एक एकरच्या सेंद्रिय शेतीतून वर्षाला मिळवले 65 हजारांचे उत्पन्न
भारतीय महिला कृतीशील झाल्या तर आपल्या कार्याचा त्या आगळावेगळा ठसू उमटवू शकतात, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. मराठवाड्यातील अशीच एक महिला जी एक एकराच्या सेंद्रिय शेतीतून वर्षाला 65 हजारांचे निव्वळ उत्पन्न मिळवू शकते आणि हे आपले मॉडेल घेऊन देशातील पाच राज्यांसह तब्बल सतरा देशांत जाऊन सहावी साडीच्या पेहरावात आपल्या मराठी भाषेत ते सहजपणे मांडू शकते, यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. मात्र, हे सिद्ध करुन दाखवले आहे, उस्मानाबाद जिल्ह्यातील गोदावरी डांगे या 44 वर्षीय महिलेने.
दिवंगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गोदावरी यांना संयुक्त राष्ट्र परिषदेत बोलताना पाहिले, ऐकले आणि कौतुकही केले. तेव्हा मात्र, गोदावरी डांगे यांना आपल्या कामाचे सार्थक झाले असे वाटून त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले. मात्र, हे काम भारतीय महिलाच करु शकते या निर्णयावर त्या आजही ठाम आहेत. आपल्या नावाप्रमाणेच त्या निर्मळ व स्वच्छ आहेत. त्यांनी स्वकर्तृत्वातून शेतीत मिळवलेले यश केवळ महिलांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे.
‘तण देई धन’ नेमकी संकल्पना काय ?
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/RFlShtyef_4
गोदावरी डांगे या मूळच्या नंदगाव (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथील रहिवाशी. एकत्र कुटुंबात 4 मुली व एक मुलगा आणि आई- वडील असे त्यांचे कुटुंब. वडील एका तांड्यावर प्राथमिक शिक्षक होते. एकंदर घरची परिस्थिती बेताचीच होती. गोदावरी यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले. मोठ्या बहिणीचे लग्न होऊन एक वर्ष होऊन गेले होते. गुरव समाजात मुलींनी फार शिकू नये व त्यांचे लवकर लग्न करावे, अशी पूर्वापार चालत आलेली प्रथा. त्यामुळे अंजनसोंडा या भूम तालुक्यातील गावातील श्रीधर क्षीरसागर यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले. श्री. क्षीरसागर यांच्याकडे घरचेच टेम्पो वाहन असल्याने ते वाहनचालक म्हणून कार्यरत होते. पाच वर्षांत त्यांच्या संसारवेलीवर दोन मुले झाली.
ऑफर : स्मार्ट टीव्ही अगदी स्वस्तात
या दरम्यान, सौ. गोदावरी यांच्या जीवनात त्या वयाच्या अवघ्या 20- 21 व्या वर्षांच्या असतानाच काळाने घाला घातला. एका अपघातात त्यांचे पती श्रीधर यांचा मृत्यू झाला. त्यामुळे गोदावरी दोन वर्षे मानसिकदृष्ट्या खूपच खचल्या. इतक्या की त्या घराबाहेर सुद्धा पडल्या नाहीत. या काळात गंधोरा (ता. तुळजापूर) येथे शिक्षक असलेल्या त्यांच्या वडिलांनी त्यांना मानसिक बळ देऊन त्या स्थितीतून बाहेर काढले. घरून दहावीपर्यंतचे शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. 2004 मध्ये त्या दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी स्वयम शिक्षण प्रयोग शिक्षण संस्थेत स्वयंसेविका म्हणून कामाला सुरुवात केली. तसे स्वयंसेविकेचे त्यांचे काम आधीपासूनच सुरु होते. कारण हा वारसा त्यांना वडिलांकडूनच मिळाला होता.
वडिलांनी गंधोरा या तांड्यावर दारूबंदीसाठी सतत काम करून तेथील समाजाला प्रवाहात आणून त्यांच्या मुलामुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी स्वतःला वाहून घेतले होते. या अनुभवावरच गोदावरी उभ्या राहिल्या. या कार्यात त्यांना कमल मुसळे यांनी मोलाचे सहकार्य केले. संस्थेच्या अध्यक्षा अनिता कुलकर्णी यांनी मानसिक आधाराबरोबर जबाबदारीची शिकवण दिली. त्यामुळेच सन 2000 मध्ये तब्बल दहा गावांमध्ये त्यांचे काम सुरु झाले.
सलगरा क्लस्टरमध्ये बचत गटाच्या सचिव म्हणून काम करताना गोदावरी यांना अनिता कुलकर्णी, कमल मुसळे यांच्यासोबत अनेकांच्या घरी, शेतांवर भेटी देता आल्या. त्यातून त्यांचे मन आणखीनच खंबीर बनले. महिलांच्या प्रश्नांची जाणीव होत गेली. 2006 मध्ये फेडरेशनच्या सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. यातून महिलांबरोबर काम करताना शेतकर्यांच्या समस्या माहिती होत गेल्या.
बहुतांश शेतकर्यांकडे शेतीची सर्व कामे घरातील महिलाच करते. मात्र, पिकांच्या उत्पादनातून आलेला पैसा पुरुषच घेतात. शिवाय शेतात काय पेरायचे याचा निर्णयही पुरुषच घेतात. यातून त्यांना उमेद या संस्थेची कल्पना सूचली व त्यातून भविष्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु झाली. संस्थेच्या मुख्य संचालिका प्रेमा गोपालन या 1993 मधील भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या किल्लारी भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या होत्या. जेणेकरुन तेथील रहिवाशांसाठी काय करता येऊ शकते का, या दृष्टीने त्यांचा पाहणी दौरा होता.
त्या धारावी (मुंबई) येथे उमेद नावाने समाजसेवी संस्था चालवत होत्या. त्यांना भूकंपाने झालेल्या हानीची व एकूणच भीषण परिस्थितीची जाणीव झाली. त्यांनी 1993-94 मध्ये तुळजापूर मध्ये स्वयम शिक्षण प्रयोग या संस्थेची सर्वसमावेशक संस्था म्हणून स्थापना केली. त्या संस्थेच्या गोदावरी या घटक बनल्या आहेत. संस्थेच्या बचत गटाचे काम करताना, महिलांचे आरोग्य, सक्षमीकरण, आत्मनिर्भर महिला, त्यांचे शिक्षण, महिलांवरील आरोप व अत्याचार यासारख्या विषयांवर त्यांचे काम सुरु होते. बचत गटाच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनत गेल्या. गोदावरी यांचे हे कार्य पाहून त्यांना पहिला पुरस्कार उत्कृष्ठ कार्यकर्तीचा मिळाला.
पुढे 2005 पासून एड्स विषयावर जनजागरण कार्य करताना 2007 मध्ये एका मिटिंगसाठी केनिया देशात जाण्याची संधी मिळाली. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेला पासपोर्ट त्यांच्याकडे नव्हता. अनेकांच्या सहकार्यातून दहा दिवसांत त्यांना पासपोर्ट व व्हिसा मिळाला. केनियामधील अत्यंत गरिबी पाहून तेथी दारिद्—य पाहून त्यांचे मन विषिण्ण झाले. तेथील बैठकीत त्यांनी आपली मातृभाषा मराठीतून विचार मांडले. दोन दिवसांनी मायदेशी परतल्या.
या दौर्यातून त्यांना अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. पुढे 2008 मध्ये पीआरएच्या मिटिंगसाठी फिलिपाइन्स तर 2009 मध्ये अन्न सुरक्षेच्या बैठकीसाठी इटलीला, 2010 मध्ये नेपाळला आणि 2011 मध्ये अमेरिकेत गेल्या. अमेरिकेतील संयुक्त राष्ट्र संघाच्या (युनो) कार्यालयात त्यांना मराठीतूनच महिला सबलीकरण व सक्षमीकरण यावर बोलण्याची संधी मिळाली. हा त्यांच्या आयुष्यातील सुवर्ण क्षण होता. त्यावेळी भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज तेथे उपस्थित होत्या. गोदावरी यांना त्यांनी त्यांच्या जवळ बोलावून कौतुक केले. त्यावेळी गोदावरी या सहावारी साडीत असल्याने त्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
असे देशविदेश फिरताना त्यांच्या मनात भारतीय महिलांसाठी काय करता येईल याचे गणित जुळवणे सुरु असायचे. 2012 ते 14 या काळात मराठवाड्यात दुष्काळ पडला. त्यातून कमी खर्चातील शाश्वत शेती ही संकल्पना पुढे आली. त्यासंबंधी संस्थेच्या बैठकीत विषय मांडला असता त्यावर काम करण्यास प्रोत्साहन दिले. 2006-07 पासून महिला शेतकरी व्हाव्यात यासाठी सुरु असलेल्या संकल्पनेला मूर्त रूप मिळाले. मानवी जीवनात कोणत्याही शेतकरी कुटुंबात दरमहा होणारा मुख्य खर्च हा शेती व कुटुंबाचे आरोग्य यावरच जास्तीत जास्त खर्च होतो.
यासोबतच पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा आपल्या समाजात असल्याने विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील बहुतांश निर्णय पुरुषच घेतात. निर्णय प्रक्रियेत महिलांचे मत विचारात घेतले जात नाही. एकत्र कुटुंबात शेती मोठी असली तरी महिलांचा सहभाग फक्त कष्टाच्या कामांपुरताच किंवा देखरेखीपुरताच असतो. आर्थिक व्यवहार केवळ पुरुषच सांभाळत असतात. हा अनेक काळापासून अलिखीत पायंडाच जणू पडला आहे. यातूनच गोदावरी यांचे स्वयंपूर्ण शेतीचे प्रयोग सुरु झाले. त्यातून त्यांनी एक एकर सेंद्रिय शेतीचे मॉडेल इतर अनेक महिलांच्या शेती प्रयोगातून यशस्वी करून दाखवले.
सातवी पास महिलेची 17 देशांत भरारी व विदेशातील भेटीचा फायदा
अमेरिकेतून आल्यानंतर 2012 साली त्या तुर्कस्थानला महिला अधिकार प्रयोगशाळेसाठी गेल्या. 2013 मध्ये जिनिव्हा येथे ग्लोबल मिटिंगसाठी त्या जाऊन आल्या. तर त्याच वर्षी ब्राझील मधील ग्लोबल नेटवर्क बैठकीत त्यांनी आपले विचार मांडले. एशिया मिनिस्टर मिटिंगसाठी त्या 2014 मध्ये बँकॉकला जाऊन आल्या. उमेद संस्थेमार्फत 193 देशात नेटवर्क उभे करून स्वयंशिक्षण अंतर्गत केलेल्या कामाची सविस्तर माहिती देण्यासाठी व यानिमित्ताने आयोजित चर्चासत्रांमध्ये सहभागी होताना 2015 मध्ये त्यांनी चार राज्यांचे प्रतिनिधित्व केले. 2016 मध्ये जर्मनीत प्रशिक्षण घेतले.
स्वयम शिक्षण संस्थेला त्यांनी केलेल्या कामाचे आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळाले, ते घेण्यासाठी गोदावरी यांची संस्थेने 2017 मध्ये निवड केली आणि त्यासाठी त्यांना अमेरिकेत पाठवले. या पुरस्कारासाठी जगातील 120 देशातील 850 संस्थांचे अर्ज आलेले होते. त्यापैकी फक्त 12 संस्थांची निवड झाली त्यात उमेद संस्था एक होती. याच वर्षी इंडोनेशिया, 2018 मध्ये मलेशिया आणि जून 2019 मध्ये एका कार्यशाळेसाठी बँकॉकला त्या गेल्या.
जुलैत क्लायमेट विक मीटसाठी अमेरिका तर सप्टेंबरमध्ये रिजनल मिटिंगसाठी पुन्हा मलेशिया आणि डिसेंबरमध्ये संस्था फंडिंग व्यवस्थापन मिटिंगसाठी त्यांचे आफ्रिका देशात जाणे झाले. या दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यांचा परदेश प्रवास तात्पुरता थांबला आहे. कोरोना काळात बचत गटांच्या माध्यमातून वाटप झालेला एक कोटी रुपयांचा निधी केवळ शेती व मानवी आरोग्य यासाठीच वापरला गेला. हे सर्व स्वयम शिक्षण प्रयोग संस्थेचे यश व जनतेच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे गोदावरी अभिमानाने सांगतात.
ग्रामीण भागातील महिलांचे प्रबोधन
गोदावरी डांगे- क्षीरसागर यांनी स्वयम शिक्षण प्रयोग अंतर्गत 2002 पासून महिलांचे बचत गट स्थापन करुन त्यांना आर्थिक स्वावलंबी बनवणे सुरु केले. आपले, आपल्या कुटुंबियांचे व जमिनीचे आरोग्य कसे जपता येईल, यासाठी त्यांनी काम सुरु केले आहे. ग्रामीण भागातून जागृती करताना महिलांसाठी आरोग्य शिबिरे त्यांनी घेतली.
महिलांमध्ये प्रामुख्याने न्युट्रीशियन्सची कमतरता असल्याने त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याचा खर्च वाढला असल्याचे संस्थेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विषमुक्त शेतीसंदर्भात व्यापक जनजागृती सुरु केली आहे. शेती करताना पुरुष नगदी पिकांचे उत्पादन जास्तीत जास्त घेण्यासाठी तत्पर असतो. त्यासाठी रासायनिक खतांचा अतिरेकी वापर करुन आपल्या शेताच्या आरोग्याबरोबर कुटुंबियांचे आरोग्यही धोक्यात घालतो. त्यामुळे एस.एस.पी. संस्थेने महिलांच्या नावे भलेही जमीन करू नका, पण एक एकर किंवा एक गुंठा जमीन त्यांना प्रयोग करण्यासाठी द्या, अशी मागणी गावोगावी केली.
काही अपवाद वगळता, अनेक शेतकर्यांनी अडथळेच आणले. गोदावरी यांच्या मैत्रिण अर्चना भोसले यांनी मात्र सर्वांचा विरोध पत्करून त्यांना साथ दिली. 2007-08 च्या दुष्काळी परिस्थितीत फक्त शेतात पाणी असणारे शेतकरी तरले. 2012-13 च्या दुष्काळात मराठवाड्यात अनेक शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. यावेळी अर्चना यांच्या केवळ एक गुंठा जमिनीवर केलेला प्रयोग यशस्वी ठरुन इतरांसाठीही प्रेरणादायी ठरला.
काय आहे हे तंत्रज्ञान ?
यासाठी आपल्या जमिनीची आपल्याला संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजे जमिनीचा प्रकार, कोणते कर्ब किती आहे? म्हणजे नत्र, स्फुरद, पलाश किती आहे, हे जाणून घेण्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सुक्ष्म व अतिसुक्ष्म अन्नद्रव्ये कोणती व किती प्रमाणात आहेत. पाणी असेल तर पाण्यातील घटक कोणते व त्यांचे प्रमाण काय व किती आहे? याचे ज्ञान शेतकर्यांजवळ असले पाहिजे. नंतर जमिनीचा उतार कसा आहे. साधारणपणे पाऊस किती पडतो याची माहिती असली तर फायदेशीर ठरते.
एक एकर जमिनीची बैलांच्या सहाय्याने नांगरणी करा. उन्हात नांगरलेली जमीन चांगली भाजून निघू द्या. त्यामुळे विषारी जिवाणू व किडी नष्ट होतात.जूनमधील पहिला पाऊस पडला, की पाळी घाला. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर पुन्हा पाळी घालून बियाणे पेरणी करा. पेरणीपूर्वी बियाण्यास बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्या त्या ठिकाणच्या हवामानानुसार पीक पॅटर्नचा अवलंब केला पाहिजे. हा एक एकर पॅटर्न राबविणार्या महिलांनी सलग आठ ते दहा वर्षे अर्धा एकर ते एक एकरवर हा प्रयोग केला.
2012-13 च्या दुष्काळी परिस्थितीत या महिलांना सहा जणांच्या कुटुंबाला पुरेल एवढे खरिपात उत्पादन घेता आले. या काळात सोयाबीन, ऊस, कापूस यासारखी नगदीची पिके गेली होती. तेथे या महिलांनी केलेल्या संमिश्र शेतीतून चांगले उत्पादन घेतल्याचे दिसून आले. या काळात के.व्ही.के. तुळजापूरमधील संशोधक, कृषी विभागाचे तज्ज्ञ व अधिकारी, उस्मानाबाद, सोलापूर येथील कृषी शास्त्रज्ञ यांनी साथ तर दिलीच. सोबतच विविध प्रकारे मदतही केली. त्यामुळे या एक एकर शेती करणार्यांना ठिबक संच, तुषार संच, शेततळे आदी कृषी योजनांचा लाभ मिळाला.
ऑफर : स्मार्ट टीव्ही अगदी स्वस्तात
ही शेती करताना खरिपातील कोणती पिके एकमेकांना पूरक आहेत, याची माहिती असणे गरजेचे आहे. एक एकर क्षेत्रात किमान चार ते सहा पिके घेता येतात. तूर, मुग, चवळी, मका, बाजरी त्याचबरोबर विविध भाजीपाला जसा की कारली, काकडी, दोडका अशी लागवड केली जाते. अगदी भुईमुंगाच्या शेंगा सुद्धा घेता येतात. पेरणीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करणे गरजेचे आहे.
उशिरा येणारी पिके एका बाजूला किंवा मध्यभागी एक ते दोन महिन्यात येणारी पिके आणि बाहेरून भाजीपाला किंवा कोथिंबीरसारखी महिन्यात येणारे पीक अशी अशी रचना असावी. अशा मिश्र पीक पद्धतीत कीड रोग नियंत्रणासाठी स्वतः तयार केलेले बीजामृत, जीवामृत, दशपर्णी अर्क वापरले जाते. खत म्हणून गांडूळखत, शेणखत, पालापाचोळ्यापासून तयार केलले कम्पोस्ट खत वापरले जाते. पेरणीनंतर एक महिन्यापासून विविध उत्पादन सुरु होते. हे घरी खाता येते व विक्रीही करता येते.
अशाप्रकारे विषमुक्त अन्न खाल्ल्यामुळे आरोग्यावर होणारा अतिरिक्त खर्च टाळता येतो. शिवाय महिन्यापासूनच महिलांच्या हाती पैसाही येऊ लागतो. ज्यामुळे कुटुंबाची आर्थिक प्रगती होण्यासाठी मदत होते. अशा सर्व पिकांमधून चांगले आलेले पीक बाजूला काढून त्याचे बियाणे पुढील वर्षासाठी वापरले जाते. त्यामुळे बियाणे, खते, रासायनिक औषधे यावर होणारा खर्च वाचतो.
रब्बीमध्ये ज्वारी, करडई, हरभरा, राजमा, मोहरी, जवस, कारळे व भाजीपाला घेतला जातो. पिकांवर रोग निर्मुलनासाठी पुन्हा बीजामृत व निमअर्कचा वापर केला जातो. या माध्यमातून एका वर्षात किमान 60 ते 65 हजारांचे उत्पन्न मिळते. 2007 मध्ये केवळ सात ते आठ महिला शेतकर्यांनी सुरु केलेले हे मॉडेल 2021 पर्यंत 60 हजार महिला शेतकर्यांनी स्वतः आत्मसात करुन त्याचा वापर सुरु केला आहे.
याचे सर्व श्रेय गोदावरी डांगे- क्षीसागर यांनाच जाते. मात्र, त्या स्वतः याचे श्रेय त्यांना वयाच्या दहाव्या वर्षापासून शेती शिकवणार्या अनिता कुलकर्णी यांना देतात. त्यांना त्या शेती क्षेत्रातील गुरुच मानतात. शेती कार्यातील या योगदानासाठी त्यांना म्हैसूर येथील गोपीनाथ सिन्हा ट्रस्ट व रमाबाई चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दिला जाणारा रमागोविंद पुरस्कार 2018 मध्ये म्हैसूर येथे सुप्रसिद्ध नाटककार श्री. चंद्रो यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. असा पुरस्कार प्राप्त करणार्या त्या महाराष्ट्रातील एकमेव महिला ठरल्या आहेत.
स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेची भरारी
स्वयं शिक्षण प्रयोग ही स्वयंसेवी संस्था 1993 पासून महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, बिहार, आसामसह इतर आणखीन दोन अशा सात राज्यात तसेच महाराष्ट्रातील जवळपास 25 जिल्ह्यांत कार्यरत आहे. ही संस्था महिला सक्षमीकरण, पाणी व्यवस्थापन, आरोग्य शिक्षण अशा विषयांवर महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजक करण्याचा यशस्वी प्रयत्न करीत आहे. या कार्यासोबतच बचत गटांच्या माध्यमातून पतपुरवठा करणे, सेंद्रिय शेती करणे, विविध आपत्ती निवारणाच्या कार्यात सहभागी होणे विविध विषयांवर काम करीत आहे.
पाच राज्यात आठ हजार बचत गटाच्या 92 हजार महिला यात कार्यरत आहेत. संस्थेच्या प्रमुख प्रेम गोपालन यांचे वय आज 80 च्या जवळपास आहे. व्हिलचेअरवर बसून अजूनही त्या कार्यरत आहेत. त्यांना मदत करणार्या दहा जणींचे कार्यकारी मंडळ असून गोदावरी त्यातील एक आहेत. तर काो-ओर्डीनेटर म्हणून नसीम बानू बाबा शेख या काम पाहतात. गोदावरी यांच्याकडे सध्या उस्मानाबाद, सोलापूर व आसाममधील काही गटांचा अध्यक्ष म्हणून कार्यभार आहे.बिहारमधील सीडमदर म्हणून ओळखल्या जाणार्या सीता मॉ यांच्यासमवेत गोदावरी यांनी एक आठवडा काम केले.
ऑफर : स्मार्ट टीव्ही अगदी स्वस्तात
त्यांच्याकडे 256 प्रकारचे बीज संग्रही असून त्या आदिवासी असून दरवर्षी त्या बियाणांचे प्रदर्शन भरवतात. स्वयं शिक्षण प्रयोग या संस्थेची मूळ संकल्पनाच मुळी महिला शेतकर्यांच्या सहभागातून सेंद्रिय शेतीद्वारे पर्यावरण संतुलन आणि जैव विविधता राखून अन्न सुरक्षित करून शेती फायदेशीर करणे ही आहे. उद्देश अनेक असून शेतीला प्राधान्य देऊन महिलांचे सक्षमीकरण करुन त्यांना शेतीमध्ये आत्मनिर्भर करण्याचे महत्वाचे काम ही संस्था करते. त्यासाठी कार्यशाळा, प्रदर्शनांना भेटी देऊन स्वतः नवनवीन प्रयोग करण्याची कामे गोदावरी या महिलांकडून करून घेतात. त्यांना नसीम शेख, श्री. चंद्रन यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, शास्त्रज्ञ तसेच त्यांच्या सहकार्यांची मदत होते.
साधी राहणी उच्च विचारसणी
गोदावरी या तब्बल 17 देश फिरुन आल्या असल्या तरी त्यांचे पाय मात्र अजूनही जमिनीवरच आहेत. प्रत्येक देशात त्यांनी आपला साडीतलाच पेहराव ठेवत संस्कृतीचे जणू जतन केल्याचे दिसते. सात्विक आहार व शुद्ध विचारांच्या गोदावरी यांनी आपल्या कृतीयुक्त कामातूनच महिलाच नव्हे संपूर्ण समाजमोर आदर्श निर्माण केला आहे. महिलांनी सदैव कृतीशील राहावे म्हणजे यश हमखास प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही, असा संदेश त्या महिलांना देतात.
संपर्क ः गोदावरी डांगे- क्षीरसागर 9423380697
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
मत्स्यशेतीतून तीन लाखांचा निव्वळ नफा; बोरपाडाच्या शेतकरी गटाचा उपक्रम
चौगावच्या तरुण शेतकर्याने फळबागेतून साधली आर्थिक समृध्दी!
Comments 2