवारी महिन्यात फुले लगडली. याच बागेत काही नर झाडांची लागवड केली आहे. नर झाडाच्या फुलांची भुकटी करुन ती एका यंत्राणे मादी झाडाला लगडलेल्या घडांच्या फुलावर हळूवार स्प्रे मारुन परागीकरण केले. त्यामुळे परागीभवन होवून फळधारणा झाली.
खजूराचे उत्पादन
लागवडीनंतर 2019 ला साडेसात एकरातील खजूर झाडांना लगडलेल्या पहिल्या वर्षी जून-जुलै महिन्यात काढणी केलेल्या फळाचे 6 टन उत्पादन झाले तर वर्ष 2020 ला दुसर्या हंगामात झाडांचा विस्तार झाल्याने 10 टन उत्पादन झाले आणि यंदा 2021 ला 20 टन उत्पादन झाले. 30 टन उत्पादन अपेक्षित होते, परंतु ऑगस्ट 2021 ला अतिवृष्टी झाल्याने जवळपास 10 ते 12 टन खजूर फळे पावसाच्या माराने गळून नुकसान झाले.
विक्री पध्दत
खजूर झाडांना परिपक्व झालेले फळे ही एकदाच काढली जात नाहीत. जी फळे पिकली तीच महिला मजूराकरवी काढून घेतली जातात. येथे 30 महिलांना कायम रोजगार मिळत आहे. त्या फळे काढणी, प्रतवारी करणे व 500 ग्रॅमचे डबे पॅकिंगची कामे करतात. पॅकिंग केलेल्या खजूर फळांची विक्री फार्मवर स्टॉल लावून केली जात आहे. अर्धा किलो पॅकिंग डबा 100 रुपये दराने विक्री करतात. एका किलोला 200 रुपये दर मिळतो. तसेच मोठ्या प्रमाणात टनेज मध्ये काढलेली खजूर फळे मागणीनुसार नाशिक, बेंगलोर, आंध्र प्रदेश, पुणे, मुंबई येथे देखील पाठवून विक्री करतात.
शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना
शेतक-यांना खजूर लागवड व भाजीपाला वळवण्यासाठी आणि सुविधा देण्याकरिता सोय व्हावी म्हणून सिध्दीश्री नावाने शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यात आली आहे. तीचा पुढील काळात विस्तार करुन त्यातून शेतकर्यांचे हितार्थ कार्य केले जाणार आहे.
खजूर शेतीतून तीन वर्षात एकोणीस लाख निव्वळ नफा
खजूर झाडांना लगडलेल्या घडांच्या परिपक्व फळाचे पक्षी व फळावर डंक मारुन रस शोषण करणार्या कीटकाच्या संरक्षणासाठी फळाच्या घडावरती कापडी पिशव्यांची बांधणी केली. यामुळे फळाचे चांगले रक्षण होवून उत्पादन हाती आले. तीन वर्षात उत्पादीत झालेल्या खजूर फळाच्या विक्रीतून 37 लाख रुपये उत्पन्न मिळाले तर त्यातून 17,75000 रुपये रोपे, ठीबक व इतर खर्च वजा जाता 19,25000 (एकोणीस लाख पंचवीस हजार रुपये) निव्वळ नफा मिळाला.
खजूर शेती दृष्टीक्षेपात
* साडेसात एकरात 450 झाडे * उत्तीसंवर्धीत रोपे प्रती रोप 3500 रुपये दराने खरेदी
* खजूरास तिसर्या वर्षीच फळधारणा * वर्ष 2019 पासून उत्पादनास सुरुवात,
* प्रती झाडास लगडलेत 7 ते 8 खजूराची घडे,
* दोन वर्षांच्या हंगामात 15 टनाचे उत्पादन तर यंदा 30 टन अपेक्षित.
* ओल्या फळांना मिळतोय 200 रुपये प्रति किलो दर.
* सर्व खजूर झाडांना शेणखताची मात्रा, त्यामुळे दर्जेदार सेंद्रिय खजूर उत्पादन.
* वर्ष 2019 ला साडेसहा एकरवर 350 खजूर रोपांची नव्याने लागवड.
* आतापर्यंतच्या खजूर विक्रीतून मिळाले 19 लाख 25 हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न.
खजूर शेती पाहून अनेक शेतकरी वळाले लागवडीकडे
जावळे पाटील बंधूंची खजूर बाग ही मुख्य रस्त्यालगत असल्याने येणार्या जाणारांचे लक्ष वेधून घेत असल्याने हे अनोखे पीक पाहण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. त्यामुळे जाणकार शेतकरी आपली गाडी थांबवून खजूर बाग फिरुन पाहतात व या पिकाविषयी माहिती विचारतात. आलेल्या शेतकर्यांना ते संपूर्ण माहिती देतात. यावरुन ही खजूर बाग पाहून प्रेरीत झालेले पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर, माजी आयुक्त उमाकांत दांगट, शेतकरी नेते पाशा पटेल यांनी आपल्या शेतीत खजूराची लागवड केली आहे. शिवाय असोला येथील काही शेतकर्यांनी 50 एकरवर खजूर लागवड केली आहे. पुढील वर्षी त्याचे उत्पादन चालू होईल. या सर्व शेतकर्यांना खजूर उत्पादक शेतकरी अनंतराव जावळे पाटील वेळोवेळी मार्गदर्शन करतात. शिवाय खजूर बागेस परभणी कृषी विद्यापीठाचे डॉ. अशोक ढवण, कृषी खात्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले, परभणीचे सर्व जिल्हाधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिक्षक यांनी भेटी देऊन त्यांची या खजूर पिकाच विस्तार केल्यामुळे प्रशंसा केली.
फळबाग व भाजीपाला पिकातून शाश्वत उत्पन्न
खजूर शेती शेतकर्यांना अनेक वर्षे लक्षावधी रुपयात उत्पन्न मिळवून देणारी आहे. आता शेतकर्यांनी कृषी शास्त्रयुक्त पध्दतीने विकेल तेच पिकवून आधुनिक शेती केली तर शेती व्यवसाय नक्की सुखकर आहे. सुरुवातीला खर्च येईल पण नंतर हमखास अधिक उत्पन्न मिळते. पारंपरिक पिकापेक्षा फळबाग व भाजीपाला पिकातून शाश्वत उत्पन्न मिळतेच त्याचीच कास शेतकर्यांनी धरुन तोट्यात जाणारी शेती नफ्यात आणावी.
– अनंतराव नारायणराव जावळे,
रा. असोला. ता. जि. परभणी. मो. 9403062299.