कोरोनानंतर आता देशात पुन्हा एक जुना आजार डोकं वर काढतो आहे. या रोगाचं नाव आहे बर्ड फ्लू . जशा बर्ड फ्लू च्या बातम्या येतात , तश्या कोंबड्यांच्या पोल्ट्री खाली केल्या जातात, लाखो पक्षांना मारलं जातं, चिकनचे दर एकाएकी खाली उतरतात, उलट-सुलट चर्चा सुरू होते आणि लोकांमध्ये दहशत पसरते पण हा रोग आहे तरी काय?
बर्ड फ्लू हा पक्षांमध्ये पसरणारा एक संसर्गजन्य रोग आहे. आजार मनुष्यात संक्रमित होऊ शकतो. हा प्रामुख्याने पक्षांचा विषाणूजन्य आजार असून तो “इन्फ्ल्यूंझा टाइप अ” या विषाणूमुळे होतो. या विषाणूंच्या प्रथिनांचे १६ एच आणि ९ एन असे प्रकार असून यापैकी एच ५, एच ७ आणि एच 10 हेच प्रकार माणसाच्या मृत्यूस कारण ठरू शकतात. त्यामुळेच एच ५ एन १ हा माणसासाठी अधिक धोकादायक मानला जातो.
प्रसार
हा आजार बाधित पक्षांच्या किंवा त्यांची विष्ठा, नाकातील आणि डोळ्यातील स्त्राव, लाळ, दूषित पृष्ठभाग, खाद्य, पाणी इत्यादींच्या संपर्काने तीव्र पसरतो. बाधित पक्षांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, त्यांचे कपडे, खाद्य, कुक्कुटपालनातील उपकरणे यांच्यामार्फत या आजाराचा प्रसार होऊ शकतो. पक्ष्याद्वारेच हा रोग माणसांपर्यंत पोहोचतो. जे लोक पक्ष्यांच्या सानिध्यात येतात त्यांच्यामध्ये हा रोग पसरण्याची जास्त शक्यता असते.
पक्षांमधीललक्षणे
बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ताप येणे, घशात खवखव होणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. बाधित पक्षी अशक्त होतात, खाद्य कमी खातात, अंडी उत्पादन घटल्याचे दिसून येते. रोग जास्त पसरला तर निमोनिया होण्याची शक्यता असते. बाधित पक्षी बऱ्याच वेळेस लक्षणे न दाखविता मेलेले आढळतात.
रोगनिदान
लक्षणांवरून या आजाराचे प्राथमिक निदान करता येते. पक्क्या निदानासाठी रक्तजल किंवा नासिकेमधून घेतलेले पक्षांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवावे लागतात.
उपचार
पक्षांसाठी सध्या तरी या आजारावर विशिष्ट उपचार उपलब्ध नाही. सरकारच्या निर्देशानुसार जिथे हा आजार असेल तेथील एक किलोमीटरच्या परिसरातील पक्षी मारून टाकणे आणि तीन किलोमीटरचा भाग प्रतिबंधित करणे हा एकमेव उपाय आहे.
बर्ड फ्लूचा मानवांमध्ये प्रसार व लक्षणे एखादी व्यक्ती बर्ड फ्लूचा संसर्ग झालेल्या पक्षाच्या सरळ संपर्कात आल्याने त्यालायाची लागण होऊ शकते. या आजाराचा सर्वाधिक धोका आजारी पक्षांच्या सान्निध्यात येणाऱ्या व्यक्तींना असतो. बाधित व्यक्ती पासून इतर व्यक्तींना संसर्ग होण्याची शक्यता कमी असते. विषाणूने दूषित असलेले अर्धे कच्चे मांस किंवा अंडी खाल्ल्याने हा आजार होऊ शकतो. दिसण्यास सुरवात होते. संसर्ग झालेल्या व्यक्तीस फ्लू सारखा आजार जडल्याचे दिसते. ताप येणे, खोकला, घशात खवखव, पोट दुखी, उलट्या, अतिसार, डोकेदुखी, सांधेदुखी यासारखी लक्षणे दिसून येतात. संक्रमण वाढून निमोनिया होऊ शकतो. कधी कधी श्वास घेण्यासहि त्रास होऊ शकतो. पण आत्तापर्यंत भारतात बर्ड फ्लूचा संसर्ग माणसाला झाल्याचे निदर्शनास आलेले नाही. जागरूक राहा · बर्ड फ्लू संबंधी शास्त्रीय माहिती अवगत करून घ्या. · चिकन म्हणजे मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवलेली असतील तर ते खायला सुरक्षित आहेत. · आजारी किंवा बाधित पक्ष्यांचे मांस किंवा अंडी खाणे टाळावे. · आजारी आणि मृत पक्षी दिसून आल्यास त्वरित पशुवैद्यकीय अधिकार्यास सूचित करावे. · कच्चा पोल्ट्री उत्पादनात सोबत काम करताना आपले हात साबणाने वारंवार धुवा. · व्यक्तिगत स्वच्छता राखा, परिसर स्वच्छ ठेवा . · कच्चे चिकन किंवा चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोव्हसचा वापर करा . · शिल्लक राहिलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा.
डॉ. आर. आर. फरांदे सहाय्यक प्राध्यापक , |