वॉशिंग्टन : डॉ. नॉर्मन बोरलॉग… जगाची भूक मिटविणारा, मातीतील शास्त्रज्ञ. जगाच्या वाढत्या लोकसंख्येला पुरेल एव्हढे धान्य उत्पादन व्हावे, यासाठी आयुष्यभर झटत राहिलेला हा ध्येयवेडा. त्यांचे शिष्य, डॉ स्वामिनाथन यांनी बोरलॉग यांच्या सुधारित, दर्जेदार अशा “संकरित” फॉर्म्युल्याने भारतातील “हरित क्रांती”ची बीजे रोवली. इतकी आश्चर्यकारक कामगिरी आणि जगभर प्रशंसा असूनही, डॉ. नॉर्मन बोरलॉग हे मायभूमी अमेरिकेत कृषी वर्तुळाबाहेर फारसे प्रसिद्ध नाहीत. नव्या पिढीला तर त्यांच्या कार्य-कर्तृत्त्वाची कल्पनाच नाही. त्यामुळेच अमेरिकेतील नव्या पिढीसाठी डॉ. नॉर्मन बोरलॉग यांची जीवनगाथा आता नव्याने लिहिली गेलीय. सुप्रसिद्ध बालसाहित्यिका पेगी थॉमस यांनी त्यातून खाकी कपड्यातील ‘सुपरहीरो’ रंगविला आहे.
वॉशिंग्टन, लिंकन, जेफरसन, फोर्ड यांच्यावर पुस्तके लिहिणाऱ्या लेखिका
पेगी थॉमस या मुलांच्या पुस्तकांसाठी प्रसिद्ध आहेत. या लेखिकेने जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, हेन्री फोर्ड आणि अब्राहम लिंकन यांच्याबद्दलचा इतिहास अमेरिकेतील नव्या पिढीला माहिती करून दिलाय. त्यांनीच आता डॉ. नॉर्मन बोरलॉग यांचे आयुष्य सहज-सोप्या भाषेत चितारले आहे. “हिरो फॉर द हंग्री: द लाइफ अँड वर्क ऑफ नॉर्मन बोरलॉग” (भुकेल्यांचा हिरो : नॉर्मन बोरलॉग यांचे जीवन-कार्य) असे या पुस्तकाचे नाव आहे. आश्चर्य म्हणजे, हे पुस्तक लिहायला सांगून प्रकाशनाने थोडक्यात कथा सांगेपर्यंत, स्वतः लेखिका पेगी थॉमस यांनाही डॉ. बोरलॉग यांच्या अफाट कार्याबद्दल पुरेशी माहिती नव्हती. सॅराटोगा स्प्रिंग्स, न्यूयॉर्क येथे नुकत्याच झालेल्या “नॅशनल ॲग्रीकल्चर इन क्लासरूम कॉन्फरन्स”मध्ये लेखिकेने स्वतः याची कबुली दिली. मात्र, जेव्हा आपल्याला डॉ. बोरलॉग यांच्या जीवन-कार्याचे संक्षिप्त सार समजले, तेव्हा मी भारावून गेले, थक्क झाले, असे लेखिका थॉमस यांनी यावेळी सांगितले.
डॉ. बोरलॉग हे साधेसुधे, नम्र व्यक्ती
लेखिका या कॉन्फरन्समध्ये म्हणाली, “डॉ. नॉर्मन बोरलॉग हे खरोखरच एक सुपरहिरो होते. एक सुपर पॉवरच जणू! त्यांना मानवतेची काळजी होती. मला हे जाणून घ्यायचे होते, की त्यांच्यात ही एव्हढी महाशक्ती आली कुठून? डॉ. बोरलॉग हे नोबेल शांतता पारितोषिक, कॉंग्रेसनल गोल्ड मेडल आणि ‘प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम’ मिळालेल्या सात लोकांपैकी एकमेव, ज्यांनी आत्मचरित्र नाही लिहिले. खरोखरच ते एक साधेसुधे आणि नम्र व्यक्ती होते.”
क्रियेवीण वाचाळता व्यर्थच
डॉ. बोरलॉग यांच्यावरील पुस्तक लिहिताना त्यांनी मागे सोडलेल्या मुलाखतीच्या रेकॉर्डस् आणि त्यांनी काढून ठेवलेल्या विस्तृत नोट्स हा एक अमूल्य ठेवा ठरला, असे लेखिका म्हणाली. “त्यांची ही सारी व्यक्तिगत सामग्री माझे डोळे उघडणारी होती. त्यातून मला डॉ. बोरलॉग यांचे कार्य किती महत्त्वाचे होते, ते कळू शकले,” असेही लेखिका थॉमस यांनी स्पष्ट केले. या कॉन्फरन्समध्ये लेखिकेने डॉ. बोरलॉग यांचे एक आवडते वाक्य (कोट) शेअर केले – “टू डॅम मच फिलॉसॉफी अँड नॉट इनफ ॲक्शन” म्हणजेच, “प्रत्यक्ष कोणतीही कृती न करता फक्त तत्त्वज्ञान ऐकवत बसणे, म्हणजे निव्वळ मूर्खपणा!” प्रेक्षकांनी त्यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. त्यावर पेगी थॉमस यांनी हसत-हस्त सांगितले, की “थोडक्यात काय, तर ते नॉर्मन आहेत, दी ग्रेट सुपरहिरो, ज्यामुळे आमची आणि आताची पिढी सुखाने, पुरेसे खाऊ शकतेय!” आणि लेखिकेने या कॉन्फरन्सचा समारोप केला.
शिक्षकांनो, नव्या अमेरिकी पिढीपर्यंत डॉ. बोरलॉग यांचे कार्य पोहोचवा
लेखिका पेगी थॉमस यांनी कॉन्फरन्समध्ये सहभागी अमेरिकेतील निवडक नामांकित शाळांतील शिक्षकांना आवाहन केले, की नव्या अमेरिकी पिढीपर्यंत डॉ. बोरलॉग यांचे कार्य पोहोचायलाच हवे, ती मोठी जबाबदारी आता तुम्हाला पार पाडायची आहे. डॉ. बोरलॉग हे जगाच्या काही भागांमध्ये अतिशय पूजनीय व्यक्तिमत्त्व आहे, तिथे त्यांच्या जयंती-पुण्यतिथी साजरा केली जाते; अमेरिकेतच बहुतेक ठिकाणी आता त्यांची ओळख उरलेली नाही. जगाच्या बहुतांश भागातही, बहुतेक लोकांना आज डॉ. बोरलॉग कोण आहे, हे माहित नाही. लेखिका थॉमस म्हणाल्या, “ज्या माणसाने आमच्या डायनिंग टेबलवर आम्हाला पुरेसे अन्न मिळेल, याची व्यवस्था केली, त्याला आम्ही विसरत असू, तर आम्ही आमची मुळे गमावत चाललो आहोत. डॉ. नॉर्मन बोरलॉग यांचे अमेरिकेसह सर्वत्र कृतज्ञ स्मरण होणे आवश्यक आहे.”
डॉ. बोरलॉग यांना प्रेरणा मिळाली आजोबांकडून
नव्या पिढीसाठी नव्याने डॉ. नॉर्मन बोरलॉग यांचा शोध घेणाऱ्या लेखिका पेगी थॉमस म्हणतात, “डॉ. नॉर्मन यांना उत्पादक शेतीची प्रेरणा आजोबांकडून मिळाली. ते प्रयोगशील शेतकरी होते. भरपूर मेहनत घेऊनही पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने ते चिंतित असायचे. शेतीप्रती प्रेम, निष्ठा, समर्पण आणि प्रयोगशीलता हे सारे डॉ. नॉर्मन यांनी आजोबांच्याच गुणातून उचलले. त्यांचे आजोबा नेहमी एका चांगल्या, शांततामय जगाची कल्पना करायचे. लहानपणापासूनच डॉ. नॉर्मन यांनाही त्याच ध्येयाने पछाडले. आपण स्वतःला पात्र बनवायला हवे, काहीतरी करून दाखवायला हवे, ही उर्मी त्यांच्याठायी होती.
जगातील सर्वात वाईट समस्या – भूक
लेखिका थॉमस यांच्या मते, डॉ. बोरलॉग यांना तरुणपणीच जगातील सर्वात वाईट समस्या असलेल्या भुकेला सामोरे जावे लागले. रॉकफेलर फाउंडेशनसाठी काम करत असताना त्यांना मेक्सिकोत पाठविले गेले. तेव्हा मेक्सिकोत उपासमारी, भूकबळीची समस्या होती. अशा स्थितीत मेक्सिकन लोकांना मदत करणे, त्यांना जिवंत राहण्यासाठी खाद्य पुरविणे, ही जबाबदारी डॉ. बोरलॉग आणि त्यांच्या टीमवर होती. मात्र, त्यावेळी मेक्सिकोत जे काही भीषण वास्तव पाहिले, त्यासाठी डॉ. बोरलॉग हे मानसिकदृष्ट्या नक्कीच तयार नव्हते.
नव्या संकरित गव्हाच्या वाणाने मेक्सिकोला केले स्वयंपूर्ण
मेक्सिकन आयोवा शेतीच्या मुळांप्रमाणेच, डॉ. बोरलॉग हे पूर्ण निर्धाराने, मन खंबीर करून टीमसह, मेक्सिकन विद्यार्थ्यांसोबत शेतात राबू लागले. अहोरात्र काम करत, त्यांनी स्वतःला त्यात झोकून दिले. अगदी बारीकसारीक तपशील अभ्यासले गेले. डॉ. बोरलॉग आणि त्यांच्या टीमने प्रत्येक रोपाची सतत तपासणी केली. ते सारे झपाटल्यागत काम करत होते. उत्तर आणि दक्षिण मेक्सिकोमध्ये नवीन वाणांची चाचणी करून, नव्या बदलांना रोपे अनुकूल होऊ शकतात, हे त्यांनी सिद्ध केले. लेखिका थॉमस म्हणतात, “शेतकर्यांना नवीन, सुधारित, अधिक उत्पादनक्षम गहू मिळावा, असा नेहमीच आग्रह डॉ. बोरलॉग यांनी धरला. अथक परिश्रम आणि प्रयोगांनी ते त्यात यशस्वी झाले. त्यांनी शोधलेल्या नवीन, चांगल्या गव्हाने शेतकरी, उत्पादकांवर मोहिनी घातली आणि मेक्सिको धान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला.”
भारत, पाकिस्तानातील हरित क्रांती लक्षवेधी
लेखिका थॉमस म्हणतात, “संयुक्त राष्ट्रसंघाने भारत आणि पाकिस्तानमधील दुष्काळी परिस्थिती सुधारण्यासाठी, डॉ. बोरलॉग यांच्याकडे त्यांच्या कौशल्य आणि अनुभवातून मदत करण्याची मागणी केली. तेव्हा डॉ. बोरलॉग यांनी भारतीय, पाकिस्तानी आणि तुर्की विद्यार्थ्यांसोबत मेक्सिकन शेतांमध्ये काम केले. त्या सर्वांना प्रत्यक्ष शेतीतील प्रयोगशीलतेचे धडे दिले; भरपूर प्रशिक्षण आणि सराव करवून घेतला. त्याकाळी भारत-पाकिस्तानात युद्ध सुरू होते. उभय राष्ट्रातील मैदानात आणि राजनैतिक पातळीवरही लढाया सुरू होत्या, अनेक अडथळे होते, प्रतिकूल परिस्थिती असूनही बोरलॉग यांनी त्यावर मात केली. भारत-पाकिस्तानात नव्या संकरित गव्हाचे तंत्र यशस्वीरित्या पेरले गेले. या देशांमध्ये 1968 ची गव्हाची कापणी विक्रमी होती. भारत-पाकिस्तानातील शाळा बंद करून वर्गात धान्य साठवले गेले. तिथे हरितक्रांतीची बीजे पेरली गेली. त्या देशातील दुष्काळ, उपासमार संपली. हे सारे अभूतपूर्व, अविश्वसनीय होते आणि हे सारे शक्य होऊ शकले ते ‘सुपरहिरो डॉ. नॉर्मन बोरलॉग यांच्यामुळे!”
जगात पुरेसे अन्न-धान्य असेल तरच नांदेल शांतता
लेखिका पेगी थॉमस यांनी, “हिरो फॉर द हंग्री: द लाइफ अँड वर्क ऑफ नॉर्मन बोरलॉग” या पुस्तकाचा समारोप डॉ. बोरलॉग यांच्या एका वाक्यानेच केला आहे. डॉ. बोरलॉग हे कृषी शास्त्रज्ञ आणि राज्यकर्त्यांना नेहमी सांगायचे, “तुम्हाला जगभरात शांतता हवी असेल तर न्याय जोपासा; पण त्याचबरोबर शेतांमध्ये पेरणी करून भरपूर अन्न-धान्य उगवा, त्याशिवाय जगात शांतता नांदणे कठीण आहे.”
USA’s famous Children’s author Peggy Thomas, wrote new book “Hero For The Hungry: The Life & Work of Norman Borlaug.” She is bringing Borlaug’s story to a new generation and wider audience. Thomas promoted Borlaug as a hero and wants more children should learn about.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
युक्रेन-रशिया युद्धामुळे जग अन्न संकटाच्या फेऱ्यात!
इस्राईलमध्ये तयार होतोय नेक्स्ट जनरेशन रोबोटिक मजूर; फळबागांमध्ये करणार फळतोडणी
Comments 6