भोपाळ : ॲव्होकॅडो … अनेकांना माहितीही नसेल हे फळ. कारण मुळातच ते इस्त्रायली फळ आहे, ज्याला सुपरफूडचा दर्जा आहे. म्हणजे तुम्हाला भरपूर प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन तसेच इतर पोषणमूल्य देणारे हे फळ. सध्या भारतात आयात केले जाणारे हे अत्यंत महागडे फळ सर्वसामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर आहे. आता मात्र भारतातच त्याची अनोखी शेती सुरू झाली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमधील एका उच्चशिक्षित ध्येयवेड्या तरुणाने हे अशक्य ते शक्य करून दाखविले आहे. हर्षित गोधा असे या तरुणाचे नाव असून इस्रायलमधून प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याने आता भोपाळमध्येच सुपरफूड ॲव्होकॅडोची लागवड सुरू केली आहे.
आजच्या काळात भरपूर शिक्षण घेतल्यानंतर आपण उत्तम नोकरी करावी आणि भरापू कमवावे, हीच अनेकांची इच्छा असते; पण आपल्या आजुबाजूलाच असेही काही ध्येयाने पछाडलेली माणसे असतात, ज्यांना चाकोरीबद्ध जगण्यात अर्थ वाटत नाही. काहीतरी वेगळे करून दाखविण्याची त्यांची जिद्द असते. आपल्या शिक्षणातून भन्नाट काहीतरी स्वतंत्र व्यवसाय करून आपल्या कार्य-कर्तृत्त्वाचा ठसा उमटविण्यासाठी अशी मंडळी धडपडत असतात. त्यासाठी प्रचंड मेहनत आणि रिस्क घेण्याची त्यांची तयारी असते.
अमेरिकी क्विनोआसारखेच सुपरफूड; पारंपरिक इथिओपियन टेफ आता इस्त्रायली संशोधक नेणार जगभर
वय वर्षे फक्त 26; पण जिगरबाज धडपड
अशाच वेगळ्या वाटेवर चालणाऱ्या लोकांपैकी एक आहे भोपळचा हर्षित गोधा. वय वर्षे फक्त 26! भोपाळमधून बारावी पूर्ण केल्यानंतर तो ब्रिटनमध्ये गेला आणि तिथून त्याने बीबीए नंतर एमबीएची पदवी मिळवली. हर्षित पहिल्यापासूनच वाचनात आणि लेखनात हुशार होता. यासोबतच त्याला इतर बिगर शैक्षणिक उपक्रमातही रस होता. अभ्यासाबरोबरच इतर कामातही प्रावीण्य मिळवण्यासाठी तो लहानपणापासूनच आटोकाट प्रयत्न करायचा. हाच स्वभाव आणि स्वतंत्र बाण्याची लढाऊ वृत्ती त्याला पुढे कामात आली.
असा आला मनात अॅव्होकॅडो लागवडीचा विचार
हर्षित गोधा त्याच्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. कॉलेजात गेल्यापासून तो रोज जिमला जातो, भरपूर वर्क आऊट करतो. आरोग्याच्या प्रकृतीनुसार फायदेशीर आहार तसेच योग्य अन्न-धान्य, फळे, भाजीपाल्यांचे व पूरक पदार्थांचे सेवन करायला त्याला आवडते. ब्रिटनमध्ये शिकत असताना, त्या दिवसांत तो दररोज अॅव्होकॅडो खात असे. एके दिवशी सहजच अॅव्होकॅडो खाल्ल्यानंतर त्याची नजर पॅकेजिंगच्या पाकिटावर पडली. त्या पॅकवर, हे फळ इस्रायलमधून आयात केले असल्याचे नमूद केलेले होते. त्या दिवसापासून या अॅव्होकॅडोचा भुंगा हर्षितच्या डोक्यात शिरला. तो त्याला काही स्वस्थ बसू देईना. त्याच्या मनात सारखा विचार सुरू होता की, हे फळ इस्रायलसारख्या गरम हवामानात जर उगवू शकत असेल तर आपल्या भारतात तर नक्कीच उगवले जाऊ शकते. बस्स, तेव्हापासून हर्षितने भारतात जाऊन अॅव्होकॅडोची लागवड करण्याचा निर्णय मनोमन पक्का केला.
इस्रायलमध्ये जाऊन घेतले प्रशिक्षण
एकदा अॅव्होकॅडोची लागवड करण्याचा निर्णय मनात घेतल्यानंतर हर्षितने त्याविषयी सर्व प्रकारची माहिती मिळवायला सुरुवात केली. त्यासाठी त्याने थेट इस्त्रायलमध्ये जाऊन अॅव्होकॅडोची शेती, लागवडीसह बाजारपेठेची संपूर्ण माहिती घेण्याचे ठरविले. तेथे जाऊन हर्षितने अॅव्होकॅडो लागवडीशी संबंधित तसेच फळाची मागणी, मार्केटिंग, सर्टिफिकेटस अशा सर्व प्रकारच्या गोष्टींचा अभ्यास केला. तो तिथे अनेक शेतकऱ्यांना जाऊन भेटला, फळ विक्रेते, निर्यातदार यांच्याशी बोलला. याशिवाय, अॅव्होकॅडो लागवड तंत्रज्ञान व विक्री तसेच निर्यात प्रक्रिया निकष या संबंधातील प्रशिक्षण वर्गात हर्षित सहभागी झाला. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा भोपाळमध्ये येऊन अॅव्होकॅडोची शेती करण्याचा निर्णय पूर्ण पक्का झाला.
पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील नवीन अविष्कार नॅनो युरिया, शेतकऱ्यांसाठी सदैव लाभदायक
मित्रांच्या मदतीनेच केली जमीन शेतीयोग्य
भारतात परतल्यानंतर मित्रांच्या मदतीने हर्षितने भोपाळमधील आपली खानदानी जमीन शेतीयोग्य केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तोवर हर्षित किंवा त्याच्या मित्रांपैकी कुणालाही प्रत्यक्ष शेतीचा काहीही गंध नव्हता. इंटरनेटवर सर्च करून, यूट्यूबवरून, शेजारील खेड्यातील वृद्ध शेतकऱ्यांना भेटून त्यांनी हे सारे ज्ञान मिळविले. अर्थात त्यापैकी कुणालाही अॅव्होकॅडोबाबत आणि त्याच्या शेतीबाबत काहीही माहिती असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यासाठी हर्षितने इस्त्रायली पुरवठादार संस्थेची मदत घेतली. यानंतर भोपाळमध्ये इस्रायली ॲव्होकॅडोची रोपे (मदर प्लांट) देण्याचे व त्यासाठी जमीन तयार करण्याचे काम त्याच्या एका इस्रायली सहकाऱ्याने केले. इस्त्रायली तज्ञांनी मध्य भारतातील तापमान ॲव्होकॅडोच्या सर्वोत्तम जातीसाठी योग्य असल्याचा निर्वाळा दिला. या “गो अहेड”नंतर हर्षितने भोपाळमध्ये भारतातील पहिली अॅव्होकॅडो शेती व नर्सरी सुरू केली. आपले प्रयत्न कधीही न सोडणारा हर्षित गोधा आजच्या काळात हजारो लोकांसाठी प्रेरणास्थान आहे. एमबीए पूर्ण केल्यानंतर नोकरी न करता विदेशी फळांच्या लागवडीला त्याने प्राधान्य दिले. त्याचे हे पाऊल कौतुकास्पद आहे.
कोरोनामुळे झाला अॅव्होकॅडो शेतीला विलंब
हर्षितने 2019 भोपाळमध्ये मित्रांच्या मदतीने ही शेती सुरू केली. मात्र, 2020 मध्ये कोरोना महामारीमुळे या शेतीला विलंब झाला. जगभरातील व्यवहार थोडेसे रुळावर आल्यानंतर जुलै 2021 मध्ये हर्षितने इस्रायलमधून अॅव्होकॅडोची रोपे आयात केली. सध्या ही रोपे त्याच्या नर्सरीत वाढविली जात आहेत. अॅव्होकॅडोची रोपे पूर्ण वाढण्यास सुमारे 3 वर्षे लागतात. भारतात या फळाला खूप मागणी आहे. हर्षितची फळे तयार होण्यापूर्वीच अनेक राज्यांतून आगाऊ बुकिंग झाले आहे. अॅव्होकॅडोच्या झाडाला जानेवारीमध्ये फुलोरा येतो तेव्हा त्याचा “पीक सीझन” असतो. सप्टेंबरमध्ये ही फळे तयार होतात.
500 ते 1200 रुपये किलोने विकले जाते फळ
खूप अभ्यास केल्यानंतर, हर्षितने खूप विचार करून ॲव्होकॅडोची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यामागे आपल्या देशात आरोग्यदायी परदेशी फळे स्वस्तात सर्वसामान्यांना मिळावीत आणि कष्ट उपसणाऱ्या शेतकऱ्यांना कमी श्रमात अधिक उत्पन्न देणारा नवा मार्ग दाखवावा, हा हेतू आहे. हे फळ खूप महाग आहे. भारतीय ॲव्होकॅडो आणि इस्रायली ॲव्होकॅडोचे बाजारात वेगवेगळे दर आहेत. भारतात उगवलेले फळ हे 500 ते 1200 रुपये किलोने विकले जाऊ शकेल. आयातीत फळाची किंमत मात्र दुपटीहून अधिक असते. दोन्ही देशातील तापमान, हवामान आणि लागवड तंत्रज्ञान सारखेच असल्याने फळाचा दर्जा अर्थातच सारखाच राहील.
आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ॲव्होकॅडो फळ
ॲव्होकॅडो हे फळ आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, प्रथिने आणि इतर फायदेशीर नैसर्गिक घटक आढळतात. आरोग्य आणि फिटनेसच्या बाबतीत परदेशात या फळाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ॲव्होकॅडो फळ खाण्याचा अनेक फायदे आहेत, जसे की –
• पचनसंस्था निरोगी राहण्यासोबतच हृदयही निरोगी राहते.
• मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते तसेच वजन कमी करण्यास मदत करते.
• कर्करोगाच्या रुग्णांसाठीही हे फळ अत्यंत फायदेशीर ठरते.
• केस गळणे थांबवते आणि त्यांना मजबूत बनवते.
• त्वचेचे सौंदर्य आणि दृष्टी निरोगी राहण्यास मदत होते.
Now common man will also be able to eat superfood avocado, after taking training from Israel, Harshit Godha started the cultivation of super food in Bhopal, Madhya Pradesh. This fruit is very expensive but very beneficial for health.
हर्षित गोधा गाव मोबाईल नंबर पाहिजे
Harshit Godha, MBA, Bhopal
Indo Israel Avocado with Netafim
09109107400
संदर्भ: ॲग्रोवर्ल्ड, जळगाव