पूर्वजा कुमावत
हळद साठवणूक प्रक्रिया : हळद काढल्यानंतर हळद शिजवणे, वाळवणे, पॉलिश करणे, आणि प्रतवारी करणे इत्यादी प्रक्रिया करावी लागते. हळद काढणीनंतर 4 ते 5 दिवसांमध्ये हळद शिजवण्याची प्रक्रिया करावी. हळद शिजवण्याअगोदर हळकुंडांची प्रतवारी करणे आवश्यक आहे. कारण सर्व हळकुंडांचा आकार एकसारखा नसून जाडी कमी अधिक असतो. जाड हळकुंडांना शिजवण्यास जास्त वेळ लागतो, तर लहान हळकुंडांना कमी वेळ लागतो. हळद शिजवल्याने बुरशी व इतर जीवजंतूंचा नाश होतो व हळकुंड रोगमुक्त राहतात.
हळद शिजवण्याची पद्धत
1) काहिलीत (कढईत) हळद शिजवणे : यामध्ये गुळ तयार करण्याच्या उथळ कढईचा वापर केला जातो. कढईत हळदीचे कंद भरल्यानंतर त्याला पाला, गोणपाट किंवा शेण-मातीचा थर लावून त्याचे तोंड बंद करावे. कढईच्या मध्यभागी हळदीच्या कंदांची उंच उभारणी करावी. व कढईच्या काठाखाली 4 ते 5 सेंमी पाणी भरावे. या शिजवण्याच्या प्रक्रियेला अडीच ते तीन तास लागतात.
2) वाफेच्या सयंत्राचा वापर करून शिजवणे : या पद्धतीत वाफेच्या साह्याने हळद शिजवली जाते व या यंत्राला ‘बॉयलर’ असे म्हणतात. या यंत्राला चार लोखंडी ड्रम असतात व त्यात साधारणपणे 250 किलो हळद सामावली जाते. या सयंत्राच्या मध्यभागी पाण्याच्या दोन टाक्या असतात व पाणी उकळण्यासाठी दीड तास लागते. पाणी उकळल्यानंतर तयार झालेली वाफ पाईपद्वारे लोखंडी ड्रममध्ये सोडली जाते. हळद योग्य पद्धतीने शिजल्यानंतर लोखंडी ड्रमच्या खालील बाजूने असलेल्या नळातून पाणी पडायला सुरुवात होते. हे पाणी येऊ लागल्यास हळद शिजली असे समजावे.
हळद वाळविणे
शिजवलेली हळद 13 ते 15 दिवस उन्हात वाळवावी. पहिले तीन दिवस 2 इंचापेक्षा जाड थर ठेवू नये. लोखंडी ड्रम मधून शिजवलेली हळद 20 ते 30 मिनिटांसाठी डिग करून ठेवावा व त्यानंतर ती हळद पसरवावी, त्यामुळे हळकुंडीची तूट होत नाही. हळद वाळू घालताना शेडनेट किंवा जुन्या साड्यांवर वाळवावी. हळद काळ्या मातीच्या जमिनीवर वाळवू नये. हळद वाळत घातल्यानंतर साधारण 1 किंवा 2 वेळा हळद उलट पालट करून घ्यावी. वेळोवेळी हळदी मधील बगल गड्डे, काडीकचरा, जेठेगड्डे बाहेर काढून टाकावे. पूर्णपणे वाळलेली किंवा अर्धवट वाळलेली हळद एकत्र करू नये. अधूनमधून उलट पलट करत असताना कमी शिजलेली किंवा जास्त फुगीर हळकुंडे त्वरित वेचून त्यांना बाजूला काढावेत.
हळद पॉलीश करणे
जातीनुसार हळदीची साल कमी जास्त जाडीचे असते व ही साल शिजल्यानंतर काळपट दिसते. अशा हळदीला पॉलीश केल्याशिवाय ती आकर्षित दिसत नाही व तिला बाचारात चांगला दर मिळत नाही. म्हणून पॉलीश करणे आवश्यक आहे. हळद पॉलिश करण्यासाठी लोखंडी ऑइलचा बॅरलचा वापर करावा. हळद भरण्यासाठी बॅरला 6 बाय 9 इंचाचे तोंड ठेवावे. या बॅरेलवर 10 ते 15 सेमी अंतरावर 3 ते 6 सेमी लांब व 1 ते 1.5 सेमी रुंद छिद्रे पाडावीत. छिद्र पाडल्यामुळे पिंपाच्या आतील भाग खरबडीत होतो. पिपांला लोखंडी दांडा बसवून दोन्ही बाजुला हॅन्डलसारखा आकार द्यावा. दोन व्यक्ती मिळून पिंपाला गोलाकार फिरवावा. पिंपळामध्ये पॉलीश करण्याची हळद आणि घर्षणासाठी 5 ते 7 अनुकुचित दगड टाकून पिंपळाला फिरवल्यास हळद लवकरात लवकर पॉलीश होते. या पद्धतीस एक तासात 25 ते 30 किलो हळद पॉलिश होते.
हळद कंद काढणीनंतर व्यवस्थापन
हळद काढताना साधारण आठ ते नऊ महिने पूर्ण झालेले कंद काढावेत. हळद काढणी झाल्यानंतर बियाण्यांसाठीचे कंद लगेच सावलीत ठेवावे. बेणे साठवण्यासाठी हळदीचा पाला, गव्हाचा काड, वाळलेले गवत याचा वापर करावा.
हे सर्व घटक क्विनॉलफॉस 2 मिलि आधिक कार्बेंडाझिम 1 ग्रॅम प्रतिलिटर पाणी हे द्रावणाने फवारून निर्जंतुक करून घ्यावे. निर्जंतुकीकरणानंतर हे घटक उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यावेत.
हळद साठवणूक कशी करावी
हळद अधिक काळ टिकवण्यासाठी पिकाचे योग्यवेळी काढणी करावी. हळदीचे योग्य पद्धतीने साठवणूक करणे देखील महत्त्वाचे आहे, अन्यथा कंदांना कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो व ते लवकर खराब होतात.
1. जमिनीवर बियाणे साठवणे
बियाण्याची सुप्त अवस्था साठवण्यासाठी 2.5 महिने बेणे साठवावे लागतात. निर्जंतुक केलेल्या पाल्याची 7 ते 8 इंच जाडीची गादी तयार करावी. त्या पाल्यावर सावली ठेवलेले बेणे टाकावे. एक फूट उंचीचा थर झाला की त्यावर कार्बन्डाझिम पावडर 1 किलो या प्रमाणात टाकावे. अशाच प्रकारे तीन फूट उंचीचा ढीग करावा. वरतून 6 ते 8 इंचाचा पाल्याचा थर टाकावा. त्यानंतर दोन दिवसांनी गोणपाट ओले करून टाकावे. गोणपाट टाकताना ढिगांमध्ये थंडावा राहिला पाहिजे अशा पद्धतीने तो टाकावा.
2. जमिनीत खड्डा (पेव) करून बियाणे साठवणे
बियाणे साठवण्यासाठी 3 ते 3.5 फूट खोलीचा लांब रुंदीचा खड्डा खोदावा. खड्ड्याच्या तळाला उतारा द्यावा व खड्ड्याच्या तळाशी 3 ते 4 इंच जाडीचा विटांच्या तुकड्याचा थर टाकावा. त्यावर कार्बेन्डाझिम पावडर 1 किलो टाकावी. यानंतर त्याच्यावर निर्जंतुक पाल्याचा अर्धा फूट जाडीचा थर टाकावा व खड्ड्याच्या आजूबाजूलाही पाल्याचा थर टाकावा. खड्डा 3 फूट इतका उंचीचा भरून घ्यावा व त्यानंतर त्याच्यावर निर्जंतुक केलेला पाला अंतरावा. तसेच खड्ड्यामध्ये एक मीटर अंतरावर छिद्र पाडून पोकळ बांबू किंवा 2.5 ते 3 इंच व्यासाचे छिद्रे पाडून त्यात पी.व्ही.सी पाईप टाकावे. त्यानंतर लाकडी फळीने किंवा गोणपाटाने खड्डा झाकून घ्यावा. पाऊस आल्यास तेवढ्यापुरती तो खड्डा प्लास्टिक कागदाने झाकून घ्यावा.