पुणे (प्रतिनिधी) – बंगालच्या उपसागरापासून तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाल्याचे भारतीय हवामान विभागाकडून ( IMD ) सांगण्यात आले. IMD ने दिलेल्या माहितीनुसार आजपासून (3 ऑक्टोबर) पुढील चार दिवस राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, असे IMD चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के. एस. होसळीकर यांनी सांगितले. घाटमाथ्याच्या परिसरात तसेच मध्य महराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही IMD कडून देण्यात आला आहे. ऐन भाद्रपदात 3, 4, 5 व 6 ऑक्टोबर हे चार दिवस मध्यम ते मुसळधार पावसाचा चटका देणारे ठरू शकतात.
राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची नोंद झाली. उर्वरीत राज्यातील बऱ्याच ठिकाणीही मध्यम ते मुसळधार पाऊस नोंदला गेला. कोकणात कमाल तापमान हे सरासरीच्या १ ते ३ अंश सेल्सिअस जास्त नोंदले गेले. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढलयाची नोंद झाली.
भारतातून 6 ऑक्टोबरपासून पावसाच्या परतीचे संकेत..; यंदा तब्बल 19 दिवस मुक्काम लांबला..!
हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या ६ ऑक्टोबरपासून वायव्य भारतातील काही भागांमधून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होण्यासाठी पोषक हवामानाचे संकेत आहे. दरवर्षी मान्सून 17 सप्टेंबरच्या सुमारास निघतो. मात्र यंदा 6 ऑक्टोबरपासून तो सुरु होत असल्याचे संकेत असल्याने भारतात त्याचा परतीचा प्रवास तब्बल 19 दिवसांनी लांबला. महाराष्ट्रात परतीचा पाऊस पोहोचायला 12 ऑक्टोबर उजाडण्याची शक्यता आहे. मान्सून ब्रेक झाल्यानं परतीचा पाऊस जवळपास 3 आठवडे लांबणीवर गेलयाचे IMD चे म्हणणे आहे.
ऑक्टोबर हिटही जाणवणार..
राज्यात काही दिवसात पावसाळा संपून हिवाळा सुरू होत असताना या कालावधीत उष्णतेत ही वाढ होते. दिवसातील कमाल व किमान तापमानात वाढलेली तफावत ही ऑक्टोबर हीट म्हणून ओळखली जाते. सध्या असेच काहीसे चित्र दिसून येत आहे. सध्या चक्रीवादळामुळे पावसाचा जोर वाढलेला आहे. पण पावसाने उघडीप दिल्यानंतर ऑक्टोबर हिटच्या कडक उन्हाचा चटकादेखील वाढला आहे.
Comments 1