पुणे : राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट सर्वांसमोर उभे असताना दुसरीकडे शेतकऱ्यांसमोर सध्या टोळधाडीचे संकट आले आहे. या संकटांशी सामना करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. आतापर्यंत टोळधाड किड्याचा नायनाट करण्यात 50 टक्के यश आले आहे. ज्या भागात हे संकट उभे राहील त्या भागात अग्निशमन बंब आणि ड्रोनच्या माध्यमातून कीटकनाशक फवारणी करून हे संकट दूर करण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वाधिक नुकसान कृषी विभागाचे झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊनची आणखी आवश्यकता भासल्यास त्यातून कृषी क्षेत्र वगळले जाणार असल्याचे म्हटले आहे. तसेच कृषी विभागाने यापूर्वीच शेतकऱ्यांना सूट दिलेली आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना आणखी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
संपूर्ण राज्यात, देशात कोरोनाचा शेती व्यवसायाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फटका बसलेला असताना शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडण्याची शक्यता कृषी विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांवर टोळ धाडीच हे संकट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सुरक्षेचे उपाय राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मध्यप्रदेशकडून महाराष्ट्र – मध्यप्रदेशाच्या सीमेलगत असलेल्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर परिसरातील शेतकऱ्यांना टोळ धाडीची भीती वर्तवण्यात आली आहे.