पिढीदर पिढी परंपरेने चालत आलेले ज्ञान टाकाऊच असते असेही नाही.. जिथे तीन – तीन डॉक्टरांनी प्रयत्न करूनही अखेर हात टेकले तिथे हेच पिढीजात ज्ञान व अनुभव जिंकला…! हेच पृथ्वीवरचे जंगल टिकले पाहिजे, या जंगलांमधील साऱ्याच वन्यजीवांना योग्य तो आसरा मिळाला पाहिजे. उद्योग उभारण्याच्या नादात डोंगर-दऱ्यांवर अतिक्रमण होता कामा नये. जैवविविधता टिकली पाहिजे.. कारण निसर्ग हा अजब रसायन आहे, जेव्हा तुम्ही त्याला शरण जाता त्यावेळी तो तुमच्या समस्येचे निराकरण करतो. पण कोरोनाच्या निमित्ताने निसर्ग विरुद्ध मानव या लढाईचे भयंकर स्वरूप आपल्यापुढे उभे राहिले आहे. तेव्हा वेळीच सावध व्हा आणि पृथ्वीला/निसर्गाला शरण जा तरच आपण वाचू शकू, अशीच शिकवण देणारा श्री. अजित काटकर , माण जि. सातारा यांचा हा स्वानुभव त्यांच्याच शब्दात…
दुपारी तीनच्या सुमारास आमच्या खात्या पित्या म्हशीनं अचानक अंग टाकले, जागची उठेचना. वडिलांनी डॉक्टरला बोलावले, ते आले, दुधाची म्हैस म्हणून त्यांनी कॅल्शिअम कमी झाले असेल असे निदान करून सलाईन मधून कॅल्शियम आणि इतर इंजेक्शन दिली.त्यादिवशी म्हशीने दुध दिले नाही, तशी अपेक्षाही नव्हती!
सकाळी दुध दिले, पण रात्रीचे काही खाल्ले नव्हते, दोन घोट पाणी प्यायली, पण पेंड खाल्ली नाही. ठीक आहे म्हटलं, खाईल हळूहळू नऊ वाजता गोठ्याला गेलो तर म्हैस बसूनच दावणीत टाकलेला कडबा खात होती! म्हटलं, अंगात त्राण नाही, खातेय बसून तर खाऊ द्या!
थोड्या वेळाने उठली, चिकट शेंब असलेला शेणाचा पो टाकला, परत बसून रवंथ करू लागली. म्हटलं ठीक आहे, होईल बरी उद्या परवा!
त्यादिवशी तिच्या आवडीचे कुंद्याचे गवत दुसऱ्या शेतात जाऊन आणले, पुढ्यात टाकले, खाईना म्हणून चार-चार काड्या हाताने चारल्या; आणि चार वाजता तिने परत अंग टाकून दिलं !!
पुन्हा त्याच डॉक्टरना बोलावलं, त्यांनी तपासलं, आणि जंताचे औषध लिहून दिलं! डॉक्टरना सांगितले की, म्हैस औषधे खातच नाही,दुसरं काहीतरी करा,पण नाही.ते औषध पाजावेच लागेल असे त्यांनी निक्षून सांगितले!
तिघाचौघांनी मिळून, म्हैस खाली पाडून तिच्या नरड्यात औषध ओतले! सायंकाळचे दूध काढण्याचा विषयच नव्हता त्यादिवशी! तिसऱ्या दिवशी दुपारनंतर पुन्हा म्हशीने अंग टाकले, आणि डॉक्टर फोनच उचलेनात!!
दुसऱ्या डॉक्टरना फोन केला, ते आले, त्यांना सर्व काही सांगितले; त्यांनी म्हशीचे वेस्टेज रक्तात मिसळल्याचे निदान केले! दोन सलाईन, पाच सहा इंजेक्शन दिली!
दुसऱ्या दिवशी तिच रिपीट ट्रिटमेंट!!त्यानंतर म्हशीने दोन दिवस सकाळ संध्याकाळ धार दिली, थोडं खाऊपिऊ लागली.तिसऱ्या दिवशी पुन्हा तसेच, दुपारचे म्हशीने अंग टाकून दिले, आणि आता दुसरे डॉक्टरही फोन उचलेनात!
त्यादिवशी रात्र काढली कशीतरी, घरात कुणी नीट जेवलं नाही की, कुणी कुणाशी नीट बोललं नाही!!एकजण सांगून गेला, उद्या सरकारी डॉक्टरना दाखवा.सकाळीच दवाखान्यात जाऊन आलो, ते नव्हते. कंपांउंडरकडून त्यांचा नंबर घेतला.
यथावकाश त्यांना फोन केला, सर्व परीस्थिती सांगितली, ते दुपारी चारच्या दरम्यान आले! त्यांनी स्टेथोस्कोप लावून म्हैस तपासली, आणि तिला विषबाधा झाल्याचे निदान केले.पुन्हा त्यांच्या दोन सलाईन आणि पाच सहा इंजेक्शने!!पण, जाताना, त्यांनी पुन्हा कळवायला सांगितले.पुन्हा म्हैस दोन दिवस बऱ्यापैकी,पुन्हा तोच प्रकार-दुपारनंतर जागची हलेना!!ह्या सगळ्या खेळात आमची गोटिसारखी म्हैस विटीसारखी झाली!!आणि एक गोष्ट लक्षात यायला लागली, हे प्रकरण डॉक्टरच्या हाताबाहेरचे आहे! पण दुसरा पर्याय तरी काय असतो?
आणखी एकजणांनी सांगितले, म्हशीचे रक्त तपासून बघा, तिही तयारी केली, जनावरांची रक्त तपासणी लॅब माझ्या गावापासून नव्वदेक किलोमीटर लोणंदला!! म्हटलं ठीक आहे, जाऊया!!!
एका मित्राला घेऊन जे पहीले खाजगी डॉक्टर येऊन गेलेले, त्यांच्या घरीच गेलो सायंकाळी आणि उद्या सकाळी म्हशीचे रक्त आणि तुमचा रेफरन्स द्या म्हणून सांगितले!त्यांनी काहीश्या निर्वाणीच्या आणि समजावणीच्या भाषेत सांगितले,”काही उपयोग होणार नाही!”
आपली म्हैस मरणार यावर शिक्कामोर्तब करून घेऊन घरी आलो!घरात कुणाला काही बोललो नाही!कारण मनाची तयारी करायची होती, आपली लाडकी गौरी फक्त मेलेली दिसावी, मरताना नको,तिला मग उचलायची कशी,फेकून द्यायची की पुरायची? असलेच विचार मनात आणि मनाची वेगळीच ससेहोलपट!वडील विचारायचे, डॉक्टर येतात का, मी जवळच्या मित्राला डॉक्टर म्हणून फोन लावायचो, आणि तोही आलो, येतो, येतोच आहे अशी डॉक्टरी भाषा बोलायचा!
वडिलांनी गोठ्याला यायचं सोडलंच होतं; आणि वडील आणि गौरी असा दुहेरी ताण मनावर घेऊन मी आणि सौ. घरात वागत होतो.गौरी म्हणजे आमच्या म्हशीचे नाव बरं का, कारण तिचा जन्म गुरुवारचा!! असो!
सकाळी गौरी गोठ्यात मेलेलीच दिसणार अशी मनाची समजूत घालून जावं, तर गौरी आमचीच वाट बघत असायची!ना धड घरात मन लागेना, ना शेतात, ना ड्युटीवर!
आता, डॉक्टरचे ऐकून मनाची तयारी तयारी केली, पण तसं काही घडेना,मनाचं ऐकावं, तर काय करायचे तेच कळेना!आणि जग रोज विचारायचे,’ झाली का गौरी बरी?’सकाळी गौरीला हाताने गवत चारता चारता मनात आले, काही झाडपाला वगैरे बघावं का?
त्याच विचारात घरी येत होतो, आणि समोरून गावातील एक वयोवृद्ध बाबा येताना दिसले!त्यांना बालपणापासून मी फक्त गुरे चारतानाच बघत आलोय, गाडी थांबवली, त्यांना म्हशीची परिस्थिती सांगितली!
कधी नव्हे ते त्यांच्या गोठा सोडून आमच्या गोठ्याला आले, त्यांनी म्हैस चालवून दाखवायला सांगितली, आणि काळ्या टाकळीचा पाला एकदाच चारायला सांगितला!आता, काळी टाकळी हे नाव ऐकून माहिती होते, पण झाड प्रत्यक्ष बघीतलं नव्हतं!
शेवटी, त्यांनीच ते झाड कुणाच्या बांधावर आहे, आणि ते एकमेव असल्याचे सांगितले! गेलो, तर त्या झाडाची बरीचशी पाने किड्यानी खाल्ली होती! तरीही पन्नासेक पाने हाताने खुडली आणि त्यांना नेऊन दाखवली, त्यांनी बरोबर असल्याचे सांगितले!
सकाळी अकराच्या दरम्यान म्हशीला चार पाच मक्याचा किरळ्यात ती सर्व पाने घालून चारली!!!पुन्हा दिवसभर म्हैस खाईल तशी तिला हाताने गवत चारत होतो! संध्याकाळी तिने दूध दिले नाही, पण कित्येक दिवसांनी अर्धी बादली पाणी प्यायली!
सकाळी जावून बघीतलं तर तिला घातलेले सर्व गवत, कुट्टी तिने खाल्ली होती!!जरा बरं वाटलं त्या सकाळी! मात्र तिने शेण टाकले नव्हते त्यामुळे थोडी रुखरुख होतीच.साडेदहा वाजता तिला पाणी पाजले, बऱ्यापैकी प्यायली, खायला घातले, पण खाल्ले नाही. म्हटलं ठीक आहे, बघु! थोड्या वेळाने ती खाली बसली आणि रवंथ करू लागली!
बारा-एकच्या दरम्यान तिने दावणीत टाकलेलं खायला सुरुवात केली!आणि–तीनच्या दरम्यान तिने शेणाचा पो टाकला!!तो भरताना आश्चर्य आणि किळस एकदम डोक्यात!कारण त्या शेणात जवळजवळ मुठभर केस होते!!!म्हैस आजारी पडल्याचं कारण तात्काळ लक्षात आलं;तिच्या पोटात केस गेले होते!!!त्या दिवसापासून गौरी दोन्ही वेळेला दूध देतेय, खातेय, पितेय,ओढ्यात पोहायला जातेय!
———————————————————————–
त्या बाबांना पुन्हा भेटायला गेलो, तेव्हा त्यांनीच विचारले,”काय खाल्लं हूतं म्हशीनं,क्यास की कागाद?”अर्थात, कागाद म्हणजे प्लास्टिकचे कागद!!मी त्यांना केस सापडल्याचे सांगितले,पण,निदान-डायग्नोसिस म्हणजे सोनोग्राफी आणि उपचार म्हणजे चिरफाड-ऑपरेशन यापुढे माझा मेंदू चालत नसताना, हा केवळ योगायोग आहे की पारंपरिक ज्ञान तेच कळत नाही!
———————————————————————
मी पुन्हा एकदा त्या झाडाजवळ गेलो,त्याला नमस्कार केला, त्याचे फोटो घेतले आणि मिसाळ सरांना ओळखीसाठी पाठवले, त्यांनी हे झाड काळ्या टाकळीचेच असल्याचे सांगितले! कारण अनेक ठिकाणी झाडांची नावे वेगवेगळी असतात म्हणून फक्त खात्री करून घेतली! असो!यानिमित्ताने काही गोष्टी सर्वांनी लक्षात घ्याव्यात,
घोकंपट्टी करून घेतलेलं किंवा दिलेलं शिक्षण किती वरवरचं आहे आणि, परंपरेनं चालत औषधी झाडांविषयीचे ज्ञान किती सखोल आहे?
-ज्या सुखसोयिंच्या हव्यासापोटी आपण शिकलो, त्या सुखसोयी किती तकलादू आहेत??
-आपण पुन्हा निसर्ग चळवळ उभी करतोय, पण कशासाठी ते आपणाला कळतंय???
-तुमच्या निसर्गचळवळीत त्या अंगठेबहाद्दरांचे स्थान कुठे आहे????
———————————————————————–
आज काळ्या टाकळीच्या निमित्ताने वरील गोष्टींची उत्तरे सर्वांनी शोधावित!
प्राचीन आणि आधुनिक असं जे वर्गीकरण आपण करतोय, मधला दुवा शोधण्याचा प्रयत्न करतोय, तो दुवा अश्याच आपल्यालेखी अडाणी लोकांजवळ सापडेल, अजूनही काही अज्ञात झाडे, त्यांचे उपयोग आपल्याला नव्याने समजतील!
तेव्हा, झाडे लावा,जपा,पण त्याबरोबर ही अडाणी संपत्ती विचारात घ्या!!काळी टाकळ हे झाड अनेकांना माहिती आहेच,काही चुका असतील तर आवश्य सांगाव्यात. कारण मी सुद्धा पुरोगामी विचार मानणारा, पण भारतीय संस्कृती न सोडू शकणाऱ्यांपैकी आहे!!
श्री अजित काटकर , माण
काळी टाकळीचे फोटो पाठवा प्लीज माझी पण गाय तशीच करतीय please request
मो नं 9561798487