गिनी गवत
हे बहुवर्षायू गवत मूळचे उष्णकटिबंधीय आफ्रिकेतील आहे. भारतात सन 1800 च्या सुमारास याची प्रथम लागवड करण्यात आली. जगातील बर्याच उष्णकटिबंधीय देशात याची लागवड केली जाते. वेस्ट इंडिजमध्ये या गवताची बरीच लागवड आहे. गिनी गवत 60 ते 200 सें.मी.पर्यंत उंच असते. 780 ते 1797 मि.मी. पावसाच्या प्रदेशात हे गवत वाढू शकते. हे बर्याच प्रकारच्या जमिनींवर वाढू शकते. परंतु हलक्या नापीक जमिनीवर गवताची वाढ हळू होते. पाण्याचा निचरा चांगला असल्यास आम्लयुक्त जमीन चालते. क्षार असलेली जमीन गवताला चालत नाही. याची मुळे जमिनीत खोल जातात. त्यामुळे गिनी गवत अवर्षणाचा प्रतिकार चांगल्या प्रकारे करते.
दीर्घकाळ पाऊस पडला नाही, कडक अवर्षण पडले तर हे मातीत सुप्तावस्थेत राहते आणि पाऊस आल्यावर त्याची नव्या जोाने पुन्हा फूट होते. गिनी गवताची लागवड करण्याअगोदर जमीन नांगरून तिची योग्य मशागत करणे आवश्यक असते. बी लावून किंवा गवताचे ठोंब लावून लागवड करतात. बी ओळीत पेरतात. बी 1.5 सें.मी.पेक्षा खोल पेरीत नाहीत. हेक्टरी 3-6 कि. बी लागते. एका किलोत 1750000 ते 1030000 बिया असतात. गवताचे ठोंब लावून लागवड करणे जास्त चांगले. हवामान ढगाळ असेल, पावसाची सर येण्याचा संभव असेल अशा दिवशी सरींवर 2’ु 2’ अंतरावर ठोंब लावतात. पाणी देणे शक्य असल्यास देतात. त्यामुळे गवत जास्त वेळा कापता येते. पण पाणी नियमित देण्याची आवश्यकता नाही. लावण्याअगोदर व नंतरही सेंद्रीय खत देणे जरुरीचे आहे. मुळाचे फाटे लावण्याऐवजी गवताची रोपे तयार करून त्यांची पुनर्लागण करता येते. एका हेक्टरवर तयार केलेली रोपे पाच हेक्टर क्षेत्रावर लावण्यास पुरेशी होतात. गिनी गवताबरोबर स्टायलो लावल्यास मिश्र पीक चांगले येते. याशिवाय गिनी गवताबरोबर चवळी, लसूणघास, बरसीम या शिंबीवर्गीय वनस्पती चार्यासाठी लावता येतात.
कुरणात गवत चांगले प्रस्थापित झाल्याशिवाय गुरांना चरू देऊ नये. पावसाळ्यानंतर गवताला बी धरते. बी पडेपर्यंत नवीन कुरणात गुरांना चरू देऊ नये. तसेच 35 सें.मी. गवताची उंची राहीपर्यंतच चरू द्यावे. त्यानुसार किती दिवस किती गुरांना चरू द्यायचे हे ठरवावे. पाळीपाळीने चरू देणे व काही काळ कुरण बंद करणे. असे केले तर गवताच्या वाढीवर नियंत्रण ठेवता येते. जमिनीत खूप ओल असताना गुरांना चरू देऊ नये. गुरंानी तुडवल्याने गवताचे नुकसान होऊन दलदल होईल. गवत कापून गुरांना गोठ्यात हिरवा चारा देता येतो. नियमित नांगरणी, वखरणी करून माती भुसभुशीत ठेवली आणि वर्षातून एकदा किंवा दोनदा शेणखत, कंपोस्ट घातले तर दर 3-4 आठवड्यांनी वर्षभर कापणी करता येते. साधारणपणे वर्षाला एकरी 40 टन हिरवा चारा मिळतो. परंतु सुपीक जमिनीवर उत्पन्न दुपटीने येऊ शकते. गिनी गवत हिरवा चारा, वैरण व मुरघास तिन्हीसाठी उपयोगी आहे. गवत अतिशय रुचकर असून गुरांना ते मानवते व त्यांचे वजन वाढते. दुभत्या गायी म्हशींना आणि शेतीचे काम करणार्या बैलांना व घोड्यांना याचा चारा खायला देतात. दुसर्या वर्षीच्या शेवटी, वारंवार कापण केल्यामुळे गवताची मोठी बेटे होतात. त्यासाठी एकतर गवताची लागवड दुसरीकडे पुन्हा करावी, नाहीतर कुदळ किंवा फावड्याने प्रत्येक बेटाला उभा व आडवा असे काटकोनात दोन छेद द्यावेत. त्यामुळे बेटाचे चार भाग होतील. त्यातील तीन भाग उपटून काढून टाकावेत. एक जागीच राहू द्यावा. गिनी गवत माफक सावलीत चांगले वाढत असल्याने याची लागवड फळझाडांच्या बागेतून करता येईल. आंब्याच्या झाडांच्यामधूनही गिनी गवत चांगले वाढते. शेतजमिनीवर चार्यासाठी याची मुद्दाम लागवड करणे फायदेशीर ठरेल. शेतातील पाण्याच्या चार्यांच्या कडेने लावल्यास रोज हिरवा चारा थोड्याफार प्रमाणात मिळत राहील.