नांदेड (सचिन कावडे) –
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुका हा केळी उत्पादनासाठी राज्यासह देशभरात चांगले नावलौकिक मिळवीत असून येथील केळी जगभरातील कानाकोपर्यात पोहचली आहे. तालुक्यातील पार्डी मक्ता या गावातील वसंत पंडितराव देशमुख यांची 50 टन केळी यंदा थेट ईराणमध्ये पोहचली असून या केळीच्या विक्रीतून त्यांना सद्यस्थितीत 7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर उर्वरित 50 टन केळी पुढील महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध होईल. पारंपरीक पिकांसोबत शेतात नव-नवीन प्रयोग करण्यावर 36 वर्षीय वसंतराव भर देतात. यामुळे प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
अर्धापूर तालुक्यातील पार्डी मक्ता हे गाव नागपूर-तुळजापूर राज्य मार्गावर असून नांदेड शहरापासून 20 किलो मीटर अंतरावर वसलेले अंत्यत शांतप्रिय गाव. 3 हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतीत मुख्यत्वे तीन नगदी पीकं घेतली जातात. यामध्ये केळी, ऊस व हळद या पिकांचा समावेश आहे. वसंतराव 3 ते 4 वर्षांचे असतांनाच त्यांचे वडील पंडितराव देशमुख यांचे दु:खद निधन झाले. लहानपणापासून वसंतरावांना शेतीची आवड असल्याने आजोबा व काकांसोबत शेतातील कामे करण्यात त्यांचे मन रमू लागले होते. दरम्यान, सन 1998 मध्ये दहावी पास झाल्यानंतर वसंतरावांनी पूर्णवेळ शेतीच करण्याचा निश्चय करून स्वतःला शेती कामात झोकून दिले. इतर शेतकर्यांनप्रमाणे वसंतरावही पारंपरिक पिके घेतात. परंतु मुळात प्रयोगशील असलेले वसंतराव पारंपारिक पिकांसोबत शेतात नव-नवीन प्रयोग करीत असतात. या प्रयोगातून मिळणार्या यशातूनच आज वसंतराव जिल्हाभरात उद्योजक शेतकरी म्हणून नावारूपाला आले आहेत.
चार एकरात केळीची लागवड
वसंतराव देशमुख यांना वडिलोपार्जित 8 एकर शेती आहे. पारंपरिक पिकांसोबत शेतीत नेहमीच हवामानबदलाप्रमाणे वेगवेगळी पिके ते घेत असतात. 8 एकर शेतीपैकी त्यांनी 4 एकर शेतीमध्ये 15 ऑगस्ट 2020 रोजी 5 हजार खोड (बेन्याची) लागवड केली. परभणी येथील कृषी विद्यापीठातून 2019 मध्ये केळीचे एक रोप 14 रुपये दराने असे 2 हजार रोपे आणण्यात आली होती. यामधूनच 5 हजार दर्जेदार खोडाचा (बेणे) घरगुती उपयोग लागवडीसाठी करण्यात आला.
मशागत व खत मात्रा
संपूर्ण 4 एकर शेतामध्ये सेकंड (बेण्याची) लागवड करण्या अगोदर जमिनीत एकवेळेस शेणखत तर दुसर्यांदा बरु (ढेंचा) 50 किलो जमिनीत टाकून अशी दोनवेळा मशागत करण्यात आली. यानंतर बीजप्रक्रिया करुन 5 हजार बेण्याची लागवड करण्यात आली. लागवडीच्या आठ दिवसानंतर केळीच्या पिकांच्या मुळामध्ये वाढ व्हावी, यासाठी पंधरा दिवसात दोनवेळा आळवणी (ड्रिचिंग) करण्यात येते. यानंतर एक महिन्याच्या कालावधीनंतर खताची मात्रा दिली. नंतर 45 दिवसानंतर आणखी एकवेळा खताची मात्रा दिली. वसंतराव पाणी ड्रीप पद्धतीने केळी पिकांना पाणी देतात. त्यामुळे इतरही विद्राव्य खते सोडणे सोयीस्कर होते.
केळीचे 50 टन उत्पादन
केळी लागवडी केल्यानंतर साधारण 11 महिन्यापासून केळी काढणीस सुरुवात होते. जुलै महिन्यात काढण्यात आलेल्या 50 टन केळीची विक्री अर्धापूर येथील स्थानिक व्यापारी असलेले बड्डे मिया फ्रुट कंपनीला करण्यात आली. या फ्रुट कंपनीमार्फत सदर 50 टन केळीची निर्यात ईराणला करण्यात आली. वसंतराव देशमुख यांच्या 1 टन केळीला 14 हजार रुपयांचा दर मिळून 50 टन केळाच्या विक्रीतून जवळपास 7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
वर्षाकाठी 100 टन उत्पादन
वसंतराव यांना जुलै महिन्यात झालेल्या 50 टन केळीच्या विक्रीतून 7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर अजून शिल्लक असलेली 50 टन केळी पुढील महिन्यात काढण्यात येईल. या दरम्यान केळीचा दर कमी झाल्यास जवळपास 3 लाख रुपयांचे तरी उत्पन्न मिळेल. म्हणजेच वर्षाकाठी 100 टन केळीच्या विक्रीतून 10 लाख रुपयांचे उत्पन्न होते.
केळीला परराज्यांतून मोठी मागणी
अर्धापूर तालुक्यात केळीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरवर्षी केळीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. येथील केळी गुणवत्तापूर्ण असल्याने परराज्यांसह विदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तालुक्यातील अनेक शेतकर्यांची केळी तेलंगणा, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदिगड, राजस्थान व जम्मू काश्मीरसह आदी राज्यांत निर्यात करण्यात येते.
7 ते 8 लाखांचा निव्वळ नफा
शेतीमध्ये 4 एकर वर्षाकाठी 100 टन केळीचे उत्पादन होऊन जवळपास 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. तसेच वर्षाकाठी बेण, खत-औषधी, शेतीची मशागत, लेबर मजूरी असा एकूण अडीच ते तीन लाख रुपयांचा खर्च होतो. 10 लाख उत्पन्नातून तीन लाख खर्च काढल्यास जवळपास 7 ते 8 लाख रुपयापर्यंत निव्वळ नफा मिळतो. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मागीलवर्षी 1 क्विंटल केळीला 400 ते 500 रुपये दर मिळाल्याने शेतकर्यांचा लागवडीचा खर्चही निघाला नव्हता. यावर्षी मात्र केळीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी चांगलाच सुखावला आहे.
सव्वादोन एकरमध्ये 90 क्विंटल हळद
वसंतराव देशमुख यांनी आपल्या 8 एकरपैकी 4 एकरमध्ये केळीची लागवड केली होती. तर 1 जून 2020 रोजी सव्वादोन एकरमध्ये 20 क्विंटल हळदीची लागवड करण्यात आली होती. 7 ते 8 महिन्यानंतर हळदीचे पीक काढणीस येते. एप्रिल 2021 मध्ये सव्वादोन एकरात 90 क्विंटल हळदीचे उत्पादन झाले आहे. एका क्विंटल 8 ते 9 हजार रुपये भाव मिळेल या अपेक्षेने वसंतराव यांनी हळदीची साठवणूक करुन ठेवली असून ऑगस्ट नंतर चांगला भाव मिळाल्यास विक्री करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
गावरान कोंबडीचे पोल्ट्री फार्म
मागील काही वर्षांपासून हवामानात होत असलेल्या बदलामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतीला जोडव्यवसाय म्हणून वसंतरावांनी गतवर्षी 100 गावरान कोंबड्याचे पोल्ट्री फार्म 20 बाय 40 च्या जागेत सुरु केले. या कोंबडीपासून मिळणार्या अंड्यातून दिवसाला 600 रुपये मिळतात. शेतीकामात वसंतराव यांना त्यांच्या आजीबाई, पत्नी ज्योत्स्ना देशमुख यांचीही चांगलीच मदत होते.
बदलत्या हवामानानुसार शेतीत बदल आवश्यक
आगामी वर्षभरात बंदिस्त शेळीपालनाचा व्यवसाय सुरू करणार असून त्या पद्धतीने माझे काम सुरू झाले आहे. शेतकर्यांनी बदलत्या हवामान पद्धतीचा अभ्यास करून शेतीमध्ये नव-नवीन प्रयोग करण्यावर भर दिला पाहिजे. शेती व्यवसायात कधी उत्पन्न जास्त तर कधी नुकसानही होते. नुकसान झाल्यामुळे कोणताही टोकाचा चुकीचा निर्णय न घेता शेतकर्यांनी स्वतःवर संयम ठेऊन शेती कामात सातत्य ठेवले पाहिजे. नव्या पिढीला शेतीची आवड असल्यास त्यांनी पारंपरिक पिकांसोबतच शेतीला जोडव्यवसाय केला पाहिजे.
– वसंत पंडितराव देशमुख, मो. 9923070356