दिलीप तिवारी, ज्येष्ठ पत्रकार, जळगाव
महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी जैन इरिगेशन सिस्टीम लिमीटेडच्या जैन कृषितंत्र आणि विकास केंद्रातर्फे सुरू असलेल्या पीक लागवड आणि तंत्र प्रात्यक्षिक पाहणी उपक्रमाला प्रतिसाद वाढला आहे. आतापर्यंंत जवळपास २० हजारावर शेतकऱ्यांनी संधीचा लाभ घेतला. दि. १५ मार्चपर्यंत हा उपक्रम सुरू आहे.
या उपक्रमात पाहणीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनी पिकांची लागवड व त्याच्याशी संबंधित तंत्र पाहात असताना शिवारातील विहिरींचे निरीक्षणही करावे. या सर्व विहिरींजवळ पावसाचे पाणी विहिरीतच जिरवण्याची व्यवस्था केलेली दिसते. एवढेच नव्हे तर पिकांना गरजेनुसार आणि पुरेशा प्रमाणात विद्राव्य खते देण्याची यंत्रणा दिसते. काही विहिरींवर सोलर पॅनेलच्या ऊर्जेवर पंप सुरू असल्याचे दिसतात. विहिरींवर कापडी वा प्लास्टिकची आवरणे दिसतात. शेतकऱ्यांनी याविषयी तेथील तज्ज्ञांना विचारून अधिकची माहिती मिळवायला हवी.
जैन कृषितंत्र आणि विकास केंद्राच्या परिसरातील प्रत्येेक पीक शिवारात विहिरींसाठी जलपुनर्भरणाची व्यवस्था कशाप्रकारचे आहे ? या विषयी स्थापत्य अभियंता प्रफुल्ल पाटील यांनी माहिती दिली. पिकांसाठी पुरेसे पाणी मिळावे म्हणून शेतकरी शिवारात विहिरी खोदतात. काही जण विंधन विहिरी करतात. शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा बारमाही हंगामात हातात पैसा येईल असे पीक व्यवस्थापन करावे. पिकांसाठी गरजेनुसार जल उपसा केला जातो. ठिबक वा तुषार सिंचन यंत्रणा असेल तर पाणी देण्याचे नियंत्रित नियोजन शक्य होते.
विहिरीतून पाणी काढताना तीत असलेले पाण्याचे झरे सतत आटत जातात. शेत विहिरींची संख्या वाढते आहे. त्यामुळे जमिनीतील जलसाठे आणि त्यांचे प्रवाह आटत आहेत. शेत विहिरी लवकर कोरड्या होत आहेत. या विषयी शेकडो शेतकरी तक्रारी करतात. विहिरीच्या कामावर भरपूर खर्च होऊन बारमाही पाणी मिळत नाही अशा तक्रारी आहेत. असे होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी उन्हाळ्याच्या अखेरीस व जून महिना सुरू होण्यापूर्वी विहीरीत जलपुनर्भरणाचे नियोजन करायला हवे. हे नियोजन सोपे आहे आणि फारसे खर्चिक नाही.
शेत विहीरीत जलपुनर्भरणासाठी केवळ दोन गोष्टी लक्षात घ्याव्यात. पहिली गोष्ट म्हणजे, शेतात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, शेताभोवती चर खोदून शेतातून वाहून जाणारे पाणी शेतातच राखण्याचा प्रयत्न करायचा. या दोन्ही गोष्टी सहज शक्य असून उन्हाळ्यात ही कामे करून घेता येतात. जेसीबी सारखे यंत्र वापरून चर खोदाई अपेक्षेनुसार करून घेता येते. जलपुनर्भरणामुळे जमिनीतील जलसाठे पुन्हा भरतात. काही नवे झरे तयार होतात. उन्हाळ्यात त्याच झऱ्यांचे पाणी परत मिळते.
विहिर किंवा विंधन विहिरीजवळ जल पुनर्भरण कामही फार अवघड नाही. विहिरीकडे पाण्याचा उतार लक्षात घेऊन विहिरी लगत मोठ्या आकाराचा खड्डा खोदायचे आहे. पावसाचे पाणी, त्याची उपलब्धता व प्रवाह पाहून खड्ड्यांचा आकार अभियंत्यांच्या सल्ल्याने निश्चित करावा. हा खड्डा नंतर भरायचा असतो. त्यात खाली मोठे दगड, त्यावर छोटे दगड, त्यावर जाड वाळू टाकावी. त्यावर खाडीचा थर करावा. या खड्ड्यात तळाशी पाईप असतो. तो विहिरीत सोडलेला असतो. पावसाचे पाणी वाहतांना सोबत गाळ, माती, कचरा आणते. ते गाळून जमिनीत जिरवण्याचे काम दगड, वाळू करते. खड्डा तयार करताना तो शास्त्रोक्त पद्धतीनेच करावा. विहिर व विंधन विहिरींसाठीचे खड्डे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात.
काही शेतकरी उत्साहाने विहिरीजवळ जलपुनर्भरणाचे खड्डे करतात. पण त्यात दगड, वाळूचा भरणा चुकीच्या पद्धतीने करतात. असे खड्डे लवकर गाळाने भरतात. तेथे जलपुनर्भरण होत माही पण पाण्याच्या दाब वा प्रवाहामुळे विहिरींचे नुकसान होते. खड्डे खोदण्यापूर्वी अभियंत्यांचे मार्गदर्शन घ्यावे. केवळ जलपुनर्भरण (Water Recharge) करणेेच नव्हे तर जल संतुलन (Water Balance) सांभाळणे आवश्यक असते. आहे त्याच शिवारात पाणी जिरवणे योग्य असते. शेतकऱ्यांनी पुढील काळात सांडपाणी व शौच कुपातून वाहून जाणाऱ्या पाण्याचाही पिकांसाठी पुनर्वापर करायचा विचार करावा. त्याचेही कमी खर्चातील आराखडे अभियंता करून देतात.
विहिरींमधील पाणी सतत स्वच्छ असावे म्हणून आता विहिरीवर अच्छादन घालणे, पाणी दुषित वा संसर्गजन्य होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक ठरते. वीज खर्च बचत करण्यासाठी शेत विहिरीचा पंप सोलरवर चालविण्याचे तंत्रही उपलब्ध आहे. विहिरीतील पाण्यातील घटकांचे दर वर्षी परिक्षण करावे. माती परिक्षण करावे. त्यानंतर पीक व्यवस्थापनाचा निर्णय घ्यावा. जैन कृषितंत्र आणि विकास केंद्रातर्फे या संदर्भातही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते.