स्टोरी आउटलुक दररोज ५ लाख लिटर्स सांडपाणी शेतात मुरविले जाते. ७० एकरात १ लाख केळी लागवड. ३० एकरात विविध फळबाग व भाजीपाला लागवड पाण्याचा प्रत्येक थेंबाचा काळजीपूर्वक वापर रस्त्याच्या कडेच्या झाडांसाठी ठिबकचा वापर केळीपासून प्रती झाड २४० रु उत्पन्न स्वप्नवत आखीव रेखीव शेती
उत्तर महाराष्ट्रातील रावेर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार तथा रुग्ण सेवेसाठी नामांकित असे गोदावरी रुग्णालयाचे डॉ उल्हास पाटील यांनी सांडपाण्याचा वापर शेतीसाठी करून तब्बल एक लाख केळी खोड लागवड केली आहे. त्यांनी तब्बल १०० एकर क्षेत्रावर शेतीसाठी या सांडपाण्याचा वापर करून ७० एकर केळी, १५ एकर भाजीपाला, २ एकर चिकू, १ एकर आंबा, १ एकर निंबू, मोसंबी व पेरू ३ एकर व इतर अशी जवळपास १०० एकर जमीन सूक्ष्म सिंचनाखाली आणली आहे. जळगांव भुसावळ रोडवर डॉ. उल्हास पाटील यांचे गोदावरी फाउंडेशनचे डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे. या ठिकाणी दररोज जवळपास शेकडोच्या संख्येने विद्यार्थी व रुग्ण यांची गर्दी असते. साहजिकच या सर्व लोकांमार्फत लाखो लिटर्स पाणी या ठिकाणी वापरले जाते. येथे असलेले रुग्णालय, वस्तीगृह व कॉलेजमध्ये विविध कामासाठी पाण्याचा वापर केला जातो. डॉ. उल्हास पाटील यांनी दूरदृष्टीने या सांडपाण्याचा पुनर्वापर केला आहे. जलसंधारण राष्ट्रीय महामार्ग क्र.०६ पासून व त्यापलीकडील शेतातून येणारे नैसर्गिक पावसाचे पाणी व सांडपाणी हे त्यांनी एका मोठ्या खड्ड्यात अडविले आहे, त्यातून त्याला नैसर्गिकरीत्या उताराने खाली शेतात लहान लहान नाला बंडिंग करून वाहते केले. शेतातून जाणाऱ्या नैसर्गिक वळणाचा वापर त्यांनी नाला म्हणून केला आहे. याचप्रमाणे सांडपाणी देखील एका खड्ड्यात जमा करून त्याचा वापर हा स्थानिक बागेसाठी केला जातो आणि शिल्लक राहिलेले पाणी हे नैसर्गिकरीत्या खालील बंधाऱ्यात वाहत जाते. शेतात तीन ठिकाणी पाणी अडविल्याने त्याचे अपोपाच नैसर्गिकरीत्या शुद्धीकरण होऊन शेवटच्या शेततळ्यात शुद्ध स्वरुपात पाणी जमा होते.या प्रक्रियेत जवळपास दररोज ५ लाख लिटर्स पाणी जमिनीत मुरविले जाते. या जमिनीतील मुरविलेल्या पाण्यामुळे १४ कुपनलिका व दोन विहिरींना उन्हाळ्यातही मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. या पाण्याचा वापर करतांना त्यांनी तुषार सिंचन, ठिबक सिंचन या दोन्ही प्रणाली राबविल्या आहेत. रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडे असो किंवा शेतातील केळी, सर्वच १०० एकर क्षेत्राला त्यांनी ठिबक संच वापरला आहे. प्रत्येक कूपनलिकेजवळ दोन मजली मनोरा हा देखरेख व साहित्य साठवण्यासाठी बांधण्यात आला आहे. सद्यस्थितीला ५५ डाय मीटर साईजच्या विहीरचे काम सुरु आहे.
केळी लागवड व खत व्यवस्थापन जवळपास ७० एकर क्षेत्रावर पाटील यांनी G-9 जातीची टिशूकल्चर केळी विविध टप्प्यात लागवड केली आहे. यामध्ये मार्च २०१९ मध्ये ३००००, जून २०१९ मध्ये ३००००, ऑगस्ट २०१९ मध्ये २००००, तर जानेवारी २०२० मध्ये २०००० रोपांची लागवड ५.५ X ६ फुट व ५ X ५.५ फुट अंतरावर लागवड केली आहे. लागवडीपूर्वी स्वतःच्याच गोठ्यात उपलब्ध असलेल्या शेणखताचा वापर करीत एकरी १० ट्रॉली शेणखत टाकले त्याचबरोबर बेसल डोस म्हणून एकरी फॉस्पेट २५० की.ग्रॉ, प्लांन्टो ग्रानुअल १०० की.ग्रॉ, दिले. लागवडी नंतर लागलेच दुसऱ्या दिवशी ह्युमिक + १९:१९:१९ ड्रीचीग करून दोन वेळा दिले. पुढे प्रत्येक १५ दिवसांनी एकूण ६ वेळा ह्युमिक दिले. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा काळजीपूर्वक वापर करणाऱ्या पाटील यांच्या शेतात दररोज केळीसाठी दोन तास पाणी ठिंबक संचाने देतात. त्याचबरोबर विद्रव्ये खते सुद्धा ठिंबक संचाने दिली जातात. यामध्ये युरिया ५ की.ग्रॉ, पोटॅश की.ग्रॉ, १२:६१:०० २ की.ग्रॉ,मॅगनेिशयम २ की.ग्रॉ व ००:००:५० २ की.ग्रॉ एकरी याप्रमाणात दिले जाते. यामुळे मजुरीचा खर्च व वेळ वाचतो. कीड रोग नियंत्रण फवारणी वेळापत्रक प्रत्येक ५ दिवसांनी १९:१९:१९ २५ की.ग्रॉ, मायक्रोन्यूटन ३० मिली. बयोझाईम ३० मिली, मॅगनेिशयम १० ग्रॉ, प्रती पंपास याप्रमाणे ५-६ दिवसांनी फवारणी केली जाते. प्लांट केअर प्लांट केअर करतांना इमिडाक्लोरोप्रिड, बाविस्टीन व इतर स्थानिक PGR दर १५ व्या दिवशी फवारणीसाठी वापरले जाते, त्यामुळे पिकावर येणारे थ्रीप्सला अटकाव होतो.
फ्रुटकेअर लागवडी नंतर ६ व्या महिन्यात झाडाला फुलधारणा सुरु होते त्यावेळी नुकत्याच उमललेल्या कमळाला इमिडाक्लोरोप्रिड १० मिली प्रती पंप वापरले जाते. हे औषध कमळाला इंजेक्ट केले जाते. त्यानंतर झाडाला माहितीसाठी वेगवेगळ्या रंगाची स्टीकर चिकटवली जातात. ७ व्या महिन्यात फलधारणा झाल्यानंतर प्रती झाड ८ फणी ठेऊन बाकीच्या फळांना तोडून टाकल्या जाते. त्यामुळे राहिलेल्या फळांना संतुलित मात्रेत अन्नपुरवठा मिळून चांगल्या प्रतीचे फळ मिळते. पुन्हा एकवेळा इमिडाक्लोरोप्रिड ची मात्रा थ्रीपच्या अटकावसाठी दिली जाते. त्यांनतर घडांना संरक्षणासाठी स्कर्टीग बॅग टाकली जाते. अंतरमशागत पाटील यांच्याकडे गोठ्यातील जनावरांचे शेणखत वापरून गोबर गॅसद्वारे गॅस तयार केला जातो. गोबर गॅस मधून निघालेल्या स्लरीचा वापर हा केळीच्या बागेत केला जातो. त्यासाठी चार मोठ्या टाक्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. साधारणतः ४-५ व्या महिन्यात दर १५ दिवसांनी वाढलेले पिल मजुरामार्फत कापले जातात. उत्पादन लागवडी नंतर १२ व्या महिन्यात केळी काढणीला सुरुवात केली जाते. आता मार्च २०१९ मध्ये लागवड केलेल्या झाडांचे उत्पादन सुरु झाले आहे. त्याची विक्री बुऱ्हानपूर येथील व्यापाऱ्यांना जागेवरून केली जाते. आतापर्यंत सरासरी १२०० रु च्या भावाने विक्री झाली आहे. प्रती घडाचे सरासरी वजन हे २० कि.ग्रा. मिळाले त्याप्रमाणे एकरी १३२० झाडापासून ३.१० लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. खर्च श्री सतीश सावके संचालक उद्यानविद्या यांनी सर्व शेतीचा ताळेबंद हा व्यवस्थितपणे मांडलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे प्रती झाड खर्च व उत्पन्न हे लिहिलेले आहे. त्यांच्या ताळेबंदानुसार प्रती झाडापासून २४० रु उत्पन्न मिळाले आहे. त्याचप्रमाणे खर्चाचा विचार केल्यास प्रती झाड १०० रु खर्च होतो. त्यामध्ये शेणखत २० रु ,रासायनिक खत ३० रु., फ्रुट केअरसाठी २० रु, ड्रीप इरिगेशन साठी १० रु ( एकरी १५-२० हजार), प्लांट केअर साठी १० रु, मजुरी १० (निंदनी, साफसफाई इ.) व इतर असा १०० रु खर्च केला जातो. मजूर व्यवस्थापन या सर्व कामासाठी डॉक्टरांनी काटेकोरपणे नियोजन केले आहे. प्राचार्य श्री सतीश सावके संचालक उद्यानविद्या यांच्या देखरेखीखाली सहा सुपरवायझर व ४० मजुरांच्या सहायाने ( २० महिला व २० पुरुष ) या सर्व शेतीचे कामकाज चालते. साधारणपणे १५ हजार झाडांना एक सुपरवायझर या प्रमाणे हि नियुक्ती असून, डॉ उल्हास पाटील दररोज सकाळ-संध्याकाळ २-२ तास शेतात पाहणीसाठी हजर असतात. संपूर्ण मजुरांना राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
स्वप्नातील आखीव रेखीव शेती डॉ. पाटील यांनी संपूर्ण शेतीला प्रशस्त रस्ते, विविध दिशादर्शक फलक आणि कोणत्या शेतात किती व कोणते पिक लागवड केले आहे त्याची तारीख व शेताचा नकाशा या बाबी नमूद केल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक कूपनलिकेला क्र. दिला असून त्यामुळे कामकाज करणे सुरळीत जाते. रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवड करतांना त्यांनी स्थानिक व पारंपारिक वृक्षांना प्राधान्य दिले असून त्यात वटवृक्ष तर बांधावर बांबू सारख्या वनस्पतीला स्थान आहे. शेताच्या प्रत्येक कोपऱ्यात जाण्यासाठी पक्क्या रस्त्याची सुविधा आहे. आताचे नियोजन येत्या दोन वर्षात डॉ. उल्हास पाटील यांची शेती एक आदर्श मॉडेल म्हणून नावारूपास येईल यात शंका नाही.
सचिन धोंडु बोरसे
सचिन धोंडु बोरसे
सचिन धोंडु बोरसे