“कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होताच चौपटीने घ्यावे, मग कैसे सुखी व्हावे ग्रामजन, पिकवोनीही ते उपाशी !” राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून शेतमाल प्रक्रियेविषयी फार पूर्वीच सांगून ठेवले आहे. याच विचारांचा वारसा जपत कोठा वेणी (ता. कळंब, यवतमाळ) येथील केशव निमकर यांनी कापसाच्या मूल्यवर्धनावर भर दिला आहे. प्रायोगिक तत्वावर त्यांनी कापसापासून कापड तयार करुन घेतले. मूल्यवर्धनाच्या माध्यमातून क्विंटलला 28 हजार रुपये दर तर 10 मीटर कापडाच्या विक्रीतून तीन हजार रुपयाचे उत्पन्न त्यांना झाले आहे.
कापसाचा शोध लावणाऱ्या गृत्समद ऋषींची पवित्र भूमी
यवतमाळपासून तीस किलोमीटरवर असलेल्या वेणी गावची लोकसंख्या सात हजारावर असून स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. कळंब येथील प्रसिध्द चिंतामणी मंदिर येथून आठ किलोमीटर अंतरावर आहे. या भागाचे दुसरे वैशिष्ट म्हणजे जगात कापसाचा शोध कळंब येथील गृत्समद ऋषर्षीनी लावला असे सांगितले जाते. त्यांनी वर्धा नदीच्या काठावर कापूस लागवडीचा प्रयोग केला म्हणून त्या गावाला कापशी (जि. वर्धा) असे नाव पडले. मात्र, महाराजांचा आश्रम कळंब भागात होता. त्यावरुनच हा भाग कापसासाठी पोषक असल्याचे स्पष्ट होते, असा दावा केशव निमकर यांनी केला. निमकर हे सेंद्रिय शेती करतात त्यामुळेच त्यांनी देशी कपाशीच्या वाणावर भर देण्याचा निर्णय घेतला.
कृषी पर्यटनापासून झाली प्रयोगशीलतेची सुरुवात
केशव निमकर यांची जमीनधारणा कमी आहे. परिणामी अतिरिक्त उत्पन्नाचे स्त्रोत असावे, याकरीता त्यांनी पर्याय शोधण्याचा प्रयत्न सुरुवातीपासूनच चालविला होता. त्याकरीता त्यांनी कृषी पर्यटनावर भर दिला. 2015 साली याची सुरुवात करण्यात आली. रोज 30 ते 40 पर्यटक त्याला भेट देत होते. मटक्यातील चुलीवरचे जेवण, विटी-दांडू, सायकल, झुले अशाप्रकारचे खेळण्याचे साहित्य या ठिकाणी होते. जिल्हयाचे ठिकाण असलेल्या यवतमाळपासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर वेणी हे गाव असल्याने पर्यटकांचा प्रतिसाद मिळायचा. प्रती पर्यटक 150 रुपये असे शुल्क आकारले जात होते. पर्यटकांच्या निवाऱ्यासाठी तुराट्यांपासून झोपडी तयार करण्यात आली होती. अशाप्रकारे महिन्याला 25 ते 30 हजार रुपयांचे उत्पन्न होत होते. हा व्यवसाय चांगला सुरु असताना कोरोनाच्या साथीत ही उलाढाल थांबली. त्यानंतर ती आजवर ठप्पच आहे. येत्या काळात पुन्हा कृषी पर्यटन नव्या जोमाने सुरु करणार असल्याचे निमकर यांनी सांगितले. तशी तयारी देखील त्यांनी चालविली आहे.
शेतकरी उत्पादक कंपनीची केली स्थापना
कार्यकुशल शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना तीन वर्षांपूर्वी करण्यात आली. साडेतीनशे भागधारक असून प्रती शेअर 100 रुपयांचा आहे. प्रक्रियेच्या माध्यमातून शेतमालाला चांगला दर मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यवतमाळमध्ये जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने शेतकऱ्यांचा शेतमाल विक्री व्हावा याकरीता काही गाळे मुख्य रस्त्यावर बांधले आहेत. लॉटरी सिस्टीमने त्याचे वितरण करण्यात आले. त्यातील एक गाळा निमकर यांच्या कंपनीला मिळाला आहे. याच ठिकाणावरुन ते खपली, बंसी गव्हाची सोजी, ज्वारीची सोजी तयार करुन त्याची विक्री करतात. गहू सोजी 110 रुपये किलो, ज्वारी 75 रुपये, पाच डाळींचा भरड 180 रुपये किलोप्रमाणे विकला जातो. दररोज सरासरी 2,500 रुपयांची विक्री या ठिकाणावरुन होते.
सोजीकरीता अशी केली जाते खास प्रक्रिया
सोजी तयार करण्याकामी शेतकरी कंपनीच्या सभासदांकडूनच गहू, ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. 20 किलो बियाणे दिल्यानंतर शेतकऱ्याने 40 किलो गहू परत करावा, असा निकष आहे. उर्वरित गहू शेतकऱ्याने स्वतः ठेवावा, असे यात अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखील हा सौदा फायद्याचा ठरतो. 29 वर्षासाठी दहा गुंठे शेत निमकर यांनी कंपनीच्या नावे भाडेतत्वावर दिले आहे. उत्पादीत गहू, ज्वारीवर या ठिकाणी प्रक्रिया व पॅकींग होते. एक किलो गव्हापासून 700 ग्रॅम सोजी व 300 ग्रॅम पीठ निघते. त्याचा वापर घरी करता येतो किंवा मिश्र पीठ म्हणूनही त्याची विक्री होते.
देशी गाईंचे संवर्धन
निमकर यांच्याकडे पाच मोठ्या, सहा लहान गाई आहेत. पाच वासरे आहेत. गावरान गाईवर क्रॉस करुन 75 टक्के गवळाऊ विकसित करण्यात आली आहे. एका गाईपासून दोन्ही वेळचे मिळून तीन ते चार लिटर दूध मिळते. दुधाची विक्री करण्याऐवजी तूप करण्यात त्यांनी सातत्य राखले आहे. सहा महिन्याच्या कालावधीत अडीच ते तीन किलो तूप मिळते. एक किलो तुपासाठी तीस लिटर दूधाची गजर भासते. अडीच हजार रुपये किलो दराने तूप विक्रीवर भर देण्यात आला आहे.
कंपोस्ट तयार करण्यावर भर
आत्मा अंतर्गत जैविक शेती मिशनच्या माध्यमातून निमकर यांना दोन कंपोस्ट खड्डे तयार करुन देण्यात आले आहेत. सात बाय दोन फूट आणि तीन फूट उंच असा याचा आकार आहे. या खड्डयात शेतात निघालेले तणकट व इतर काडीचकरा टाकला जातो. त्यानंतर गाईपासून मिळणारे शेण, गोमूत्र, चुलीतील राखड याचा वापर होतो. या माध्यमातून तणकट कुजविले जाते. नंतर याचा वापर शेतीमध्ये होतो. परिणामी जमीनीची सुपीकता वाढते.
पॉलीहाऊस, भाजीपाला पीक लागवड
केशव यांची अडीच एकर शेती असून दहा गुंठे पॉलीहाऊस आहे. त्यासोबतच राहते घरही दहा गुंठे क्षेत्रात आहे. पपई लागवडीचा प्रयोग त्यांनी केला आहे. पालक, मेथी, लसून, कांदा असे भाजीपाल्याचेही पीक ते लावतात.
अशी आहे प्रक्रिया व त्यापासून मिळणारे दर
– तीन किलो कापसापासून एक किलो रुई मिळते. – एक किलो रुईपासून 8 मीटर कापड मिळते. – धाग्याच्या जाडीनुसार कापड मिळण्याचा दर ठरतो.
– 1 किलो पेळू बनविण्याचा खर्चः 126 ₹
– 1 किलो (35 काऊंट धागा) कताई मजुरी खर्च 300 ₹
– 1 किलो पासून 8 मीटर कापड बनतेः 800 ₹
– 35 काऊंटचा एक मीटर कापड बनविण्याचा खर्च
100 ₹
– 300 रुपये मीटरने कापड विकले गेल्यास 2400 रुपये होतात.
– 8 मीटर कापड तयार करण्यास 1200 रुपये खर्च
वजा जाता 1200 रुपये निव्वळ नफा उरतो.
– 8 मीटर कापडाच्या विक्रीसाठी 30 टक्के कमिशन अपेक्षित धरता 360 रुपये होतात.
1200 मधून 360 वजा जाता 840 रुपये प्रती किलो उरतात.
सरकीपासून मिळते अतिरिक्त उत्पन्न
तीन किलो कापसापासून 2 किलो सरकी मिळते. सरकीचा दर 40 रुपयांचा राहतो. सरकी अद्यापही विकायची आहे. त्यासोबतच यंदा पहिल्यांदाच कापसाचे मूल्यवर्धन केल्याचे केशव निमकर सांगतात. यापुढील काळात समूहस्तरावर हा प्रयोग करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संपर्क :
केशव निमकर,
मोबाईल नं. 9168320569