साताऱ्यातील दादा माने यांनी जिरेनियम या सुगंधी तेलासाठीच्या परदेशी पिकाची यशस्वी शेती करून दाखविली आहे. हे तेल परफ्युम इंडस्ट्रीमध्ये वापरले जाते. सुरुवातीला गावातल्या लोकांनी आणि इतर शेतकऱ्यांनी त्यांच्या या वेगळ्या प्रयोगाबाबत शंका घेतली होती, पण दादा माने यांनी जिद्दीने जिरेनियम लागवड केली. त्यातून ते आज लाखोंचा नफा कमावत आहेत. आज अनेक शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे पीक घेऊ लागले आहेत.
शाळेत गुरुजींचा धाक असायचा त्यामुळे दादा माने यांचे शिक्षण नववीपर्यंत झाले. दादा माने यांचे वडील मुंबईतील कापड बाजारात कामगार म्हणून होते. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून त्यांनाही तिथेच नोकरी होती. नववीचे शिक्षण घेतल्यानंतर दादा माने मुंबईत 1991 ते 2000 पर्यंत राहिले. या ठिकाणी त्यांनी काम केले ते कापड बाजारात कामगार म्हणून कार्यरत होते. दादा माने यांना नाटकाचे फार वेड होते. ते गणपती, देवींचे विविध कार्यक्रम असतील अशा ठिकाणी हौशी लोकांना घेऊन एक चांगली कलाकृती सादर करायचे.
दादा माने यांनी मुंबईमधील गडद शहरी जीवन सोडून गावाकडे परत येण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांना शेतीत काहीतरी वेगळे करण्याची उत्सुकता होती. त्यांनी गावाकडे परत येऊन ब्रोकलीसह काही विदेशी भाज्यांची लागवड सुरू केली. प्रारंभी एक-दोन प्रकारांची लागवड केली आणि त्यातून चांगले परिणाम दिसू लागले. नंतर हळूहळू त्यांनी तेरापर्यंत वेगवेगळ्या व्हरायटीज एकाच जमिनीत यशस्वीरित्या पिकवायला सुरुवात केली.
जिरेनियम पिकाची सुरुवात
2001 पासून आजपर्यंत, सलगपणे त्यांनी विविध विदेशी भाजीपाला पिकांची लागवड करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. जिरेनियम या सुगंधित वनस्पतीबद्दलची माहिती दादा माने यांना लखनौच्या एका विशेष दौऱ्यामध्ये मिळाली. लखनौमध्ये सुगंधित वनस्पती आणि औषधी द्रव्यांच्या विविध व्हरायटीजबाबत सखोल माहिती दिली जाते. तेथील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या शेतीमध्ये यशस्वी प्रयोग सुरु केला.
दादा माने यांनी आपल्या सातारा जिल्ह्यातील शेतात तब्बल ६ एकरमध्ये जिरेनियमची लागवड केली आहे. एवढंच नव्हे तर, त्यांनी याचे स्वतः प्रोसेसिंग युनिट उभारून त्यातून तेल निर्मितीकरून ते विक्री केले जात आहे. आज या उपक्रमातून केवळ माने कुटुंबच नव्हे तर, साताऱ्यातील इतर अनेक शेतकरीही जिरेनियम शेतीकडे वळले आहेत.
पहिल्याच वर्षी लाखोंचा नफा
जिरेनियमचे कृषी उत्पादन म्हणजे मुख्यत्वे त्याच्या पानांपासून काढलेले तेल (GERANIUM OIL) – हे तेल परफ्युम, कॉस्मेटिक्स, औषधी, आणि अरोमाथेरपीमध्ये वापरले जाते. जिरेनियमपासून मिळणारे तेल परफ्युम, कॉस्मेटिक्स आणि औषध कंपन्यांना मोठ्या दराने विकले जाते. नेहमीच्या पारंपरिक पिकांना फाटा देत माने यांनी धाडसाने 2- 3 एकरमध्ये जिरेनियमची लागवड केली. त्यातून त्यांना पहिल्याच वर्षी लाखोंचा नफा मिळाला.
आज सातारा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पिके सोडून जिरेनियम या सुगंधी तेलासाठीच्या परदेशी पिकाची लागवड सुरू केली आहे. मानेच्या यशामुळे साताऱ्यात आणि महाराष्ट्रात जिरेनियम लागवडीला चांगली मागणी आली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना नव्या पिकांची भीती न बाळगता, मार्केट रिसर्च करून, आधुनिक शेतीत उतरावे, असा सल्ला दिला आहे. जिरेनियम पिकावर किडी-रोग कमी येतात, खर्चही कमी आणि नफा पारंपारिक पिकांपेक्षा दुप्पट मिळतो.
साधारण जिरेनियम शेती केल्यास…
खर्च: 80,000 – 1,00,000 रुपये
उत्पादन: 10-12 टन हिरवळीपासून 20-24 किलो तेल
उत्पन्नः 1,00,000 – 1,50,000 रुपये
निव्वळ नफा: 50,000 – 70,000 रुपये एकरी
संपर्क –
श्री. दादा माने
7020542150


















