पुणे (प्रतिनिधी) : कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले कृषी यंत्र व अवजारांचे उत्पादन त्याचबरोबर खाजगी उत्पादकांनी विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण यंत्र व औजारांचा राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. या योजनेमध्ये समावेश करण्यासाठी अशा उत्पादकांकडून स्वारस्याची अभिव्यक्ती (एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट- ईओआय) प्रस्ताव मागविण्यात आले असल्याची माहिती राज्याचे कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक दिलीप झेंडे यांनी दिली.
राज्यातील चारही कृषी विद्यापीठाद्वारे विविध प्रकारची नाविन्यपूर्ण औजारे विकसित करण्यात आली आहेत. औजारांचे विद्यापीठाच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक उत्पादन करण्याच्या मर्यादा लक्षात घेत त्याचा लाभ शेतकऱ्यांना देता येत नाही. खाजगी उत्पादकांनीदेखील अनेक नाविन्यपूर्ण यंत्र व औजारे विकसित केली आहेत. परंतु त्याचा योजनेत समावेश नसल्यामुळे ती शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध होत नाहीत.
खाजगी यंत्रे, औजारे उत्पादकांना संधी
राज्यात कृषी विद्यापीठांद्वारे विकसित नवीन यंत्रे आणि औजारांचे उत्पादन करण्यासाठी खाजगी उत्पादकांची नियुक्ती करणे आणि या औजारांचा राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेत समावेश करण्याबाबतची प्रक्रिया विहित करण्याच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर खाजगी उत्पादकांनी विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण यंत्र औजारांचा या योजनेमध्ये समावेश करण्याबाबतची प्रक्रिया विहीत करण्याच्या प्रस्तावासही मान्यता दिली आहे. या कृषी यंत्रे व औजारांचा राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये समावेश करण्यासाठी अशा उत्पादकांकडून स्वारस्याची अभिव्यक्ती प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
प्रस्तावाबाबत आवाहन
उत्पादकांची राज्यस्तरीय नोंदणी प्रक्रिया कार्यपद्धती, अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्राबाबतचा सविस्तर तपशील http://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रक्रियेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या उत्पादकांनी विहीत अटी व शर्तीच्या अनुषंगाने नोंदणीकरीताचे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) कृषी आयुक्तालय पुणे या कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन राज्याचे कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे.