बारागाव नांदूर (ता.राहुरी जि.अ.नगर) पंधरा तरुण आर्थिक गटाच्या माध्यमातून एकत्र आले. नियमित पैशांची बचत झाल्याने गाठीशी बर्यापैकी पैसा जमा झाला. यातून काहीतरी उद्योग उभारण्याचा विचार सुरू झाला. यातूनच शेळीपालन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेळीपालन करताना कुर्बानी आणि बेणूचा बोकड विक्रीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. आज त्यांचा हा व्यवसाय यशस्वी झाला आहे.
राहुरी तालुक्यातील वेगवेगळ्या गावच्या व विभिन्न आर्थिक परिस्थितीतील कुटुंबामध्ये राहणार्या तरुणांनी 2009 मध्ये एक आर्थिक गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात कार्यरत असलेल्या अफसर सय्यद यांच्यासह एकुण 15 तरुण या गटाचे सभासद झाले. सगळेच एकजीवाचे असल्याने आतापर्यंत हा गट टिकून आहे. शेतकरी बचत गटाच्या धर्तीवरच हा गट निर्माण झाला. गटाचे बँकेत खाते उघडून आठवड्याला 50 रुपयाप्रमाणे सभासद फी गोळा करण्यास सुरवात केली. सर्वांनीच यासाठी नियमितपणे पैसे देऊन सहकार्य केले. परिणामी आता या गटाकडे लाखो रुपयांची बचत झाली. सुरवातीची पाच वर्षे गटातील सभासदांनाच कौटुंबिक किंवा आरोग्याची निकड भागविण्यासाठी आर्थिक सहकार्य केले जात होते. मात्र, 2016 मध्ये बचतीच्या पैशातून काहीतरी कृषी उद्योग सुरू करण्याचे गटाच्या बैठकीत ठरले. सर्वांनीच हा निर्णय मनावर घेऊन आपल्यासाठी कोणता उद्योग चांगला ठरेल यावर विचार सुरू केला. अखेर विचारांंती बंदिस्त शेळीपालन हा पूरक व्यवसाय सुरू करण्याचे ठरले.
शेळीपालनाचा अभ्यास
शेळीपालन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापिठातील शेळीपालन संशोधन केंद्रासह राज्यभरातील नामांकित गोठ्यांवर जावून या गटाने माहिती घेतली. या गोठ्यातील माहिती घेत असताना यासाठीच्या रितसर प्रशिक्षणाची गरज जाणवली. त्यानंतर पाच-सहा ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग त्यांनी घेतला. अखेर बंदिस्त शेळरीपालन गोठा उभारण्याचा निर्णय नाव्हेंबर 2016 मध्ये घेतला. यानंतर बँकेतील गटाचे खाते बंद करून 15 जणांच्या भागीदारी तत्वावरील ममता उद्योग समुहाची मुहुर्तमेढ रोवली. बारागाव नांदूर येथील एकाजणाच्या शेतावर बंदिस्त शेळीपालन व्यवसायाची पायाभरणी करून शेळीपालन उद्योग सुरू केला. आधुनिक पद्धतीच्या गोठ्यासह काटेकोर नियोजन करण्यासाठी गटातील दोघांची नियुक्ती करण्यात आली. आळीपाळीने यासाठी काम करण्याचेही नियोजन केले.
गोठ्याची उभारणी
शेळीपालनासाठी दोन पद्धतीचे गोठे बांधण्यात आलेले आहेत. एक गोठा पूर्णपणे आधुनिक असून लाकडी रॅम्पचा आहे. 40 बाय 28 फुटांच्या या गोठ्याच्या एकुण बांधकामासाठी सुमारे 9 लाख रुपये खर्च केलेला आहे. या गोठ्यातील लाकडी रॅम्पची उंची चार फूट ठेवलेली आहे. रॅम्पवरील लेंडी व शेळ्यांचे मलमूत्र खाली जाते. चार फुट उंचीच्या या मोकळ्या जागेत कडकनाथ या कोंबडीचे संगोपन केले जाते. अशा पद्धतीने या गोठ्याची खालची जागाही वापरात आणली आहे. करडे व गाभण शेळ्यांना रॅम्पवर चढण्यासाठी होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र 30 बाय 20 फुटांचे शेड येथे उभारलेले आहे.
गोठ्यातील चारा व्यवस्थापन
या गोठ्यात सध्या सुमारे शंभर बोकड आहेत. तसेच संगमनेरी व उस्मानाबादी जातीच्या 30 शेळ्याही आहेत. एकुण बोकडांपैकी सोजत जातीचे 70, सिरोही जातीचे 10 व 20 बोकड संगमनेरी आणि उस्मानाबादीचे आहेत. अशा पद्धतीने सध्या या पूर्ण बंदिस्त शेळीपालनाचे नियोजन हा गट करीत आहे. खाद्यामध्ये कुट्टी केलेला कडबा, हरभरा किंवा तुरीचा भुसा, मका व गव्हाचा एकत्रित भरडा आणि लसूण घास किंवा मका हा ओला चारा या शेळ्यांना दिला जातो. रात्रीच्यावेळी शेळ्यांना टॉनिकसह गोळी पेंड दिली जाते. नवीन पद्धतीची माहिती संकलित करून गोठ्यासाठी त्याचा उपयोग करण्यासाठीही हे तरुण तत्पर असतात. खाद्यमध्ये मिनरल मिक्सचरचाही वापर केला जातो. शेळ्यांना होणारे आजार व रोग नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमितपणे लसीकरण केले जाते.
बेणूचा बोकड विक्री
अफसर सय्यद सांगतात की, सध्या शेळीपालनातून कुर्बानी बोकडासह बेणूचा बोकड तयार करून विकण्याकडेच आम्ही लक्ष देत आहोत. शेळी विण्यासह गाभण काळात तिच्यावर लक्ष ठेवण्याच्या डोकेदुखीपेक्षा बोकड वाढविण्याचे आम्हाला कमी जोखमीचे वाटते. बेणूचा बोकड तयार करण्यासाठरीही मोठी काळजी घ्यावी लागते. मात्र, यातून तुलनेने नफाही जादा मिळतो. बोकडाची वंशावळ ठेवण्यासह त्याला चांगला खुराक देण्याचीही गरजेची असते. आम्ही याकडे कटाक्षाने लक्ष देतो. परिणामी आमच्या शेडवर येऊनच बोकड खरेदी करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शेळीपालक ईद हा सण हा एक महत्वाचा सण मानतात. कारण या सणात बोकड़ाची कुर्बानी दिली जाते. त्यामुळे या सणात बोकडाला भरपूर मागणी असते.
ईदसाठी बोकडांना मागणी
ईदच्या कुर्बानीसाठी बोकडाची निवड करताना बोकड हा एक वर्षापेक्षा जास्त वयाचा असावा. बोकडाचे दोन्ही डोळे हे व्यवस्थित असावे. शेपटी पूर्ण असावी, ती कापलेली नसावी. बोकडाचे कान देखील कापलेले नसावेत. बोकडच्या शरीरावर गाठ किवा हाड हे तुटलेले नसावे. बोकडाचे शिंग हे तुटलेले नसावे, जर बोकडाला जन्मतः शिंग नसतील तर ते ईदसाठी चालते. खच्ची केलेले बोकड़ हे कुर्बानीसाठी चालते. बिना दाताचा बोकड़ हा ईदला चालत नाही. जर बोकडाचे काही दात तुटलेले असतील तर तो ईद साठी चालतो. जन्मतः जर कान नसतील तर तो बोकड़ ईदसाठी चालतो आणि जर बोकडाला कान हे लहान असतील, तर तोही बोकड चालतो. अशा पद्धतीने संगोपन केलेल्या सोजत बोकडांना सध्या प्रतिकिलो 450 रुपये, तर सिरोही बोकडांना 400 रुपये किलोचा भाव मिळत आहे.
गटातील सदस्यांची नावे
चाँदभाई देशमुख, लियाकत सय्यद, आरशू पिरजादे, शौकत इनामदार, अफसर सय्यद, राजू सय्यद, असलम पिरजादे, अफजल शेख, अकबर देशमुख, इनासयत पिरजादे, अलताफ देशमुख, अमजत इनामदार, फिरोज पठाण, शकुर देशमुख, इन्नुस सय्यद आदी.
संपर्क
अफसर सय्यद, संचालक,
ममता गोटफार्म, बारागाव नांदूर, ता. राहुरी, जि. अ.नगर
मो. 7588024509