रांगडा कांदा लागवडीसाठी शिफारशीत जातींची निवड करावी.
जळगाव (प्रतिनिधी) –
गादीवाफ्यावर रोपवाटिका तयार करावी. साधारणपणे साधारणतः गव सप्टेंबर ते आॅक्टोबर महिन्यात ३० ते ४० दिवसांच्या रोपांची पुनर्लागवड करावी. गादीवाफ्यावर रोपांची पुनर्लागवड केल्याने चांगली वाढ होते. कांदा लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी तसेच जमिनीचा सामू ६ ते ७.५ च्या दरम्यान असावा. जमिनीत चुन्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त असणारी, पिवळ्या मातीचे थर असणारी तसेच चिबड जमीन कांदा उत्पादनासाठी टाळावी.
जानेवारी ते मार्च या काळात उशिरा खरिपातील म्हणजेच रांगडा कांदा बाजारात येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळू शकतो. रांगडा कांदा लागवडीपासून दर्जेदार उत्पादन मिळते. प्रतिहेक्टरी दहा किलो बियाणे लागते. बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्के पेक्षा कमी नसावी. लागवडीपूर्वी प्रतिकिलो बियाणास थायरम किंवा कार्बेन्डाझिम दोन ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. रोपवाटिकेत गादीवाफ्यावर बियाणे हे साधारणतः अर्धा ते एक सेंटिमीटर खोलीवर पेरावे. मातीमिश्रित बारीक शेणखत किंवा गांडूळ खताने झाकून त्यावर हलकेसे पाणी द्यावे.

रोपांच्या चांगल्या वाढीसाठी गादीवाफ्यात शेणखत मिसळावे. तसेच, प्रतिचौरस मिटर क्षेत्राला दोन ग्रॅम नत्र, १ ग्रॅम स्फुरद आणि १ ग्रॅम पालाश ही खत मात्रा द्यावी. साधारणतः सप्टेंबर ते आॅक्टोबर महिन्यात ३० ते ४० दिवसांच्या रोपांची पुनर्लागवड केली जाते. रोप काढणीपूर्वी रोपवाटीकेत हलकेसे पाणी द्यावे. जेणे करून रोपांच्या मुळांना कमी इजा होईल. रोपस्थानांतरण दरम्यान रोपांचे एक तृतीआंश शेंडे कापावेत, जेणेकरून रोपे शेतामध्ये योग्य रीतीने रूजण्यास मदत होईल.
रोप प्रक्रिया.
रोपांची पुनर्लागवड करण्यापूर्वी रोपांची मुळे कार्बोसल्फान (२ मि.लि.l प्रतिलिटर पाणी) आणि कार्बेन्डाझिम (१ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) या द्रावणात दोन तास बुडवून ठेवल्याने फुलकिडे आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव होत नाही.
लागवड पद्धत
रूंद सरी वरंबा पद्धत ही कांदा लागवडीसाठी सपाट जमिनीपेक्षा पाणी निचरा होण्याच्या दृष्टीने योग्य ठरते. लागवडीसाठी १२० सें.मी. रुंदीचा गादीवाफा करावा. गादीवाफ्यावर १० सें.मी. बाय१० सें.मी. अंतराने लागवड करावी.

खत व्यवस्थापन
हेक्टरी ८ ते १० टन कुजलेले शेणखत किंवा ४ ते ५ टन गांडूळ खत किंवा निंबोळी ढेप द्यावी.
रासायनिक खताची मात्रा ः १५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश आणि ३० किलो सल्फर प्रतिहेक्टरी द्यावे. नत्राची मात्रा तीनवेळा विभागून द्यावी. पहिली मात्रा लागवडीच्या वेळी (५० किलो/हे.), दुसरी मात्रा लागवडीनंतर ३० दिवसांनी (५० किलो/हे.) व तिसरी मात्रा लागवडीनंतर ४५ दिवसांनी (५० किलो/हे.) द्यावी.
पाणी व्यवस्थापन.
ठिबक सिंचनाने पाणी द्यावे. विद्राव्य खतमात्रासुद्धा पीकवाढीसाठी फायदेशीर ठरते. लागवडीनंतरच्या नत्राच्या २/३ मात्रा ही आपण रोप स्थलांतरानंतर ६० दिवसापर्यंत आठवड्याच्या अंतराने देऊ शकतो.
रांगडा कांद्यासाठी जाती ः
भीमा रेड (लाल), भीमा राज (गडद लाल), भीमा शक्ती (लाल) आणि भीमा शुभ्र (पांढरा) या जाती कांदा व लसूण संशोधन संचालनालयातर्फे प्रसारित. फुले समर्थ (गडद लाल) आणि बसवंत ७८० (लाल) या जाती महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे प्रसारित. अॅग्रीफाउंड व्हाईट (पांढरा) ही जात राष्ट्रीय उद्यानविद्या संशोधन व विकास प्रतिष्ठातर्फे प्रसारित. जानेवारी ते मार्च या काळात उशिरा खरिपातील म्हणजेच रांगडा कांदा बाजारात येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळू शकतो. रांगडा कांदा लागवडीपासून कमी वेळात अधिक आणि दर्जेदार उत्पादन मिळते. रांगडा कांद्याची उत्पादकता (३५ ते ४० टन/हे.) ही खरिपातील उत्पादकतेपेक्षा (८ ते १० टन/हे.) पेक्षा जास्त आहे.
(सौजन्य – मिरची व भाजीपाला संशोधन केंद्र, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

कांद्याविषयी उत्कृष्ट माहीत आहे