कपाशीवर आढळून येणारी कीड प्रामुख्याने दोन गटात विभागणी केली जाते.पहिला गट म्हणजे रस शोषण करणाऱ्या किडी व दुसरा गट म्हणजे बोंड अळी.पीक उगवल्या नंतर पात्या फुले येईपर्यंत किडीं म्हणजे पिकाच्या कायीक वाढीच्या काळात (लागवडीपासून ४५ ते ६० दिवसापर्यंत) रस शोषण करणाऱ्या किडी मावा,तुडतुडे,फुलकिडे व पांढरी माशी या किडींचा उपद्रव आढळून येतो. या किडी पासून साधारणता १६ ते २७ टक्के नुकसान होते.
या हंगामात शेतकरी बंधुनी लागवड ही मे महिन्याच्या शेवटच्या आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली आहे बऱ्याच भागात पाऊस समाधान कारक असल्याने व वातावरण किडींना पोषक नसल्यामुळे रस शोषण करणाऱ्या किडिंचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा कमी आढळून आला आहे. त्यामुळे रासायनिक किड नाशकांचा वापर न करता वनस्पति जन्य किड नाशकांचा वापर म्हणजे निंबोळी अर्क किंवा निंबोळी तेल यांचा वापर फायदेशिर ठरेल. त्याच बरोबर खाली दिल्याप्रमाणे नियमित पिकाचे सर्वेक्षण करून किडिंचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त असल्यास गरजेनुसार उपाययोजना कराव्यात त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होईल आणि किडींमधे प्रतीकार शक्ति वाढणार नाही.
मावा:(Aphids)
या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जुलै-ऑगस्ट या कालावधीत मोठया प्रमाणात दिसून येतो.कमी पाऊस,उष्ण व दमट हवामान या किडीच्या वाढीस पोषक ठरते.जोरदार पावसामुळे प्रादुर्भाव कमी होतो.या किडीचा रंग पिवळसर हिरवट असतो.हे कीटक पानावर चिकट द्रव सोडतात. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते व पानामधील कर्ब ग्रहणाची क्रिया मंदावून वाढ खुंटते पूर्ण वाढ झालेला मावा व त्यांची पिल्ये पानाच्या खालच्या भागावर समुहाने राहुन पानातील रस शोषण करीत असतात.एक मादी एका दिवसाला ८ ते २२ पिलांना जन्म देऊ शकते.
तुडतुडे: (Jassids)
ही कीड पाचरीच्या आकाराची ३ ते ४ मी.मी. लांब असून तिचा रंग फिकट हिरवा असतो. तुडतुडे पानाच्या खालच्या बाजूस बहुसंखेने आढळून येतात.ही कीड पानातील रस शोषण करून घेते व त्यामुळे पानाच्या कडा पिवळसर व नंतर तांबूस होतात.जास्त प्रादुर्भाव झाल्यावर पाने गळून पडतात व झाडाची वाढ खुंटते.तुडतुडे नेहमी तिरके चालतात.कापूस उगवल्यापासून १२ ते १५ दिवसानंतर या किडीचा प्रादुर्भाव सुरु होतो व तो सर्वसाधारणपणे ४५ दिवसापर्यंत जास्त असतो.
फुलकिडे: (Thrips)
ही कीड फिकट पिवळसर रंगाची व अत्यंत बारीक असते.त्यांची पंखाची कडा केसाळ असतात. पूर्ण वाढ झालेली कीड व त्यांची पिल्ये पानाच्या वरच्या तसेच खालच्या बाजूने अन्नरस शोषण करून घेतात त्यामुळेत पानांवर पांढरे चट्टे अथवा ओरखडे दिसून येतात. या किडीचा प्रादुर्भाव ऑगस्ट महिन्यात पहिला आठवडा ते सप्टेंबर पहिला आठवड्या पर्यंत सर्वाधिक आढळून येतो.
पांढरी माशी:(White fly)
ही कीड १ ते २ मी.मी. लांब असून कीड रंगाने पांढरट ते गुलाबी असून या किडीचे पिल्ये आणि प्रौढ लहान,चपटी व दीर्घ वर्तुळाकार असतात. पांढरी माशी पानाच्या खालच्या बाजूस राहुन रस शोषण करीत असतात. त्यामुळे पाने वाळतात तसेच ती आपल्या शरीरातून चिकट द्रव सोडतात त्यामुळे पानावर काळी बुरशीची वाढ होऊन झाडाची अन्न तयार करण्यची प्रकिया मंदावते.मादी १५० ते २०० अंडी कोवळ्या पानाच्या मागील बाजूस घालते.या किडीच्या वर्षाला १२ ते १५ पिढ्या तयार होतात.
रस शोषण करणारी किडींच्या नियंत्रणासाठी एकात्मीक कीड व्यवस्थापनाचा अवलंब केला पाहिजे व त्यासाठी प्रत्येक किडीची नुकसान पातळी नुसार नियंत्रण पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.नुकसान पातळी बरोबर किडींच्या वाढीसाठी अनुकूल हवामानाची माहिती असणे गरजेचे आहे.
तक्ता १ :रस शोषण करणाऱ्या किडीची आर्थिक नुकसान पातळी
कीड | काळ | किडीची आर्थिक नुकसान पातळी | अनुकूल हवामान |
मावा | जुलै-ऑगस्ट | १५ ते २०% किडग्रस्त झाडे | कमी पाऊस,ढगाळ हवामान |
तुडतुडे | ऑगस्ट- सप्टेंबर | २ ते ३ तुडतुडे प्रती झाड | आद्र व उष्ण हवामान |
फुलकिडे | जुलै – सप्टेंबर | १० फुलकिडे प्रती झाड | कमी तापमान व कोरडे हवामान |
पांढरी माशी | ऑगस्ट- सप्टेंबर | ८ ते १० पूर्ण वाढ झालेली माशी प्रती झाड |
त्यासाठी खालील दिलेल्या तक्त्यानुसार पिक संरक्षनात्मक उपाय योजना राबवावी त्यासाठी आता पेरणी होऊन बराच कालावधी गेलेला आहे म्हणुन मशागत पध्दत राबवणे शक्य नसल्याने आता यांत्रिक पद्धतीने, जैविक पद्धतीने व रासायनिक पद्धतीने कीड नियंत्रण करता यईल
यांत्रिक पद्धत- अधिक नत्राचा किंवा संजीवकाचा वापर टाळावा.
कायिक वाढीवर नियंत्रण ठेवावे.
प्रादुर्भावग्रस्त पाने काढून नष्ट करावीत
ब) जैवीक पद्धत–
रस शोषण करणाऱ्या मावा, तुडतुडे,फुलकिडे,पांढरी माशी या किडींचे जैवीक नियंत्रण करण्यासाठी क्रायसोपा कारणीया या मित्र किडींचा वापर करतात.
- क्रायसोपाची अळी मावा, तुडतुडे,फुलकिडे,पांढरी माशी तसेच तिन्ही बोंड अळयाची अंडी व अळी यांचे भक्षण करते
- क्रायसोपाचा पतंग हा पोपटी हिरवा व निळसर रंगाचा असून साधारण १ सें.मी. लांबिचा असतो. या पतंगाच्या माद्या पानांवर किंवा देठावर एक एकटे अंडे घालतात. अंडे पांढ-या रंगाचे असून ते १ ते १५सें.मी. पांढ-या तंतुच्या टोकावर चिकटलेले असते.
- अंड्यातून ४८ तासात अळी बाहेर पडते व ती झाडाच्या भक्षाच्या शोधात फिरते. अळीचा काळ साधारण १५ ते २७ दिवसांचा असतो. या संपूर्ण काळात ती कापसावरील किडीचे भक्षण करीत असते.
- क्रायसोपाचा वापर करण्याची पद्धत अत्यंत सोपी असून त्यासाठी क्रायसोपाची अंडी चीटकवलेले कार्ड्स वापरावेत हे कार्ड झाडांच्या मध्यात पानाच्या देठाकडील बाजूस पिनेद्वारे पानाचा खालच्या बाजूस लावावेत. साधारणता हेक्टरी ५०००० अंडी सोडावीत.
- क्रायसोपाचे उत्पादन कसे करावे याची साधी व सोपी व कमी खर्चाची पद्धत केंद्रीय कापूस संशोधन संस्था तसेच केंद्रीय एकीकृत कीड नियंत्रण केंद्र नागपूर येथे उपलब्ध आहे
तक्ता २ :जैवीक कीडनाशके
कीड | तांत्रिक नाव | प्रमाण १० ली पाणी |
तुडतुडे,मावा,फुलकिडे व पांढरी माशी | ५ % निंबोळी अर्क | ५% (१००लि.पाण्यातून ५ कि. निंबोळी) |
व्हरटीसीलींयम ल्येक्यानी १.१५ % | ४० ग्राम | |
क्रायसोपा अंडी प्रसारण | ५००००/हेक्टर | |
पांढरी माशी | पिवळे चिकट सापळे | — |
फुलकिडे | निळे चिकट सापळे | — |
- रासायनिक पद्धत– इमिड्याक्लोप्रीड (गावचो) कीटकनाशकाची बीजप्रक्रिया केलेले बियाणे बीजप्रक्रियेसाठी वापरावे. पिक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत मित्र किडींची संख्या जास्त राहत असल्याने शत्रू किडींची संख्या नियंत्रणात राहते परंतु घातक रसायनांचा वापर केल्यास मित्र किडींची संख्या कमी होऊन समतोल बिघडतो म्हणून गरजेनुसार खालील तक्त्यात (तक्ता ३) दिलेल्या कीटक नाशकाची फवारणी करावी. फवारणी करताना एका वेळी एकच कीटक नाशक शिफारस केलेली मात्रा घेऊन करावी. फवारणी करताना योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून मनुष्य ,वातावरण व पर्यावरणाची हानी होणार नाही. तसेच फवारणीसाठी स्वच्छ पाणी वापरणे गरजेचे आहे. गढूळ पाणी फवारणीसाठी वापरल्यास किटक नाशकाची कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता असते.
तक्ता ३ : रस शोषण करणाऱ्या किडीचे नियंत्रण करण्यासाठी खालील कीटकनाशकांची शिफारस केलेली आहे.
कीड | तांत्रिक नाव | व्यापारी नाव (फक्त उदाहरणासाठी) | प्रमाण १० ली पाणी |
मावा,तुडतुडे,फुलकिडे व पांढरी माशी | फ्लोनिक्यामिड ५०% WG | — | ४ ग्राम |
मावा,तुडतुडे,फुलकिडे व पांढरी माशी | Dimethoate
(डायमेथोयेट) ३०% ईसी |
Rogar(रोगर)
Tara(तारा) Celgor(सेलगोर) |
१० मिली |
मावा,तुडतुडे,फुलकिडे व पांढरी माशी | Oxydemeton Methyl
( ऑक्सिडीमेटोन मिथाईल) २५% ईसी |
Metasystox
(मेटासिसटोक्स) |
१० मिली |
मावा,तुडतुडे,फुलकिडे व पांढरी माशी | Acetamiprid
(असीटामिप्रिड) २०%SC |
Tatamanik
(टाटामाणिक) Pride(प्राईड) Record(रेकॉर्ड) |
४ ग्राम |
मावा,तुडतुडे,फुलकिडे व पांढरी माशी | Emidacloprid
(ईमीडाक्लोप्रीड) १७.८ %SL |
Confidor
(कॉन्फीडॉर) Tatamida (टाटामीडा) |
४ मिली |
मावा,तुडतुडे,फुलकिडे व पांढरी माशी | Thiomithaxon
(थायोमिथाक्झोन) २५% WG |
Actara
(एकटारा) Urja(उर्जा) |
४ ग्राम |
मावा,तुडतुडे,फुलकिडे पांढरी माशी व मिलीबग | Acephate(आसिफेत)
७५ % sc |
Asataf(असाटाफ)
Star(स्टार) |
२० ग्राम |
फुलकिडे | Fipronil 5% S.C.(फिप्रोनील ५%S.C.) | rigent( रीजेंट ) | २०मिली |
डॉ.संजीव पाटील,श्री तुषार पाटील,डॉ.सुदाम पाटील, कृषी संशोधन केंद्र, जळगाव-४२५००१