गोठा चांगला असेल तर दुधाळ गायी व म्हशींचे स्वास्थ्य चांगले राहते. सुधारित पद्धतीमुळे गोठ्यातील कामे सहजपणे होतात, मनुष्यबळ कमी लागते, तसेच जनावरांचे दुग्ध उत्पादनही वाढते.
गोठा बांधताना शेतातील उंचावर असलेली कठीण व सपाट जागा निवडावी, जेणेकरून गोठ्यातील मल-मूत्र, सांडपाणी याची विल्हेवाट व्यवस्थित लावता येईल. चार्यासाठी योग्य प्रकारची गव्हाण आणि प्रत्येक जनावरास हालचालीसाठी पुरेशी जागा मिळेल याची काळजी घ्यावी. गोठ्याचे छत योग्य उंचीवर आणि न गळणारे असावे. गोठ्यात भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील अशी व्यवस्था असावी.
गोठ्यातील गटार, गव्हाण, दिशा आणि सूर्यप्रकाश
गोठ्यातील गटार, गव्हाण व जनावरांना उभे राहण्याच्या जागेवर भरपूर सूर्यप्रकाश येण्यासाठी शक्यतो लांबीच्या बाजूने गोठा दक्षिण-उत्तर दिशेस असावा. गोठ्यातील जमिनीकरिता भाजलेल्या विटा किंवा दगडी फरशा असाव्यात (फारशी जास्त गुळगुळीत, घसरणारी नको). जमिनीस गव्हाणीकडून उतार दिलेला असावा. जनावरांना योग्य पद्धतीने चारा खाता येईल, या पद्धतीने गव्हाण बांधावी. गव्हाणीचा पृष्ठभाग गुळगुळीत आणि काठ गोलाकार असावा. गोठा हवेशीर राहील या पद्धतीने भिंतीचे बांधकाम करावे. गोठ्यातील छत वजनाने हलके, कठीण व टिकाऊ असावे. जनावरांना ताजे व स्वच्छ पाणी सदैव उपलब्ध राहण्यासाठी टाकी काँक्रिटमध्ये बांधून घ्यावी. जनावरांचे शेण-मूत्र जमा करण्यासाठी गोठ्याच्या कडेने योग्य आकाराचे गटार करावे. गोठा बांधताना पशुतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
गोठयात जनावर बांधण्याच्या पद्धती
जनावरांना गोठ्यात बांधताना शेपटीपुढे शेपटी (टेल टू टेल) या पद्धतीने बांधता येतात. जनावरांना धुण्यासाठी व दूध काढण्यासाठी दोन्ही ओळींमधील जागा अधिक उपयोगी पडते. जनावराचे तोंड बाहेरच्या बाजूस असल्याने संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता कमी असते, तसेच बाहेरच्या बाजूने ताजी हवा मिळते. दूध काढणार्यांवर देखरेख करणे सोपे जाते. माजावरील जनावरे सहज ओळखता येतात. मजूर कमी लागतात.
तोंडाकडे तोंड (माऊथ टू माऊथ) पद्धत
तोंडाकडे तोंड करून बांधलेल्या जनावरांचे योग्य पद्धतीने निरीक्षण करता येते. गोठ्याच्या दोन्ही बाजूस मोकळी जागा असल्यामुळे सूर्यप्रकाश भरपूर मिळतो. जनावरांना चारा व पाणी टाकणे सोपे जाते. याशिवाय स्वच्छता राखली गेल्याने विविध रोगप्रसार कमी प्रमाणात होतो.
दुभत्या गाईंना आरोग्यदायक थंडी, ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण करणारा गोठा हवा असतो. दुभत्या संकरीत जनावरांना अधिक आजारांची उत्पत्ती ही अस्वच्छ गोठयामुळे होत असते हे लक्षात घ्यावे. साधारणत: पाच गाईंसाठी 20 फूट लांब व 8 फूट रुंद अशी 160 चौ. फूट जागा लागते.
गोठा बांधताना...
गोठा बांधताना तो पूर्व – पश्चिम दिशेस लांब असा बांधावा. ऊन, वारा, पावसापासून संरक्षण होण्यासाठी समोरच्या बाजूच्या भिंतीची उंची 6 फूट तर पाठीमागील बाजूच्या भिंतीची उंची 6 ते 7 फूट ठेवावी. पैशांच्या उपलब्धतेप्रमाणे दगड किंवा विटाची भिंत बांधून घ्यावी. त्यावर सिमेंटचे अथवा चुन्याचे प्लॅस्टर करावे. त्यामुळे गोचिडांना राहण्यासाठी अथवा अंडी घालण्यासाठी जागा मिळत नाही. समोरील भिंतीलगत 2 फूट रुंद, 2 फूट उंच आणि आतून दीड फूट खोल गव्हाण बांधून घ्यावी. दर चार फुटावर लोखंडी अँगल्समध्ये एक कडी गाय बांधण्यासाठी बसवून घ्यावी.
गोठ्याची उंची सर्वसाधारणपणे 10 ते 12 फूट ठेवावी. गोठ्याच्या समोरील व पाठीमागील भिंतीच्या वरील मोकळ्या भागाला चेनलिंक जाळी बसवून घ्यावी. जमिनी मुरूमरहीत किंवा शक्य असल्यास कोबा, फरशी, घडवलेल्या दगडाची करता येते. गव्हाणीपासून जमिनीला साधारण 1 फुटास 1/2 इंचाचा उतार द्यावा. शेवटी गटार असावी. गोठ्यातील जनावरांना ताज्या व स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी. शेणखताचे खड्डे किंवा उकिरडा गोठ्यापासून दूर अंतरावर असावा.
1) गोठ्याची स्वच्छता- गोठा स्वच्छ असला पाहिजे. खेळती हवा व भरपूर सूर्यप्रकाश येईल अशी गोठ्याची रचना असावी. दूध काढण्याची जागा स्वच्छ असावी. दूध काढताना जमिनीवर कुठलाही कचरा अगर शेण असू नये. गोठा निर्जंतुक पाण्याने स्वच्छ धुवावा, त्यामुळे धूळ उडणार नाही. जमिनीपासून चार-पाच फुटांपर्यंत चुना लावावा, त्यामुळे गोठा जंतूविरहित राहतो; तसेच गोमूत्र व पाणी निचरा होईल अशी गोठ्याची रचना असावी. गोठ्याबरोबर शोषखड्डा करून त्यात मलमूत्र साठवावे, त्यामुळे डास होणार नाहीत.
2) जनावरांची स्वच्छता- दुधाची धार काढण्यापूर्वी जनावरांस पाण्याने स्वच्छ धुवावे. त्यानंतर शिफारशीत जंतुनाशकाच्या द्रावणाने कास व कासेजवळील भाग, सड स्वच्छ धुवावेत. कोरड्या फडक्याने कास पुसून घ्यावी. जेणेकरून कास व कासेच्या भागातील बारीक केस, धूळ दुधात पडणार नाही.
3) दोहन करणार्या व्यक्तीची स्वच्छता- दूध काढणारी व्यक्ती स्वच्छ व निरोगी असणे आवश्यक आहे. त्याची नखे वाढलेली नसावीत, त्याचे कपडे स्वच्छ असावेत. दूध काढण्यापूर्वी त्या व्यक्तीने साबण किंवा सोड्याने हात स्वच्छ धुवावेत. धार काढताना शिंकणे, थुंकणे, खोकणे, तंबाखू खाणे इत्यादी गोष्टी वर्ज्य कराव्यात. आजारी किंवा जखमा असलेल्या जनावरांचे दूध वेगळ्या भांड्यात अगर शेवटी काढावे.
4) दुधाच्या भांड्याची स्वच्छता- दूध खराब होण्याचे किंवा प्रत खालावण्याचे प्रमुख कारण म्हणजे भांड्यांमुळे रोगजंतूंची मोठ्या प्रमाणावर वाढ होते. हे टाळण्यासाठी भांडी प्रथम थंड पाण्याने धुऊन घ्यावी. नंतर गरम पाण्यात सोडा टाकून धुवावीत. धार काढण्याच्या बादल्या, किटल्या, चरव्या, कॅन यांना कमीत कमी कोपरे असावेत.
5) दूध काढण्याची पद्धती- सर्वसाधारणपणे सडाच्या भोवती चार बोटे लावून अंगठा दुमडून दूध काढतात, त्यामुळे सडांना इजा होण्याची, कासदाह होण्याची शक्यता अधिक असते. याउलट पूर्ण हाताचा वापर ही सर्वांत योग्य व चांगली पद्धत आहे. यामध्ये अंगठा न दुमडता पाचही बोटांत (मुठीत) सड पकडून धारा काढल्या जातात.
6) दूध काढल्यानंतर घ्यावयाची काळजी- दूध काढल्यानंतर स्वच्छ गाळणीने गाळून घ्यावे, यामुळे दुधातील घाण, कचरा वेगळा होतो व प्रत राखण्यास मदत होते. दूध उन्हाळ्यात बर्फात व हिवाळ्यात थंड पाण्यात साठवून लवकरात लवकर संकलन व शीतकेंद्रात पाठवावे, तसेच दुधाची वाहतूक करणारे टँकर निर्जंतुकीकरण मिश्रणाने स्वच्छ करावेत व ते वातानुकूलित असावेत.
(स्रोत :- अॅग्रोवर्ल्ड प्रकाशन)
Very nice information about clean milk production.
Ok