नाशिक (प्रतिनिधी) – टोमॅटोचे दर सप्टेंबर महिन्यात गडगडल्याने टोमॅटो उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. ज्यांचे टोमॅटो पीक उभे होते, त्यांनाही किंमतीबाबत चिंता होतीच..! मात्र, टोमॅटोच्या दरात सुधारणा झाली असून दरातील तेजी टिकून राहणार असल्याचे संकेत असल्याने उत्पादकांसाठी ही आनंदवार्ता आहे. दरातील तेजी तसेच टोमॅटोचा दर्जा व उत्पादकता वाढीसाठी घ्यावयाची काळजी याबाबत जाणून घेऊ…
1) मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 2021 च्या मे, जून, जुलै या महिन्यात मोठ्या प्रमाणावर टोमॅटो रोपांची लागवड झाली. मागील वर्षी राज्यात 52 हजार हेक्टरवर ही लागवड झालेली होती. यावर्षीची लागवड 57 हजार हेक्टरहून अधिक झाली आहे.
2) सुरवातीच्या काळात पावसाने बराच काळ ओढ दिली. दरवर्षी या काळात पावसामुळे 30 ते 40 टक्के पिक खराब होते. यंदा ते झाले नाही. परिणामी पिक चांगल्या स्थितीत राहिले व पुढे ते एकाच वेळी बंपर उत्पादन बाजारात आले.
3) याच काळातील पाऊस तसेच कोविडचे वातावरण याचाही या बाजारावर परिणाम झाला. सप्टेंबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर टोमॅटोचे दर गडगडले. ही परिस्थिती पहिल्या 2 ते 3 आठवड्यांपर्यंत तशीच टिकून राहिली.
4) त्यानंतर मात्र हळूहळू दरात सुधारणा सुरु झाली. या घटनेच्या 1 महिन्यानंतर मात्र दरात किमान 10 पटीने वाढ झाल्याचे चित्र बाजारात दिसून आले.
5) मे, जुन, जुलै या 3 महिन्यांच्या काळात टोमॅटोची जी लागवड झाली होती त्यातील 85 टक्के लागवड ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात खराब झाली असून हे पिक संपण्याच्या मार्गावर आहे.
6) नाशिक भागात नागपंचमीच्या दरम्यान जी लागवड होते. ती मागील वर्षीच्या तुलनेत 10 ते 15 टक्के जास्त आहे. उशिरा येणाऱ्या वळवाच्या पावसाने या पिकाला चांगलेच झोडपले आहे. या लागवडीचे 30 ते 35 टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. आता पावसाची शक्यता कमी असली तरी अजून जर पाऊस झाला तर मात्र टोमॅटोचे 50 टक्क्यांपर्यंत नुकसान होईल. या परिस्थितीत नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान मार्केट मध्ये टोमॅटोचा तुटवडा निर्माण होईल.
7) ‘सह्याद्री फार्म्स’चे व्यवस्थापक (भाजीपाला व्यवहार) दिनेश लगड यांच्या मते नोव्हेंबरमध्ये ज्या लागवडी होतील, त्यांनाही चांगले दर मिळू शकेल, अशी स्थिती आहे.
8) जोरदार पावसाच्या तडाख्यातून टोमॅटोचे जे पीक वाचले आहे, त्याची चांगली काळजी घेणे महत्वाचे आहे. अर्थात त्या दृष्टीने टोमॅटो उत्पादक प्रयत्नांची शिकस्त करतांना दिसतही आहेत.
ज्ञानेश उगले,
सह्याद्री फार्म्स, मोहाडी, जि. नाशिक (7030931058)
टोमॅटोचा दर्जा व उत्पादकता वाढण्यासाठी पुढील प्रमाणात काळजी घ्यावी…
राज्यातील बहुतांश भागात टोमॅटोचा हंगाम सुरु झाला आहे. याच काळात थंडी पडू लागली आहे. पानांवर फळांवर दव साचत आहे. कमी झालेल्या तापमानामुळे झाडातील अन्नद्रव्य वहनात अडचणी येऊ शकतात. यावेळी जैविक खते तसेच शेणस्लरीचा वापर करणे उपयुक्त ठरेल. फळाच्या चांगल्या आकर्षक रंगासाठी सल्फरचा जमिनीतून तसेच फवारणीतून वापर करावा. या स्थितीत वाढणाऱ्या लालकोळी या किडीच्या नियंत्रणासाठीही सल्फरचा चांगला उपयोग होईल. नागअळी या किडीचा प्रादुर्भाव या काळात वाढतो. त्यासाठी अनेक चांगली प्रमाणित कीडनाशके बाजारात उपलब्ध आहेत. त्यांचा शिफारशीनुसार योग्य प्रमाणात वापर करावा. फळाच्या चांगल्या आकारासाठी झाडात योग्य प्रमाणात पोटॅश असणे गरजेचे आहे. पिकाला पोटॅशची कमतरता जाणवणार नाही याची काळजी घ्यावी. या काळात योग्य पाणी नियोजनही महत्वाचे आहे.
– प्रा. तुषार उगले
के. के. वाघ अॅग्रीकल्चर कॉलेज नाशिक