पुणे (प्रतिनिधी) – गुलाब चक्रीवादळाचा परिणाम राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पहायला मिळला. या चक्रीवादळामुळे अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडल्यामुळे जीवितहानीसोबत मोठे वित्तीय नुकसानही झाले. हातातोंडाशी आलेले पीक पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. अशामध्ये सर्वांसाठी दिलासा देणारा बातमी म्हणजे पुढचे दोन ते तीन दिवस राज्यात पावासाचा जोर कमी राहणार आहे. पण मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. कोकणामध्ये मात्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
अरबी समुद्रात शाहीनची निर्मिती..
गुलाब चक्रीवादळापासून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अरबी समुद्रात शाहीन चक्रीवादळ निर्माण झाले आहे. महत्वाचे म्हणजे या चक्रीवादळाचा धोका राज्य किंवा देशाच्या किनारपट्टीला नसल्याचेही भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. गुलाब चक्रीवादळातून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव सध्या गुजरात आणि खंबातच्या आखातावर आहे. उत्तर-पूर्व अरबी समुद्रात शुक्रवारी 1 ऑक्टोबरपासून तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून हेच शाहीन चक्रीवादळ आहे. हे वादळ भारतीय किनारपट्टीपासून दूर जाऊन पाकिस्तानकडे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असली तरी महाराष्ट्र व गुजरातच्या किनारपट्टीवर याचा प्रभाव जाणवणार असल्याने मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा IMD चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. के. जेनमानी यांनी दिला आहे.
1 ते 3 ऑक्टोबर दरम्यान “या” जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता..
* 1 व 2 ऑक्टोबर – औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता
* 2 व 3 ऑक्टोबर – रायगड, रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
* 2 आणि 3 ऑक्टोबर – पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता