मागील आठवड्यापासून राज्यात बहुतांश ठिकाणी संततधार पाऊस सुरू असून त्यामुळे राज्यातील जलसाठयात लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढलेल्या जलसाठयामुळे जमिनीत पाण्याचा निचरा होत नसल्याने, याचा खरीपातील पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. राज्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कापूस पिकावर देखील याचा परिणाम होत आहे.
हवामान खात्याच्या दिलेल्या नवीन अंदाजानुसार अजून 4-5 दिवस पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे या स्थितीत शेतकर्यांनी काय काळजी घ्यावी या बाबत शेतकरी संभ्रमावस्थेत आहे. अति पावसामुळे कापूस पिकावर आकस्मीक मर रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. जर आपल्याही शिवारात कापुस पिकावर आकस्मीक मर रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल तर खालीलप्रमाणे उपाय योजना करावी.
काय करावी उपाय योजना
सध्या सतत पडणाऱ्या पावसामुळे आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसत आहेत, त्यासाठी 100 लिटर पाण्यात दीड किलो युरिया अधिक दीड किलो म्युरेट ऑफ पोटॅश हे द्रावण करून प्रत्येक झाडाच्या बुंध्याभोवती दोनशे ते अडीचशे मिली आळवणी करावी. खोडावर, मुळावर बुरशी जास्त वाटत असल्यास त्यामध्ये अर्धा किलो कॉपर ऑक्सिक्लोराईड टाकावे त्यानंतर 15 दिवसांनी 100 लिटर पाण्यात दोन किलो डीएपीची आळवणी करावी, अशी झाडे वाढू नये म्हणून वरील प्रमाणे ड्रेंचिंग करावे किंवा ठिबकची व्यवस्था असल्यास एकरी अर्धी गोणी युरिया आणि अर्धी गोणी मूरेट ऑफ पोटॅश किंवा १३:००:४५ हे विद्राव्य खत सोडावे, तसेच फवारणी मधून 100 लिटर पाण्यात दीड किलो युरिया घेऊन फवारणी करावी त्यानंतर चार ते पाच दिवसांनी शंभर लिटर पाण्यात एक किलो १९:१९:१९ या विद्राव्य खताची फवारणी करावी, पावसाचे जास्त पाणी साचू देऊ नये, जमीन कायम वाफसा परिस्थिती ठेवावी.
सध्या सतत पडणाऱ्या पावसामुळे आकस्मिक मर रोगाचा सारखी लक्षणे दिसत आहेत, पाने कोमजणे, पाने पिवळी होणे, गळणे व इतरही लक्षणे काही लगेच दिसत नाहीत. त्यासाठी वरील प्रमाणे उपाय करावा. आकस्मिक मर रोग हा काही कोणत्या जिवाणू, विषाणू, बुरशी किंवा किडीमुळे होत नसून तो कापूस पिकच्या शरीरक्रियेमध्ये झालेला बिघाड आहे. त्यासाठी वरील प्रमाणे उपाय योजना करावी. शक्य झाल्यास वापसा परिस्थिति झाली तर कोळपणी करून घ्यावी जेणेकरून पिकाची अन्नद्रव्य घेण्याची क्षमता वाढून आकस्मिक मर रोगाला अटकाव होईल.
डॉ. संजीव पाटील
कृषी संशोधन केंद्र,
जळगांव.
ओके