उष्णतेची लाट ओसरली आता ऊन-सावलीचा खेळ.

प्रतिनिधी: राज्यात मागील १५ दिवसापासून उन्हाचा चटका वाढला होता. त्यातच मागील आठवड्यात तीव्र उष्णतेची लाट राज्यात आली होती. परंतु हवामान खात्याच्या नवीन अंदाजानुसार या उष्णतेच्या लाटेपासून काहीसा दिलासा मिळणार असून, आगामी जून महिन्यापासून राज्यात ऊन-सावलीचा खेळ सुरु होऊन मंगळावारपासून( २जुन) पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे.
राज्यात उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तापमान हे ४२ ते ४५.५ अंश सेल्सिअस पर्यंत गेले होते. परंतु आत पूर्वमोसमी पावसाला पोषक असे वातावरण होत असून उन्हाचा चटका कमी झाला आहे. त्यामुळे जोरदार वादळी वारे वाहून राज्याच्या बहुतांश भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. २ ते ४ जून रोजी उत्तर महाराष्ट्र व विदर्भात जोरदार पूर्व मोसमी पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पूर्व मोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग येईल.

पेरणीची घाई नको.
काल दि.२९ रोजी मान्सूनने मालदीव व अंदमान निकोबार बेटांचा परिसर व्यापला असून १ जून रोजी केरळात मान्सूनचे आगमन नक्की आहे असे हवामान खात्याने स्पष्ट केले. जरी राज्यात मान्सून पूर्व सरी कोसळल्या तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये मान्सूनचा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी अशा सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत.
