प्रतिनिधी / पुणे
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अम्फान चक्रीवादळाचा देशातील अनेक भागांना फटका बसला असून सर्वात जास्त नुकसान हे पश्चिम बंगाल मध्ये झाले आहे. त्याचप्रमाणे अम्फान चक्रीवादळाने देशात येऊ घातलेल्या मान्सूनवर देखील परिणाम केला असून दक्षिण अंदमानमध्ये दाखल झालेल्या मान्सूनची गती यामुळे मंदावली आहे.
अम्फान चक्रीवादळामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांना चालना मिळाली आणि मान्सून दक्षिण अंदमान निकोबार बेटावर दाखल झाला. त्यानंतर मात्र पुढे मान्सून वाऱ्यांनी चाल केली नाही. अम्फान चक्रीवादळामुळे हवेतील बाष्प ओढून नेले व वाऱ्यांची दिशा प्रभावित झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ही सर्व परिस्थिती निवारल्यानंतर वाऱ्याचा प्रवाह सुरळीत होईल आणि मान्सूनची पुढील वाटचाल स्पष्ट होईल. या कारणामुळे केरळमधील मान्सूनचे आगमन काहीसे लांबणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यापूर्वी दिलेल्या ५ जूनच्या मान्सूनच्या तारखेत बदल होऊ शकतो.
राज्यात उष्णतेची लाट
अम्फान चक्रीवादळामुळे हवेतील उष्णतेमध्ये वाढ होऊन कोरडे हवामान झाले आहे.दरम्यान २४ तासात राज्यात सर्वोच्च तापमान नागपूर येथे ४५.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. उद्या (दि.२५ मे) पर्यंत ही उष्णतेची लाट कायम राहणार असून याचा परिणाम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यासह राज्यातील इतरही भागात जाणवेल.यामुळे पुढील काही दिवस नागरिकांनी काळजी घ्यावी असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.