कापूस..! सध्या या पांढऱ्या सोन्याला खरोखरच पुन्हा एकदा सोन्याप्रमाणेच झळाळी प्राप्त झाली आहे. पण मानवाने या पांढऱ्या सोन्याचा शोध, त्याची शेती, वापर किती हजार वर्षांपूर्वी व कोणत्या उपखंडातून प्रथम केला गेला..? कधीपासून त्याचा जगभर व कसा विस्तार झाला..? या विस्तारात अलेक्झांडर द ग्रेट व इंग्रज यांची काय संबंध, हा सर्व कापसाचा इतिहासही रंजक आहे.
मनुष्याच्या प्रमुख तीन गरजांपैकी वस्त्रांशी संबंध असलेल्या कापसाचा इतिहास देखील मानवी संस्कृती एवढाच जुना आहे. साधारण: इसवी सन पूर्व ७००० वर्षापूर्वीपासून भारतीय उपखंडात कापसाची शेती केली जात आहे. पाकिस्तानातील मेहरगढ येथील उत्खननातून याचा पुरावा मिळाला आहे. कापूस व कापसाच्या सुती वस्त्रांसाठी होणारा उपयोग ह्यांविषयीचे ज्ञान भारतीयांना फार पूर्वीपासून होते. कापासाच्या रानटी अवस्थेतील काही जाती उष्ण प्रदेशांत आढळत असल्याने तो मूलत: उष्णदेशीय आहे. ऋग्वेदातही कापसाचा उल्लेख आहे. मनूनेही धर्मशास्त्रात सुती वस्त्रांचा उल्लेख केलेला आहे. ज्ञात असे सर्वांत जुने कातलेले सूत मोहों जोदडो येथील उत्खननात सापडलेले आहे. मनुष्य वस्त्र परिधान करीत असल्यापासून मानवी संस्कृतीमध्ये कापसाचे स्थान अढळ आहे. सध्या कापूस आणि त्यासंबधित बाजारपेठ हा जगण्याचा, राेजगाराचा प्रमुख आधार झालेला आहे.
कापूस : वस्त्रप्रावरणाच्या निर्मितीकरिता लागणाऱ्या वनस्पतिज धाग्यासाठी उपयुक्त असलेली कापूस ही एक वनस्पती आहे. या वनस्पतीच्या बोंडातून मिळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र तंतूमय भागालाही कापूस असे म्हणतात. कापासाच्या रानटी अवस्थेतील काही जाती उष्ण प्रदेशांत आढळत असल्याने तो मूलत: उष्णदेशीय असावा असे मानतात.
इंका संस्कृतीच्या पूर्वीपासून उल्लेख
कापूस व कापसाच्या सुती वस्त्रांसाठी होणारा उपयोग याविषयीचे ज्ञान भारतीयांना फार पूर्वीपासून होते. ऋग्वेदात कापसाचा उल्लेख आहे. मनूनेही धर्मशास्त्रात सुती वस्त्रांचा उल्लेख केलेला आहे. ज्ञात असे सर्वांत जुने कातलेले सूत मोहों-जो-दडो येथील उत्खननात सापडलेले आहे. यावरून इ. स. पू. ३००० वर्षांपूर्वी भारतात कापूस लागवडीत होता असे दिसते. इतर ज्ञात प्राचीन सुती वस्त्रे म्हणजे इंका संस्कृतीच्या पूर्वीच्या काळातील पेरू देशातील थडग्यात सापडलेले कापड, इतिहासपूर्व काळातील ॲरिझोनाच्या प्वेब्लो भग्नावशेषात सापडलेले कापड वगैरे होत असे.
अलेक्झांडरने कापूस ईजिप्त, ग्रीस आदी देशांध्ये नेला
भारतातूनच कापसाचा व कापड विणण्याच्या कलेचा भूमध्य समुद्रालगतच्या देशांत आणि यूरोप खंडात प्रसार झाला. हीरॉडोटस (इ. स. पू. ४५०) यांनी भारतीय स्त्रिया सुती वस्त्रे कशा विणीत असत त्याचे वर्णन केलेले आहे. भारतीय अतिथ्य, शौर्य व स्वाभिमान यांविषयी अलेक्झांडर (इ. स. पू. ३२७) जितके प्रभावित झाले होते, तितकेच ते येथील कापूस उद्योगाविषयी व भारतीयांच्या सुती कपड्यांविषयीही प्रभावित झाले होते. ‘विशिष्ट रानटी झाडे फळाऐवजी लोकर देतात आणि ह्या लोकरीचे सौंदर्य व प्रत मेंढ्यांपासून मिळणाऱ्या लोकरीपेक्षा अत्यंत श्रेष्ठ आहे. भारतीय लोक त्यापासून तयार केलेले कपडे घालतात’, असा उल्लेख अलेक्झांडर यांनी केला होता. इतकेच नव्हे तर त्यांनी भारतातून परतताना कापूस ईजिप्त, ग्रीस व इतर भूमध्य समुद्रालगतच्या देशांमध्ये नेला.
ग्रीक कापसाला गॅंजिटिकी संबोधत
गंगेच्या खोऱ्यातील उत्कृष्ट मलमलीला ग्रीकांनी गंगेवरून `गॅंजिटिकी’ असे नाव दिले. थीओफ्रस्टस यांनीही आपल्या वनस्पतिविज्ञानाच्या ग्रंथात भारतीय कापसाचे वर्णन केले आहे. ईजिप्तमध्ये जरी फ्लॅक्स उद्योगाला अग्रस्थान होते, तरीसुद्धा काही काळानंतर म्हणजे इ. स. ६०० पासून तेथे कापूस पिकवून त्यापासून कापड बनविण्याचा उद्योग सुरू झाला.
कापूस भारतातून सातव्या शतकात चीनमध्ये
भारतातून कापसाचा प्रसार केवळ पश्चिमेकडेच नव्हे तर पूर्वेकडेही झाला. इ. स. सातव्या शतकात कापूस भारतातून चीनमध्ये गेला. सुरुवातीला शोभेची झाडे म्हणून चिनी लोक कापसाची झाडे आपल्या बागेत लावत असत. सु. नवव्या शतकानंतर तेथे कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड होऊन त्यापासून सूत व कापड निर्माण होऊ लागले.
मेक्सिकोतही अस्तित्व
मेक्सिकोत कापसाच्या बोंडाचे अस्तित्व जरी इ. स. पू. ५००० वर्षे इतके प्राचीन असले, ती तेथे कापसाचा कापडासाठी उपयोग फक्त इ. स. पू. २५०० वर्षांपासूनच माहीत होता, असे ज्ञात पुराव्यावरून दिसते. त्याच सुमारास पेरू देशातील लोकही कापूस लावून त्यापासून कापड निर्माण करीत असत. कापसाच्या भरपूर पुरावठ्यासाठी इ. स. पंधराव्या व सोळाव्या शतकांत निरनिराळ्या संशोधन सफरी योजण्यात आल्या होत्या. १४९२ मध्ये कोलंबस यांना वेस्ट इंडीजमधील स्थानिक रेड इंडियन रहिवाशांनी कापसाचे सूत भेटी दाखल दिले होते. इ. स. सतराव्या शतकात इंग्रजांनी उ. अमेरिकन वसाहतीत कापसाची लागवड केली. या लागवडीतूनच आजच्या अमेरिकेतील आधुनिक कापड व्यवसाय उदयाला आला आहे. यूरोपमध्ये आधीच तो व्यवसाय व्यापारी प्रमाणावर चालू होता.
इ. स. पू. १५०० ते इ. स. अठराव्या शतकापर्यंत म्हणजे जवळ – जवळ ३,३०० वर्षे भारत कापूस उद्योगावर आघाडीवर होता. त्यानंतर मात्र इंग्रज सरकारच्या धोरणामुळे भारतीय कापूस उद्योगावर प्रतिगामी परिणाम झाला. मात्र, याच इंग्रजांनी त्यांच्या जगभर पसरलेल्या वसाहतींमधील उष्णकटिबंधीय प्रदेशांत कापूस नेऊन त्याची लागवड वाढवत नेली. यानंतर खऱ्या अर्थाने कापूस जगभर पसरला.