जळगाव : ‘सिगाटोका’ हा केळीवर पडणारा बुरशीजन्य आजार आहे. त्याचा प्रादुर्भाव पानांच्या वजनावर व गुणवत्तेवर होतो. सुरुवातीला पानाच्या वरच्या पृष्ठभागावर पिवळे डाग पडू लागतात. त्यानंतर मोठ्या तपकिरी परिपक्व डागांमध्ये त्याचे रुपांतर होते. पिवळा करपा म्हणूनही हा आजार ओळखला जातो. आवश्यक ती काळजी घेऊन योग्य उपाययोजना केल्या तर या रोगाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य आहे.
अशी असतात रोगाची लक्षणे
मायकोस्पेरीला म्युसीकोला या बुरशीमुळे सिगाटोका हा बुरशीजन्य रोग केळीवर पडतो. झाडाच्या पानांपासून या रोगाची लागण होण्यास सुरवात होते. सुरवातीला पानांवर, शिरेस समांतर लहान लहान लांबट गोल पिवळसर ठिपके दिसून येतात. हे ठिपके वाढत जाऊन पिवळ्या रेषेच्या स्वरूपात दिसतात. अनुकूल वातावरणात हे ठिपके पिवळ्या रेषेच्या स्वरूपातून मोठ्या पूर्ण वाढ झालेल्या ठिपक्यांत रूपांतरित होतात. हे ठिपके साधारणतः एक ते दोन मि.मी.पासून दोन ते तीन सेंटीमीटर आकाराचे असतात. पूर्ण वाढलेल्या ठिपक्यांचा रंग काळपट तपकीरी असतो. कालांतराने ठिपक्याचा मध्यभाग वाळून राखाडी रंगाचा होतो. ठिपक्याभोवती पिवळसर रंगाचे वलय (कडा) दिसून येते. या रोगाचा प्रसारासाठी आर्द्रता हा अत्यंत महत्त्वाचा घटक कारणीभूत असतो. रोगाची बुरशी लैंगिक आणि अलैंगिक अशा दोन्ही प्रकारच्या बीजाणूंची निर्मिती करते. या बुरशीचे हे बीजाणू पानांच्या खालच्या बाजूने पर्णरंध्राच्या पेशीतून आत शिरून रोगाची लागण करतात. या रोगामुळे पानातील हरितद्रव्याचा ऱ्हास होऊन पाने करपतात. झाडावरील कार्यक्षम पानांची संख्या कमी होते. परिणामी, अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेत बाधा निर्माण होऊन पोषणाअभावी फळांची योग्य वाढ होत नाही. त्यामुळे केळीची फळे आकाराने लहान राहतात. फळांत गर भरत नाही. फळांचे वजन आणि दर्जा खालावतो. काही वेळा रोगाची तीव्रता वाढल्यास घडांवर परिणाम होऊन घडातील फळे अकाली पिकू लागतात. अशा फळांना बाजारात मागणी नसते.
यामुळे होतो रोगाचा प्रसार
कमी अंतरावर दाट लागवड केली, अयोग्य निचरा असलेल्या जमिनीत केळीची लागवड केली, बागेत तणांचा प्रादुर्भाव झाला, शेतात स्वच्छतेचा अभाव असला, ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचा अनियंत्रित वापर झाला, मुख्य खोडाच्या बगलेत येणारी पिले नियमित न काढता त्याकडे दुर्लक्ष केले, पीक फेरपालट केले नाही, खोडवा पीक घेण्यावर भर दिला, प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष केले तर या रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
असे मिळवा रोगावर नियंत्रण
एकात्मिक पद्धतीने सिगाटोका रोगाचे नियंत्रण करता येते. श्रीमंती या सहनशील वाणाची लागवड करावी, शिफारस केलेल्या अंतरावरच जसे १.५ मीटर बाय १.५ मीटर किंवा १.८ मीटर बाय १.८ मीटर या अंतरावर लागवड करावी. कंद प्रक्रिया केल्याशिवाय लागवड करू नये, ही प्रक्रिया करण्यासाठी प्रती १०० लिटर पाण्यात १५० ग्रॅम ऍसिफेट अधिक १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम मिसळून केलेल्या द्रावणात कंद किमान अर्धा तास बुडवून लागवड करावी. बागेत पाणी साचून राहणार नाही आणि पाण्याचा योग्य निचरा होईल याकडे लक्ष द्यावे. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देताना हवामान, झाडाच्या वाढीची अवस्था लक्षात घेऊन पाण्याची मात्रा द्यावी. बाग आणि बांध नेहमी तणमुक्त आणि स्वच्छ ठेवावेत. मुख्य खोडाच्या बगलेत येणारी पिले नियमितपणे कापावीत. शिफारस केलेल्या अन्नद्रव्याची मात्रा (२०० ग्रॅम नत्र + ४० ग्रॅम स्फुरद + २०० ग्रॅम पालाश प्रति झाड) वेळापत्रकानुसार द्यावी. रोगाची लक्षणे दिसताच पानांचा फक्त रोगग्रस्त भाग किंवा रोगग्रस्त पान त्वरित काढून जाळून नष्ट करावे. बागेत पिकाचे कोणतेही अवशेष न ठेवता नष्ट करावेत. केळी हे एकच एक पीक न घेता फेरपालट करावी. खोडवा पीक घेण्याचे टाळावे. यासारख्या उपाययोजना केल्या तर केळीवर बुरशीजन्य आजार पडत नाहीत. याशिवाय पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय म्हणन किंवा रोगाची प्राथमिक लक्षणे दिसताच क्लोरोथॅलोनिल २० मि.ली. किंवा मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड २५ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्रावणात सरफॅक्टंट १० मि.ली. प्रती लीटर या प्रमाणात मिसळावा. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास कार्बेन्डाझिम १० ग्रॅम किंवा ट्रायडेमॉर्फ १० मि.ली. किंवा प्रोपिकोनॅझोल १० मि.लि. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्रावणात सरफॅक्टंट १० मि.ली. प्रती लीटर या प्रमाणात मिसळावा. यासंदर्भात अधिक माहितीसाठी केळी संशोधन केंद्राशी संपर्क साधावा.