गुगल प्ले स्टोअरवरून “ई-ग्राम स्वराज” नावाचं एप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे. हे एप्लिकेशन ओपन केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. यात तुम्हाला सगळ्यात पहिले स्टेट मध्ये तुमचं राज्य, त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये तुमचा जिल्हा, ब्लॉक पंचायतमध्ये तालुका आणि व्हिलेज पंचायतमध्ये गावाचं नाव निवडायचं आहे. एकदा का ही माहिती निवडून झाली की तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर सगळ्यात वरती आपण जी माहिती भरलेली असते, ती तुम्हाला दिसेल. यात राज्य,जिल्हा, तालुका आणि गावाचं नाव दिसेल. गावाच्या नावासमोर गावाचा कोड क्रमांकही दिसेल.
त्याखाली तुम्हाला ज्या आर्थिक वर्षासाठीची माहिती पाहायची आहे, ते वर्षं निवडायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर तीन वेगवेगळे पर्याय येतात. यातला सगळ्यात पहिला पर्याय असतो ER Details हा. यामध्ये ER म्हणजेच elected representative म्हणजेच गावातील निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची माहिती दिलेली असते. या पर्यायावर क्लिक केलं की तुम्हाला गावातील सरपंच, सचिव, ग्रामपंचायत सदस्य यांची सविस्तर माहिती यात दिसून येते. यात संबंधितांचं नाव,पद, वय, जन्मतारिख अशी माहिती दिलेली असते. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे हे एप्लिकेशन नुकतंच लाँच करण्यात आलं आहे. त्यामुळे यात माहिती भरण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. त्यामुळे सगळ्याच गावांमधील निवडून आलेल्या प्रतिनिधींची नाव यात तुम्हाला दिसेलच असं नाही. पण, असं असलं तरी गावाच्या विकासकामासाठी सरकारनं किती पैसा दिला आणि त्यातला किती पैसा ग्रामपंचायतीनं खर्च केला, हे मात्र तुम्ही नक्कीच पाहू शकता.
त्यानंतर दुसरा पर्याय आहे तो Approved activities हा. यात ग्रामपंचायतीला कोणत्या कामांसाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे ते सांगितलेलं असतं. त्यानंतर तिसरा जो पर्याय असतो तो म्हणजे Financial Progress. यात गावाच्या आर्थिक प्रगतीविषयी माहिती दिलेली असते. या पर्यायावर क्लिक केल्यास एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. यात आपण जे आर्थिक वर्ष निवडलेलं असतं ते सुरुवातीला तिथं दिलेलं असतं. त्यानंतर गावाचा कोड आणि नाव दिलेलं असतं. त्यानंतर त्या आर्थिक वर्षासाठी तुमच्या गावासाठी किती निधी आला त्याची रक्कम receipt या पर्यायासमोर दिलेली असते. आणि त्यापैकी किती निधी खर्च झाला ही रक्कम expenditure या पर्यायासमोर दिलेली असते. त्याखाली List of schemes हा पर्याय असतो. यामध्ये ग्रामपंचयातीला जो एकूण निधी मिळाला, त्याची विभागणी केलेली असते. यात कोणत्या योजनेअंतर्गत किती निधी मिळाला आणि आणि त्यापैकी निधी खर्च झाला याची सविस्तर माहिती दिलेली असते.
निधी उरला तर काय?
ई-ग्राम स्वराज एपवर तुम्हाला अशी अनेक गावं सापडतील, ज्यांना मिळालेल्या निधीपैकी 30, 40, ते 50 लाखांपेक्षाही अधिक रक्कम खर्च करता आली नाही. मग या खर्च न केलेल्या निधीचं काय होतं? ग्रामपंचायतींनी खर्च न केलेला निधी सरकारला परत जातो आणि जर निधी परत जात असेल तर ती ग्रामपंचायत अकार्यक्षम असते असं समजावं. पैसे खर्च करण्यासाठी सरपंचाकडे डोकं असावं लागतं. पैसे नेमके कुठे खर्च करायचे? हे त्याला कळायला हवं. पैसै परत गेले तर त्याचा अर्थ त्यांना गावाच्या विकासासाठी आलेला निधी वापरता आलेला नसतो. याचाच अर्थ ग्रामपंचायत गावाचा विकास आराखडा तयार करू शकली नाही, असा होतो.
सौजन्य :-BBC / छायाचित्र साभार – इंटरनेट