जळगाव : खरीप हंगामानंतर पिकांचा रब्बी हंगाम येत आहे. रब्बीच्या मुख्य अन्न पिकांमध्ये गहू पीक हे प्रमुख आहे. याशिवाय भात, हरभरा, वाटाणा, बार्ली, मसूर, तूर आदी पिके या हंगामात घेतली जातात. मोहरी हे या हंगामातील प्रमुख व्यावसायिक पीक आहे. गहू हे असे पीक आहे जे भारतातील प्रत्येक राज्यात घेतले जाते. जाणून घेवू या जमीन, हवामान, पूर्वमशागत, पेरणीची वेळ, पेरणी, बियाणे आणि बीजप्रक्रिया..
एकात्मिक फलोत्पादन अभियान : वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजनेसाठी 50% अनुदान ; असा घ्या लाभ
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/vniBFTSBoj4
भारताच्या तुलनेत (राष्ट्रीय उत्पादकता 29.89 क्वीं./हे.) महाराष्ट्रातील गव्हाची उत्पादकता ही देशाच्या उत्पादकतेपेक्षा खूपच कमी आहे. महाराष्ट्रातील उत्पादकता कमी असण्याची बरीच कारणे आहेत. पूर्वी महाराष्ट्रात गव्हाचे बागायती क्षेत्र खूपच कमी होते. परंतु, आता बागायती क्षेत्र बरेच वाढलेले आहे. गव्हाच्या पिकाखालील बागायती क्षेत्रात जसजशी वाढ होत गेली तसतसे एकूण उत्पादन आणि सरासरी उत्पादन वाढलेले आढळून आले आहे. यामध्ये अधिक उत्पादन देणा-या गव्हाच्या वाणांचा प्रमुख वाटा आहे.
महाराष्ट्रातील गव्हाच्या कमी उत्पादकतेची कारणे
हलक्या ते मध्यम जमिनीत गव्हाची लागवड.
गहू पिकासाठी पाण्याची करतरता.
पाण्याची उपलब्धता असल्यास इतर पिके घेण्याचा कल.
शिफारस केलेल्या वाणाची लागवड न करणे.
गहू पीक वाढीच्या सुरवातीच्या दाणे भरण्याच्या व पक्व होण्याच्या अवस्थेत जास्त तापमान.
हवामानातील वेळोवेळी होणारे बदल.
शिफारशीपेक्षा कमी खताचा वापर.
कीड व रोगांचा प्रादुर्भाव.
१५ डिसेंबरनंतर गव्हाची पेरणी.
नवीन प्रसारित वाणांचे योग्य प्रतीच्या बियाण्याची उपलब्धता न होणे.
जमीन
गहू पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन अत्यंत आवश्यक असते. परंतु हलक्या आणि मध्यम जमिनीत भरपूर भरखते व संतुलित रासायनिक खतांचा वापर केल्यास चांगले ऊत्पादन घेता येते. गव्हाच्या योग्य उत्पादनासाठी जमिन भुसभुशीत असणे जरुरीचे असते.
हवामान
गहू पिकासाठी थंड, कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असणारे हवामान चांगले मानवते. गहू पिकाच्या वाढीसाठी 7 ते 21 अंश सें.ग्रे. तापमानाची आवश्यकता असते. दाणे भरण्याच्यावेळी 25 अंश सें.ग्रे. इतके तापमान असल्यास दाण्यांची वाढ चांगली होऊन दाण्यांचे वजन वाढते.
पूर्वमशागत
गव्हाच्या मुळ्या 60 सें.मी. ते 1.00 मीटर खोलीपर्यंत वाढत असल्याने गव्हाच्या योग्य वाढीसाठी जमीन चांगली भुसभुशीत असणे आवश्यक आहे. यासाठी खरिप पीक काढणीनंतर लोखंडी नांगराने 15 ते 20 सेमी खोलवर जमिनीची नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या 3 ते 4 पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणी अगोदर 25 ते 30 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरवून टाकावे. तसेच पूर्वीच्या पिकांची धसकटे व इतर काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे.
पेरणीची वेळ
बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी व उशिरा पेरणी 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत करावी. बागायती गव्हाची पेरणी 15 नोव्हेंबरनंतर उशिराने केल्यास प्रत्येक पंधरवड्यात गव्हाचे उत्पादन हेक्टरी 2.5 क्विंटल एवढे घटते असे आढळून आलेले आहे. जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुस-या पंधरावड्यात करावी.
बियाणे आणि बीजप्रक्रिया
गव्हाच्या अधिक उत्पादनाकरिता हेक्टरी 20 ते 22 लाख झाडे शेतात असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रती हेक्टरी 100 किलो बियाणे वेळेवर पेरणीसाठी वापरावे. उशिरा पेरणीसाठी कमी तापमानामुळे गव्हाच्या पिकास कमी फुटवे येत असल्यामुळे बियाण्याचे प्रमाण 125 ते 150 किलो प्रती हेक्टरी एवढे ठेवावे. जिरायत पेरणीसाठी 75 ते 100 किलो प्रती हेक्टरी बियाण्याचा वापर करावा.
पेरणीपूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा थायरम या बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच प्रती 10 किलो बियाण्यास अॅझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धन यांची प्रती 250 ग्रॅम या प्रमाणे बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. यामुळे उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ होते.
पेरणी
गव्हाच्या वेळेवर आणि जिरायत पेरणीसाठी दोन ओळीत 20 सें.मी. तर उशिरा पेरणीसाठी 18 सें.मी. अंतर ठेवून पाभरीने पेरणी करावी. तसेच पेरणी 5 ते 6 सें.मी. खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. गव्हाची पेरणी उभी आडवी न करता एकेरी करावी म्हणजे आंतरमशागत करणे 20 सें.मी. खोलवर जमिनीची नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या 3 ते 4 सोईचे होते. शक्यतो पेरणी दक्षिणोत्तर करावी.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- बंपर उत्पादनासाठी रब्बीत अशी करा हरभरा लागवड ; जाणून घ्या.. ”पूर्वमशागत आणि पेरणीची वेळ” भाग – 1
- हरभरा लागवड : जाणून घ्या.. ”पेरणीनंतरचे ते काढणी पर्यंतचे व्यवस्थापन” भाग – 2
Comments 1