एक छोटीशी सुरुवात मोठ्या परिवर्तनाचे निमित्त ठरते, याचा आदर्श दुर्गम भंडारा जिल्हयातील चौरास शेतकरी उत्पादक कंपनीने घालून दिला आहे. शेतकरी गट आणि त्यांनतर कृषी प्रक्रिया उद्योगाचा विस्तार वाढविता यावा याकरिता शेतकरी उत्पादक कंपनीची (एफपीसी) स्थापना करण्यात आली. अवजारे बँक, बिजोत्पादन, बियाणे प्रक्रिया आणि ब्रॅण्डींग, साखरेचे प्रमाण कमी असलेल्या तांदूळाचे उत्पादन आणि विक्री, नाफेडची हमीभावाने खरेदी अशा विविध क्षेत्रात काम करणार्या या कंपनीची आजची वार्षिक एफपीसीची उलाढाल तब्बल साडेपाच कोटी रुपयांवर पोचली आहे.
चौरास म्हणजे काय ?
पवनी, लाखांदूर, लाखनी तालुक्यात जमीन सपाट आणि समांतर असल्यामुळे त्यास चौरास असे समजले जाते. त्यावरुनच हा भाग चौरास म्हणून ओळखला जातो. हेच नाव अनिल नौकरकर व त्यांच्या सहकार्यांनी सुरुवातीला गटाला आणि नंतर कंपनीला दिले.
‘तण देई धन’ नेमकी संकल्पना काय ?
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/RFlShtyef_4
अशी झाली सुरुवात
चौरास शेतकरी समूहाची 2013 मध्ये स्थापना करण्यात आली होती. आत्मा अंतर्गंत नोंदणी असलेल्या या शेतकरी गटात 13 जणांचा समावेश होता. शासकीय योजनांचा लाभ मिळावा, असा उद्देश त्यामागे होता. 2015 मध्ये याच गटातील सदस्यांना घेऊन शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकरी गटाला आर्थिक मर्यादा होत्या. बँकांकडून मोठ्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी कर्जही उपलब्ध करुन देताना गटांसाठी हात आखडता घेतला जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे गटाचे रुपांतर त्यांनी कंपनीत केले. चौरास शेतकरी उत्पादक कंपनी असे याचे नामकरण करण्यात आले. यामध्ये कंपनी संचालक म्हणून किशोर काटेखाये, अमर भेंडारकर, मधुसूदन डोये, आशा कठाणे, अनिल नौकरकर यांचा समावेश आहे. कंपनीचे भागधारक पाच हजारापेक्षा अधिक असून 100 रुपयांचा शेअर आहे.
बीज प्रक्रिया केंद्राची उभारणी
2015-16 मध्ये व्यवसायाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने कंपनीने बीज प्रक्रिया केंद्राची स्थापना केली. त्याच्या उभारणीवर सुमारे 30 लाख रुपयांचा खर्च झाला. रोवणी यंत्र भाडेतत्वावर देण्याच्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न, कंपनीचे भांडवल; तसेच कृषी विभागाचे साडेबारा लाख रुपयांचे अनुदान, अशाप्रकारे या प्रकल्पाकरीता पैशाची जुळवाजुळव करण्यात आली. एका तासाला 2 टन बियाणे प्रक्रिया याप्रमाणे सयंत्राची क्षमता आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या धान उत्पादक जिल्हयांमध्ये तेलंगणा, आंध्रप्रदेश या भागातून बियाणे पुरवठा होतो. कंपन्याचे बियाणे 70 ते 80 रुपये किलो मिळते. शेतकरी कंपनीने मात्र 50 रुपये किलोचा दर ठेवला आहे. त्यामुळे शेतकर्यांची बियाणे खरेदीत आर्थिक बचत होते. चौरास ब्रॅण्डनेमखालीच हे बियाणे विकले जाते. या कंपनीचे पाच हजारावर शेतकरी सभासद आहेत. त्यांच्यासह संपर्कातील शेतकर्यांना या बियाण्यांची विक्री होते, असे अनिल नौकरकर यांनी सांगितले. 250 मेट्रीक टन बियाणे तयार करुन त्याची विक्री होते.
अकोला कृषी विद्यापीठाशी करार
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासोबकडून एचएमटी, पीकेव्ही तिलक या वाणाचे ब्रिडर सीड घेतले जाते. त्याकरीता कृषी विद्यापीठासोबत देखील सामंजस्य करार केला आहे. मध्यप्रदेशातील घाऊक विक्रेत्यांना देखील बियाण्यांचा पुरवठा करण्यावर कंपनीने भर दिला आहे. त्याकरीता त्या राज्याचा बियाणे परवाना देखील काढण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात 250 मेट्रीक टन धान बियाणे पुरवठ्याचा करार केला आहे. शेतकरी कंपनीच्या बियाणे क्षेत्रातील या कामाची दखल घेत कुलगूरू डॉ.विलास भाले यांनी कंपनी संचालकांचा विद्यापीठ मुख्यालयी विशेष प्रमाणपत्र देत गौरव केला.
यांत्रिकीकरणाला दिली चालना
धानपट्टयात यांत्रिकीकरणाला चालना मिळावी, या प्रयत्नाअंतर्गंत पहिल्यांदा अवजार बँक स्थापन करण्यात आली. तब्बल 30 लाख रुपयातून यंत्राची खरेदी करण्यात आली. त्यातील 10 लाख रुपये शासनाकडून अनुदान मिळाले. धान रोवणी यंत्राव्दारे करण्यासाठी यंत्राचा पुरवठा केला जात होता. त्यापोटी एकरी पाच हजार रुपये आकारले जात होते. यातून खर्च वजा जाता कंपनीला दोन हजार रुपये शिल्लक राहत होते. याला शेतकर्यांचा चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने एक सयंत्र कंपनीने आपल्यास्तरावर खरेदी केले. एका हंगामात 300 एकरपर्यंत रोवणीचे काम दोन सयंत्राच्या माध्यमातून होत होते.
साठवणुकीकरीता गोदामाची केली सोय
कंपनीचे प्रत्येकी 250 मेट्रीक टन क्षमतेचे दोन गोदाम आहेत. त्याचा वापर बियाणे साठवणुकीकरीता केला जातो. यातील एक गोदाम कंपनी व्यवस्थापनाकडून आधीच स्व-निधीतून उभारण्यात आले होते. दुसर्या गोदामाकरीता प्रकल्प किंमत 25 लाख रुपयांपैकी सुमारे साडेबारा लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. अन्नसुरक्षा अभियानातून या अनुदानाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
शुगर-फ्री राईसचे ब्रॅण्डींग
तेलंगणातील प्रो. राजेंद्रनगर कृषी विद्यापीठाने आरएनआर-15048 हे तांदळाचे वाण विकसीत केले आहे. या वाणाचे वैशिष्ट म्हणजे सुपर फाईन तांदूळात साखरेचे प्रमाण कमी आहे. ग्लायसेमीक इंडेक्स याचा गव्हापेक्षा कमी आहे. याची एकरी उत्पादकता 20 ते 25 क्विंटलपर्यंत मिळते. या तांदळाचे ब्रॅण्डींग कंपनीमार्फत व्हावे, याकरीता टाटा सीसेफ प्रकल्पातून सहकार्य करण्यात आले. त्याअंतर्गंत देशातील काही बाजारात हा तांदूळ पोचावा याकरीता पाठबळ देण्यात आले. बाजारातील मागणी लक्षात घेऊन या भागात लागवड करणार्या शेतकर्यांकडून धानाची खरेदी होते. हा धान वर्षभर गोदामात ठेवला जातो. त्यानंतर त्याचे मिलींग करुन पॅकींग होते, अशी सारी प्रक्रिया आहे.
बाजाराची मागणी लक्षात घेऊनच शेतकर्यांकडून धानाची किती खरेदी करायची याबाबतचा निर्णय होतो. महिन्याला पाच टन याप्रमाणे सरासरी मागणी राहते. एक किलोच्या पॅकींगमध्ये कंपनी तांदूळाचा पुरवठा करते. कंपनीकडून 70 रुपये किलो या घाऊक दराने विक्री होते. पुढे मॉलमध्ये 130 रुपये किलोचा टॅग लावून विक्री केली जाते. वर्षभरापूर्वी ऑफर म्हणून 99 रुपये किलोने मॉलमधून तांदळाची विक्री करण्यात आली होती.
ऑनलाईन प्लॅटफार्मचा पर्याय
मेझॉन व इतर ऑनलाईन विक्री प्लॅटफार्मवरुन देखील तांदळाची विक्री होते. त्याकरीता देखील टाटा सीसेफ प्रकल्पातून सहकार्य करण्यात आले. कंपनी आपल्या ब्रॅण्डनेच हा तांदूळ विकते.
नाफेडसाठी हमीभावाने हरभरा खरेदी
कंपनीकडून नाफेडसाठी हमीभावाने हरभरा खरेदी केली जाते. गेल्या तीन वर्षांपासून महाएफपीसीकरीता हे काम केले जाते. पहिल्यावर्षी 16 हजार, दुसर्यावर्षी 8 हजार क्विंटल खरेदी केली गेली. दुसर्यावर्षी बाजारात हमीभावापेक्षा अधिक दर असल्याने शेतकर्यांनी नाफेड खरेदीकडे पाठ फिरविली होती. त्यामुळे कंपनीच्या केंद्रावरील आवकही मंदावली. अशा विविध उत्पन्नाच्या पर्यायातून कंपनीची वार्षीक उलाढाल तब्बल साडेपाच कोटी रुपयांवर पोचली आहे.
– अनिल नौकरकर, मो. 9423370633
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
1. सातवी पास महिलेची 17 देशांत भरारी !
2. मत्स्यशेतीतून तीन लाखांचा निव्वळ नफा; बोरपाडाच्या शेतकरी गटाचा उपक्रम
Comments 2