प्रतिनिधी / जळगांव
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या कृषी निविष्ठा मिळाव्यात आणि त्यांची फसवणूक टाळावी यासाठी कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्याना जळगाव जिल्हा सिड्स, पेस्टीसाईड व फर्टीलायझर डीलर्स असोसिएशन या संघटनेकडे नोंदणी करणे अनिवार्य करणार असल्याचा मनोदय विनोद तराळ यांनी व्यक्त केला. सिड्स, पेस्टीसाईड व फर्टीलायझर डीलर्स असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अॅग्रोवर्ल्डच्या मुख्यालयास भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
विनोद तराळ हे सिड्स, पेस्टीसाईड व फर्टीलायझर डीलर्स असोसिएशनच्या जिल्हा अध्यक्षपदी होते. जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी सदस्यसंख्या देखील तिप्पट करत 2450 पर्यंत नेली. शिवाय, जळगाव शहरात संघटनेने स्वतःच्या मालकीची 2600 स्केअर फूट जागा घेतली असून तिथे 500 लोक बसतील असा हॉलचे लवकरच निर्माण सुरू होणार असून यापासून जिल्हा संघटनेला अतिरिक्त आर्थिक उत्पन्न सुरू होईल. त्यांनी अध्यक्ष म्हणून केलेले काम तसेच कृषी केंद्र चालकांना दिलेले कायदेशीर बळ या कामगिरीची चमक पाहता त्यांची राज्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. ही निवड तीन वर्षांसाठी असेल. राज्यातील संघटनेत सुमारे 55 हजार कृषी केंद्रांची नोंदणी आहे.
बाहेर राज्यातील बोगस कृषी निविष्ठा या जिह्यात विक्री होऊ नये यासाठी शासनाच्या नियमात राहून आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विभागाप्रमाणेच या सर्व कंपन्यांना जळगाव जिल्हा संघटनेकडे त्यांच्या विक्री होणाऱ्या उत्पादनाची व कंपनीच्या विविध कागदपत्रांसह नोंदणी करण्याचा विचार असल्याचा मनोदय यावेळी त्यांनी बोलून दाखविला. जेणेकरून बोगस निविष्ठा किंवा परवानगी नसताना विक्री होणाऱ्या गोष्टींसह कंपन्यांच्या मनमानी कारभारालाही आळा घालता येईल कृषी केंद्र चालकांनाही यामुळे दिलासा मिळेल. हा यामागील प्रमुख उद्देश आहे. हाच प्रयोग मॉडेल म्हणून जळगावात यशस्वी करून राज्यातही राबविणार असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
मुंबई, पुण्यात मुक्काम व्यवस्था
राज्यातील कृषी केंद्र चालक व त्यांच्या कुटुंबीयांना बऱ्याच वेळा विविध कामानिमित्त मुंबई व पुणे जावे लागते. तेव्हा त्यांची तेथे राहण्याची गैरसोय होते. यासाठी नाममात्र शुल्कात संघटनेकडून त्यांना या शहरात निवासाची व्यवस्था करून देणार आहे. याचा प्रायोगिक तत्त्वावरील प्रयोग पुण्यातून सुरू करणार आहोत. पुण्यात गुलटेकडी येथे अप्सरा टॉकीजजवळ राज्य संघटनेची वास्तू आहे. या वास्तूतूनच याची सुरुवात करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.