मुंबई : भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) रिटर्न मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार, 25 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानमधून रिटर्न मान्सूनची सुरुवात होणार असल्याचे ‘आयएमडी’ने म्हटले आहे. तर, मान्सून 26 सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता ‘स्कायवॉच’ ने वर्तविली आहे. 25 दिवसात म्हणजे 20 ऑक्टोंबरपर्यंत मान्सूनची संपूर्ण देशातून माघार होऊ शकते, असे ‘स्कायवॉच’ ने म्हटले आहे.
सामान्यतः, नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो आणि 8 जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो. 17 सप्टेंबरच्या सुमारास वायव्य भारतातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो आणि 15 ऑक्टोबरपर्यंत तो संपूर्ण देशातून पूर्णपणे माघार घेतो. महाराष्ट्रातून साधारणतः 5 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत मान्सून माघारी फिरतो. बदललेल्या वातावरणामुळे यंदा सलग 13व्या वर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास लांबला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून दरवर्षी साधारणतः 5 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत माघारी जाणारा मान्सून यंदाही आठवडाभर उशिराने म्हणजे 13 ते 18 ऑक्टोबरदरम्यान माघारी जाऊ शकेल.
देशभरात या हंगामात सरासरीइतका पाऊस
देशात साधारणपणे, जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी हंगामात सरासरी 870 मिमी पाऊस पडतो. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत देशात सरासरी 832.4 मिमी पाऊस पडला आहे. दीर्घ-काळाच्या सरासरीच्या (LPA) 94 आणि 106 टक्के दरम्यान पाऊस सामान्य मानला जातो. अर्थात, यंदा कागदोपत्री पावसाची सरासरी गाठली गेल्याचे दिसत असले तरी असमान वितरणामुळे अनेक ठिकाणी अजूनही दुष्काळी स्थिती आहे.
पुढील काही दिवस कमी-अधिक पावसाची अपेक्षा
आता 25 सप्टेंबरच्या आसपास पश्चिम राजस्थानच्या काही भागांतून मान्सून माघार घेण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. त्यामुळे उत्तर-पश्चिम आणि लगतच्या पश्चिम-मध्य भारतात पुढील पाच दिवस कमी-अधिक पावसाची अपेक्षा आहे, असे आयएमडीने म्हटले आहे. स्कायवॉच वेदर इंडियाने मात्र येत्या 48 तासांत प्रतिचक्रीवादळाचा विकास होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे पाण्याचे बाष्प आणि आर्द्रता कमी होऊन पावसात घट होऊ शकते. नैऋत्य मान्सूनची 26 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानमधून माघार सुरू होण्याची शक्यता आहे. संपूर्ण देशातून माघार घेण्यासाठी जवळपास 25 दिवस लागतील, असे स्कायवॉचने म्हटले आहे.
महाराष्ट्रात येते 3-4 दिवस पावसाचे
झारखंडनजीक तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. सध्या ते चक्रीय स्थितीमध्ये आहे. दुसरीकडे, सिक्कीम ते दक्षिण महाराष्ट्र म्हणजेच विदर्भ-मराठवाड्यापर्यंत कमी दाबाची रेषा सक्रीय झाली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात विदर्भात नागपूर, गोंदिया आणि भंडारा तसेच कोकणात रायगडमध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केली आहे. याभागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट तसेच मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. उत्तर व मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उर्वरित कोकणात 24 ते 26 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 25 आणि 26 सप्टेंबर या दोन दिवसात मात्र खान्देश, उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचे डॉ. कश्यपी यांनी “ॲग्रोवर्ल्ड”ला सांगितले.
कोअर मान्सून झोनमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
सध्या परतीच्या मान्सूनला अनुकूल प्रतिचक्रीवादळ विकसित होण्याची चिन्हे दिसत आहे. त्यामुळे येत्या 3-4 दिवसात कोकण, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. सध्या पश्र्चिम भारतात एक कमी दाबाचे क्षेत्र अस्तित्वात आहे, तर पूर्वेकडे ओडिशानजीक आता दुसरे कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत आहे. चक्रीवादळ आणि प्रतीचक्रीवादळ यामुळे मध्य भारतासह कोअर मान्सून झोनसाठी पुढील 2 ते 3 आठवडे जबरदस्त पावसाचे राहू शकतील. काही ठिकाणी अतिवृष्टी व महापुराचीही शक्यता राहील, असे स्कायवॉचचे भाकीत आहे. तेलंगणाच्या विविध भागांमध्ये 2 ऑक्टोबरपर्यंत गडगडाटासह पाऊस होऊ शकेल, नंतर चक्रीवादळ येऊ शकते, असाही अंदाज आहे.
प्रतीचक्रीवादळाचा दावा आयएमडी महासंचालकांनी फेटाळला
आयएमडी महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी मात्र अद्याप प्रतीचक्रीवादळाचा कोणताही अंदाज आलेला नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “आतापर्यंत, आम्हाला कोणत्याही चक्रीवादळाचा अंदाज आलेला नाही. जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये आणि आयएमडीद्वारे शेअर होणारी अधिकृत माहिती पाहावी. सध्या प्रतीचक्रीवादळाची शक्यता कमी आहे. सप्टेंबरच्या अखेरीस पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होऊ शकते आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही प्रणाली कमी दाबाच्या क्षेत्रात परिवर्तित होऊ शकते.”
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- सीएमव्हीमुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार मदत
- AIF Scheme : या योजनेत शेतकर्यांना मिळतेय 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर पत हमी