भुईमूग (उन्हाळी)
* भुईमूग पिकाच्या पानावरील टिक्का व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास 25 ग्रॅम मॅन्कोझब (डायथेन एन 45) + 25 किलो बाविस्टीन 10 लिटर पाण्यातून फवारावे.
बागायती कापूस
* कापूस लागवडीसाठी मध्यम ते भारी, 90 से.मी पेक्षा जास्त खोली असणारी व चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमीनीचा सामू 6 ते 8.5 पर्यंत असावा.
* जमीनीची खोल नांगरट करून जमीन उन्हाळ्यात तापू द्यावी.
अॅग्रोवर्ल्डची टीम आपल्यासाठी थेट कोकणातील हापूस बागेतून…🥭
खालील व्हिडिओ पहा..
ऊस
*सुरु ऊसासाठी रासायनिक खताचा तिसरा हप्ता हेक्टरी 25 किलो नत्र (55 किलो युरिया) देऊन बाळबांधणी करावी.
* ऊस पिकास 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. शक्य असल्यास ऊसाच्या पाचटाच्या आच्छादनाचा वापर करा. पाणी कमी असल्यास ऊसाला एक सरी आड पाणी द्यावे.
* खोडकिड या किडीचा फार प्रादुर्भाव झाल्यास शेतात उगवण विरळ दिसते. अशावेळी एकरी रोपांची संख्या योग्य प्रमाण राखण्यासाठी लागणीबरोबर प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये अगर प्लॅस्टीक ट्रे मध्ये पुरेशी ऊसाची रोपे तयार करून योग्य वेळी नांग्या भरण्यासाठी (विरळ जागी) ही रोपे लावावीत.
* पाचटाचे सरीमध्ये आच्छादन (मल्चिंग) अवश्य करावे. त्यामुळे देखील खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
* ऊसाला एक ते दीड महिन्यानंतर बाळ बांधणी केल्यास खोडकिडीचे पतंग बाहेर पडल्याने तयार झालेली छिद्रे बंद होण्यास मदत होईल व पतंग बाहेर पडणार नाहीत.
* ऊसामध्ये मका, ज्वारी व गहू ही आंतरपिके न घेता कांदा, लसूण, कोथिंबीर,पालक ही आंतर पीके घ्यावीत.
* ऊस लागवडीनंतर 40 ते 50 दिवसांनी 3 ते 4 फुले ट्रायकोकार्ड/हेक्टर या प्रमाणात साधारणः 10 ते 15 दिवसांच्या अंतराने लावावीत.
* खोडकिडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी हेक्टरी 5 कामगंध सापळे (इ.एस.बी.ल्युर) शेतात लावावे. क्लोरॅनट्रॅनिलीप्रोल 0.4% दाणेदार 18.75 किलो प्रति हेक्टरी अथवा फिप्रोनिल 0.3% दाणेदार हे किटकनाशक 25 ते 30 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात वापरावे.
* सदरील किटकनाशक वापरतांना 1 किलो औषधामध्ये 3 किलो बारीक माती चांगली मिसळावी व कुदळीने अर्धा फुट अंतरावर चळी घेवून माती आड करावे व हलके पाणी द्यावे. सर्व प्रकारच्या ऊस पोखरणार्या किडींसाठी अशाप्रकारचे दाणेदार औषधांची उपाययोजना करावी. तरच आपल्याला चांगल्या प्रकारे परिणाम मिळतो.
* काणी व गवताळ वाढीची बेटे समूळ काढून नष्ट करावीत.
* ऊसासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा. ठिबक सिंचनाची सोय असल्यास 5 ते 9 आठवडयांपर्यंत ऊसाच्या वाढीच्या अवस्थेनुसार प्रति हेक्टरी 70 किलो नत्र, 32 किलो स्फुरद व 14 किलो पालाश तर 10 ते 12 आठवडयांपर्यंत प्रति हेक्टरी 100 किलो नत्र, 51 किलो स्फुरद व 32 किलो पालाश प्रति हेक्टरी सात दिवसांच्या अंतराने समान हप्त्यात विभागून ठिबक सिंचन प्रणालीमधून द्यावीत.
* ऊस पिकासाठी जास्तीत जास्त क्षेत्रावर शेतकर्यांनी ठिबक सिंचन पाणी व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करावा.
* ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे अशा ठिकाणी यापुढे पाणी देताना एक आड सरीतुन पाणी द्यावे.
* पाण्याचा ताण पडत असल्यास उभ्या पिकातील खालची पक्व झालेली तसेच वाळलेली पाने काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरावी. जेणे करून पाण्याचे बाष्पीभवन कमी होवून जमिनीत ओलावा टिकवून राहण्यास मदत होईल.
* पिकास पाण्याचा ताण असल्यास लागणीनंतर 60, 120 आणि 180 दिवसांनी 2% म्युरेट ऑफ पोटॅश व 2% युरीया यांचे मिश्रण करून पिकावर फवारणी करावी.
* पाण्याची कमतरता असल्यास बाष्पीभवन कमी करण्यासाठी 6 ते 8% केवोलीन या बाष्परोधकाची फवारणी करावी.
* ऊस पीक हे तण विरहीत ठेवावे. त्यामुळे उपलब्ध पाण्यासाठी होणारी स्पर्धा कमी होवून ऊस वाढीसाठी उपयुक्त ठरेल.
* लागवडीच्या ऊस पिकात तसेच खोडव्याच्या पिकास हेक्टरी 5 ते 6 टन पाचटाचे आच्छादन करून प्रती टन पाचटासाठी 8 किलो युरीया, 10 किलो सुपर फास्फेट व 1 किलो पाचट कुजविणार्या जिवाणूंचा वापर करावा.
गहू
* धान्य कडक उन्हात वाळवून साठवणूक करावी. साठवणुकीच्या वेळी औषध वापरावे.
खरीप नाचणी लागवड
1. शेतीची नांगरट करणे 2. कुळवणी करणे
3. शेतातील धसकटे वेचणे
फळबाग व्यवस्थापन
* डाळिंब – पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे. फळ पोखरणार्या अळीचे / पांढरी माशीचे नियंत्रण करावे फळांची संख्या मर्यादित करावी.
* सिताफळ – बहार धरलेल्या झाडासाठी पाणी व्यवस्थापन करावे.
* बोर – बहार ताणावर सोडावी.
* कागदी लिंबू – उन्हाळ्यात 8-10 दिवसाचे अंतराने पाणी द्यावे. रोगट, किडग्रस्त व वाळलेल्या फांद्याची छाटणी करावी.
काळीमाशी ः थायोमिथोक्झाम 1 ते 1.5 ग्रॅम /10 लि. पाण्यातून फवारावे.
खवले कीड ः क्विनॉलफॉस 30 मिली / 10 लि. पाण्यातून फवारावे.
शेंडेमर ः कॉपर ऑक्सीक्लोराईड 30 ग्रॅम/ 10 लि. पाण्यातून फवारावे. मोसंबी व लिंबू बागेमध्ये फांदीमर रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम 1 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवडयात फवारणी करावी.
भाजीपाला व्यवस्थापन
* रबी कांद्याचे पीक काढणी अवस्थेत असल्यास तीन आठवडे आधी पिकांचे पाणी तोडावे. त्याचप्रमाणे बुरशीनाशकाचा फवारा द्यावा.
* लसूण पीक काढणी अवस्थेत असल्यास तीन आठवडे आधी पाणी तोडावे व बुरशीनाशकाची फवारणी करावी.
* कांदा पिकाची काढणी करून कांदा 3 ते 5 दिवस शेतात सुकवावा.
* कांद्याची पात कापतेवेळी 2.5 ते 3.0 सेंमी. पात ठेवून कापावी.
* पात कापलेला कांदा 15 ते 20 दिवस सावलीमध्ये सुकवावा व प्रतवारी करून मध्यम आकाराचा कांदा चाळीमध्ये साठवावा.
* लसूण पिकाची काढणी करून पातीसह गड्या बांधून हवेशीर जागेवर साठवण करावी.
* टोमॅटो पिकाची काढणी 3 ते 4 दिवसांनी करावी.
* उन्हाळी भेंडी पिकाची तोडणी एक दिवस आड करावी.
* गवार पिकाची काढणी करावी.
* वेलवर्गीय भाजीपाल्याची काढणी वेळेवर करावी.
* किड व रोगांचा प्रार्दुभाव आढळून आल्यास तज्ञांच्या सल्यानुसार नियंत्रणाचे उपाय करावेत.
* उन्हाळी टोमॅटो पिकास आधार द्यावा त्यासाठी ताटी पध्दतीचा अवलंब करावा.
* टोमॅटो पीक फुलोरा अवस्थेत असल्यास व तापमान 350 सें.ग्रे. चे वर गेल्यास फुलगळ व कमी प्रमाणात फळधारणा होते.
* फुलगळ कमी करण्यासाठी व फळधारणेचे प्रमाण वाढवीण्यासाठी एन.ए.ए. या संजीवकाची व बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी करावी. तसेच टोमॅटोच्या शेताच्या चारही बाजूस व चार ओळीनंतर मक्याच्या दोन ओळी लावाव्यात.
* मिरची व वांगी पिकास खुरपणी करून नत्र खताचा हप्ता द्यावा.
पशुसंवर्धन
* सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत अधिक खादय न देता सकाळी किंवा सायंकाळ नंतर तापमान कमी असतांना खादय दयावे.
* दररोजच्या खादयामध्ये खनिज मिश्रणे किंवा गोठ्यामध्ये चाटण विटाची व्यवस्था करावी.
* म्हशीच्या अंगावर दिवसातून दोनदा पाण्याचा फवारा किंवा शक्य असल्यास पाण्यात डुंबण्यास सोडावे.
* उन्हाचा वाढता परिणाम रोखण्याकरीता जनावरांच्या गोठयात कुलर / स्प्रिंकलर लावावे किंवा शेडच्या चोहो बाजूंनी पोते लावून त्यावर पाणी शिंपडावे जेणेकरुन गोठयातील हवा थंड राहील.
सौजन्य ः म.फु.कृ.वि.राहूरी