सिंधिया राजघराण्यातील राजकुमार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया हेही आता शेती-उद्योगात उतरले आहेत. त्यांनी शेतीशी संबंधित विशेषत: प्रत्येक घराशी संबंधित असे ॲग्रीबिझनेस स्टार्ट-अप सुरू केले आहे. तूर्तास ग्वाल्हेर आणि लगतच्या काही छोट्या-मोठ्या शहरात प्रायोगिक तत्त्वावर कंपनीचा कारभार सुरू आहे.
महाआर्यमन सिंधिया यांनी गेल्या वर्षी माय-मंडी हे B2B आणि B2C ॲग्री स्टार्ट-अप सुरू केले आहे. छोट्या मोठ्या शेतकरी तसेच व्यापारी-पुरवठादार यांना आपापसात जोडण्याबरोबरच “माय-मंडी”च्या माध्यमातून थेट ग्राहकांशीही जोडले आहे. माय-मंडी म्हणजे माझा बाजार. प्रत्येक घराचा बाजार करणे या कंपनीने सोपे केले आहे.
ग्वाल्हेरच्या सिंधिया राजघराण्याचे वारस असलेले महाआर्यमन सिंधिया यांनी आपल्या वारशाच्या पलीकडे जाऊन उद्योजकतेच्या क्षेत्रात पाऊल ठेवून सर्वाँना चकित केले आहे. त्यांनी येत्या दोन वर्षात माय-मंडी स्टार्ट-अपला फायदेशीर उपक्रमात रूपांतरित करण्याची मोहीम सुरू केली आहे. सिंधिया राजघराण्याला सामाजिक सेवा आणि राजकारणाचा मोठा वारसा, इतिहास आहे. 50 पिढ्या आरामात बसून खातील, असे वैभव आहे. मात्र, महाआर्यमन यांनी वेगळी वाट धरली आहे.
शेतकरी ते ग्राहक साखळी बळकट करण्याचे लक्ष्य
महाआर्यमन सिंधिया फक्त 27 वर्षांचे आहेत. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप आणि सॉफ्टबँक सारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. 25 वर्षीय सूर्यांश राणासोबत महाआर्यमन यांनी याच वर्षी कृषी स्टार्ट-अप माय-मंडीची पायाभरणी केली. याद्वारे, कृषी उत्पादनांच्या खरेदी-विक्रीतील अडथळे, दलाल कमी करणे आणि लॉजिस्टिक्स सोल्यूशन पुरवून शेतकरी ते ग्राहक साखळी बळकट करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.
व्यवसाय कल्पना दैनंदिन जीवनाशी, जेवणाशी निगडित
“माय-मंडी”ची कल्पना अतिशय अभिनव तरीही सर्वांच्याच दैनंदिन जीवनाशी आणि जेवणाशी निगडित आहे. अनेक ग्राहक स्वतः भल्या पहाटे उठून बाजार समितीत जातात. होलसेल दरात, चांगल्या दर्जाचा माल मिळावा, अशी त्यांची धडपड असते. याशिवाय, अनेक किरकोळ विक्रेते म्हणजे गल्लीबोळात फिरणारे हातगाडीवाले, शहराच्या विशिष्ट भागात फळे-भाजीपाला स्टॉल लावणारे किरकोळ विक्रेते हेही सर्व पहाटे उठून बाजार समितीत खरेदीला जातात. तरीही तिथे शेतकरी ते ग्राहक किंवा किरकोळ विक्रेते अशी थेट खरेदी होतच नाही. मध्ये असतात दलाल, मध्यस्थ आणि बडे व्यापारी. याशिवाय, बाजार समितीचे वेगवेगळे चार्जेस, कर, कमिशन, कटौती द्यावी लागते ती वेगळीच. खरे पाहता पहाटे उठून, धडपड करूनही ना ग्राहक, किरकोळ विक्रेते यांना चांगला भाव मिळतो, ना शेतकऱ्याच्या पदरी चांगला दाम पडतो.
पिकांची गुणवत्ता व अधिक उत्पादनासाठी कृषिसम्राटचे रिवार्ड | Reword |
येल विद्यापीठातून एमबीए केल्याचा होतोय फायदा
नेमकी हीच पोकळी हेरून “माय-मंडी”ने सर्वांचाच फायदा होईल, असा प्लॅटफॉर्म निर्माण केला. स्वतः महाआर्यमन सिंधिया आणि पार्टनर सूर्यांश राणा कित्येक दिवस बाजार समितीतील या परिस्थितीचा अभ्यास केला. भारतात कितीही कुणी काहीही दावे केले तरी शेतकऱ्यांना मंडीत म्हणजे बाजार समितीत येऊनच माल विकावा लागतो, हेही कळून चुकले. एकूण कृषीमालाच्या 80%हून अधिक मालाची खरेदी-विक्री मंडीमार्फत होते, हे लक्षात आल्यावर जगातील एक नंबर असलेल्या येल विद्यापीठातून एमबीए केलेल्या महाआर्यमन-सूर्यांश यांनी डिजिटल मंडी म्हणजेच ई-बाजार समितीची कल्पना फायनल केली.
शेतकरी ते ग्राहक यांना जोडणाऱ्या अनेक साखळ्या कोविड साथीच्या काळात सुरू झाल्या. त्यामुळे ते सूत्र ठेवून “माय-मंडी”ने एक पाऊल पुढे टाकले. अनेक ग्राहक आपपाल्या गल्लीतील भाजी विक्रेते, शहरातील स्टॉल्स, फेरीवाले यांच्याकडून दैनंदिन फळे-भाजीपाला खरेदी करतात, हे ध्यानात ठेवून “माय-मंडी”ने शहरातील किरकोळ विक्रेते, स्टॉल्सधारक यांच्यासाठीही होलसेल भावातील खरेदी सुरू करून ती त्यांना थेट घरपोहोच पुरविण्यास सुरुवात केली.
किरकोळ विक्रेत्यांना वाहन खरेदीत मदत
या स्टार्टअपने ग्वाल्हेरपासून कामाला सुरुवात केली. येथे सिंधिया स्वत: चेहरा झाकून स्थानिक बाजार समिती, मंडईत जाऊन ताजी फळे-भाजीपाला खरेदी करतात. त्यानंतर हा कृषी माल रस्त्यावरील विक्रेते, स्टॉल्सधारक आणि फेरीवाले यांना वितरित केला जातो. या मंडळींना बाजार समितीत मिळणाऱ्या होलसेल दरातच, कोणतेही अतिरिक्त कमिशन न घेता, व्यवस्थित पॅक करून सकाळीच माल दिला जातो. प्रत्येकाचे अकाऊंट असून दुसऱ्या दिवशी किंवा साप्ताहिक आधारावर बिल वसुली केली जाते. कंपनीकडून किरकोळ विक्रेत्यांना वाहन खरेदीत मदत केली जाते. ठेला (हातगाडी) घेण्याबरोबरच आता तीन चाकी ई-वाहन घेण्यासाठी सर्व सहकार्य केले जाते. व्यवसाय उभा करण्यास सर्व प्रकारचे सहाय्य केले जाते. परदेशातील वॉलमार्ट मॉडेल आणि नाशिकमधील सह्याद्री फार्मच्या मॉडेलच्या धर्तीवर ही संकल्पना आहे. फक्त कंपनी स्वतः कोणतेही उत्पादन घेत नाही किंवा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना कंपनी स्थापून प्रोत्साहित करत नाही. शेतकऱ्यांना माल विक्रीत “माय-मंडी” मदत करते. पुढल्या काळात शेतकऱ्यांशी करार करून थेट बांधावरून खरेदीची कंपनीची योजना आहे. ग्राहकांना थेट माल न विकता सध्या त्यांच्या भागातील फेरीवाले, किरकोळ विक्रेते यांच्यामार्फत पुरवठा केला जातो. कुणाच्याही पोटावर पाय न देता ही व्यवस्था आणि पारंपरिक पुरवठा मॉडेल कायम ठेवून कंपनी वाटचाल करणार आहे.
“माय-मंडी”चे व्हॅल्यूएशन 150 कोटी ₹
“माय-मंडी”चा व्यवसाय सुरू झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत चार पटीने वाढला आहे. जुलै 2022 मध्ये त्याची कमाई 11 लाख रुपये होती, ती जानेवारी 2023 मध्ये सुमारे 60 लाख रुपये झाली. आता स्टार्ट-अप कंपनीचे उद्योजकता मूल्य (व्हॅल्यूएशन) अंदाजे 150 कोटी रुपये आहे. यंदा मार्च अखेरीस कंपनीचा व्यवसाय दोन कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात 5 कोटी रुपयांच्या उलाढालीचा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षात डिसेंबरपर्यंत मासिक 5 कोटी रुपयांचा व्यवसाय करण्याची कंपनीची योजना आहे. डिसेंबरपर्यंत कंपनी नफ्यात आणण्याचीही धडपड असल्याचे महाआर्यमन सिंधिया यांनी सांगितले. या वर्षी गुंतवणूकदारांकडून 8 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे.
तंत्रज्ञानाचा वापर, डेटा संकलनावर भर
गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या भांडवलाचा वापर तंत्रज्ञानामध्ये, उत्तम व खात्रीशीर डेटा संकलन आणि व्यवसाय करणाऱ्या शहरांची समज निर्माण करण्यासाठी केला जाईल. तंत्रज्ञानाच्या वापराने आमचे मार्जिन 15 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आम्हाला डिसेंबरपर्यंत फायदेशीर होण्यास मदत होईल, असा विश्वास सिंधिया-राणा यांनी व्यक्त केला. कंपनी सध्या ग्वाल्हेरसह जयपूर, आग्रा आणि महाराष्ट्रात नागपूरमध्ये कारभार करत आहे. कंपनीकडे एकट्या ग्वाल्हेर शहरात 100 हून अधिक व्हेंडर्स आहेत.
5 कोटीच्या भांडवलातून 5 शहरात विस्तार
माय-मंडीचे सह-संस्थापक 25 वर्षीय राणा म्हणाले की, फर्मचा रोख प्रवाह चांगला आहे आणि कंपनीला नवीन शहरांमध्ये आपला व्यवसाय विस्तारण्यासाठी नवीन भांडवलाची गरज आहे. कंपनीने आतापर्यंत गुंतवणूकदारांकडून 5 कोटी रुपये उभे केले आहेत. गुंतवणूकदारांना हे जाणून आश्चर्य वाटले, की आम्ही फक्त 5 कोटी रुपयांच्या भांडवलासह आणखी पाच शहरांमध्ये विस्तार करणार आहोत. आता आम्ही पाच शहरांमध्ये पोहोचलो आहोत आणि जमा झालेल्या रकमेपैकी निम्मी रक्कम अजूनही कंपनीच्या खात्यात आहे. स्टार्ट-अपचा सर्वात मोठा धोका म्हणजे वायफळ, फालतू आणि अनुत्पादक खर्च. आम्ही ऑपरेशनल कॉस्ट सुरुवातीपासून कमी ठेवून मॉडेल उत्पादक, नफ्यात येण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यामुळे जोखीम कमीत-कमी आहे.