नवी दिल्ली : यंदा मुबलक अन्नधान्य उत्पादन होणार असून गेल्या 5 वर्षांतील उच्चांक गाठला जाईल. तृणधान्ये, कडधान्ये आणि तेलबियांचे विक्रमी उत्पादन वाढल्याने गव्हाचे उत्पादन घटू शकते. तर कापूस घटून ऊस उत्पादन वाढेल, असा अंदाज केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी वर्तविला आहे. देशातील कृषी उत्पादनाविषयीचा चौथा सुधारित अंदाज त्यांनी जाहीर केला.
या अंदाजानुसार, पीक वर्ष 2021-22मध्ये देशात 315 दशलक्ष टन विक्रमी अन्नधान्य उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. गेल्यावर्षी म्हणजेच 2020-21 मध्ये देशात 310.7 दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन झाले होते. म्हणजेच यंदाचे उत्पादन हे गेल्या वर्षीपेक्षा 4.98 दशलक्ष टन जास्त असू शकेल. पीक वर्ष हे जुलै ते जून या कालावधीत गणले जाते.
पंजाब-हरियाणात गहू, अन्नधान्य उत्पादन घटणार
कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, की पंजाब आणि हरियाणासह उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेमुळे गव्हाच्या पिकांवर वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे या भागातील गहू उत्पादन घटून एकूण अन्नधान्याचे उत्पादनही त्यामुळे घटले. गेल्यावर्षी गव्हाचे उत्पादन 109 दशलक्ष टन होते. यंदा ते तीन टक्क्यांनी घटून 106 दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे.
निर्भेळ, दर्जेदार, सकस धान्य आणि डाळी सवलतीत खरेदी करा
तांदूळ, मका, हरभरा, ऊस उत्पादनात होणार वाढ
गेल्यावर्षी तांदूळ उत्पादन 124 दशलक्ष टन असलेले तांदूळ उत्पादन यावर्षी 130 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांत सरासरी तांदूळ उत्पादन हे 116.84 दशलक्ष टन होते. त्यात यंदा तब्बल 13.85 दशलक्ष टन इतकी भरीव वाढ होईल. केंद्रीय कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या 2021-22 च्या सुधारित चौथ्या अंदाजात तांदूळ, मका, कडधान्ये, हरभरा, मोहरी, तेलबिया आणि ऊसाचेही विक्रमी उत्पादन अपेक्षित असल्याचे सांगितले गेले आहे. सोयाबीन उत्पादन 12.99 दशलक्ष टनापर्यंत पोहोचेल. हरभरा आणि मक्याचे अनुक्रमे 14.75 आणि 33.65 दशलक्ष टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. तूर उत्पादन तूर 4.3 दशलक्ष टन तर एकूण भरड धान्योउत्पादन हे 59.9 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे.
डाळी, तेलबियांच्या उत्पादनात होणार वाढ
यंदा डाळींचे उत्पादन 27.6 दशलक्ष टन असू शकते, जे गेल्यावर्षी 25.4 दशलक्ष टन होते. गैर-अन्नधान्यांमधील तेलबियांचे उत्पादन 35.90 दशलक्ष टनांवरून 37.7 दशलक्ष टनांपर्यंत वाढू शकते. मोहरीचे उत्पादन 17.7 दशलक्ष टन होऊ शकते. भुईमूग उत्पादन हे 10.11 दशलक्ष टन होऊ शकते. सोयाबीन 12.99 दशलक्ष टन, मोहरी 11.75 दशलक्ष टन, ऊस 431.81 दशलक्ष टन, कापूस 31.20 दशलक्ष गाठी (एका गाठ 170 किलो), ज्यूट (ताग) आणि मेस्ता 10.32 दशलक्ष गाठींच्या (एक गाठ 180 किलो) उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कापूस उत्पादनात घट; ऊसात मात्र वाढ
यंदा कापसाचे उत्पादन 35 दशलक्ष गाठीवरून 31 दशलक्ष गाठींवर घसरण्याचा अंदाज आहे. एका गाठीचे (बेल) वजन हे सुमारे 170 किलो असते. तागाचे (ज्यूट) उत्पादन मात्र गेल्यावर्षीच्या 93 लाख गाठींच्या तुलनेत 1.31 कोटी गाठीवर पोहोचण्याचा अंदाज आहे. तागाच्या एका गाठीचे वजन 180 किलो असते. यंदा उसाचे उत्पादन 431.81 दशलक्ष टन अपेक्षित आहे. गेल्या वर्षी उसाचे उत्पादन 400.0l5 दशलक्ष टन होते. गेल्या पाच वर्षांतील देशाचे सरासरी ऊस उत्पादन 373.46 दशलक्ष टन होते. यंदा त्यात तब्बल 58.35 दशलक्ष टन इतकी मोठी वाढ होण्याचा अंदाज कृषी मंत्रालयाच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे यंदाही गेल्यावर्षीप्रमाणेच कापूस दर तेजीत राहण्याची शक्यता आहे. साखरेचे दर मात्र खालावलेले राहू शकतात.
• “यंदा अन्नधान्याचे उत्पादन 25 दशलक्ष टनांनी वाढण्याचा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत हा विक्रम ठरेल. यंदा तांदूळ, ऊस यासह हरभरा, मका, कडधान्ये-डाळी तसेच मोहरी आणि इतर तेलबिया उत्पादनात मोठी वाढ अपेक्षित आहे. कोरोनाच्या संकटातील गेल्या दोन वर्षांतील स्थितीवर मात करून बळीराजा पुन्हा उभारी धरत आहे. शेतकऱ्यांच्या अपार कष्ट आणि मेहनतीला केंद्र सरकारच्या शेतीपूरक धोरणाने बळ दिल्यानेच हे शक्य होऊ शकले.”
– नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय कृषीमंत्री
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन अनुदानासाठी 5,000 कोटींची तरतूद
कृषी अवजारे नोंदणी आता बंधनकारक, त्यानंतरच वापर! जाणून घ्या Up 2 Date निर्णय …
शेतकऱ्यांनो, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाम / तारण योजनेचा असा घ्या लाभ व वाढीव दराने विका शेतमाल..
Comments 4