प्रा. विक्रम पाटील
पिंपळगाव हरेश्र्वर.
पन्नास वर्षांपूर्वी शेती हा एक शाश्वत व्यवसाय होता. आज शेती हा शाश्वत व्यवसाय वाटत नाही. शेतीची उगवण क्षमता कमी झाली, माती निर्जीव होत चाललीय. शेतामध्ये बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशके अशी विविध प्रकारचे अनेक आदाने इतकी वाढली की शेती परवडत नाही. खते रासायनिक वापरतोय. कीड नियंत्रण, तण नियंत्रण रासायनिक पद्धतीने करतो आहोत. कुठे भूगर्भातील पाणीच आटले, तर कुठे धरणे आणि पाटपाणी यांच्या पाण्याच्या नियोजना अभावी प्रसंगी अती पाण्यामुळे जमिनी नापीक होत आहेत.
शेतातील तंत्रज्ञान भरपूर वाढलेले आहे आणि अजूनही शेतातील तंत्रज्ञान वाढीच्या शक्यता अमाप आहेत. तरीही शेतात मानवी श्रमाची गरज आहेच आणि ती निरंतर राहीलच. सततच्या नंन्नाच्या पाढ्याच्या परिणामी शेतीची सामाजिक प्रतिष्ठा आम्ही गमावून बसलेलो आहोत. त्यामुळे उच्चशिक्षित, शिक्षित, तरुण – तरुणी फारसे शेताकडे फिरकत नाहीत. शेतात काबाडकष्ट करणार्या शेतकरी गृहिणीला, शेतक-याला आपली मुलगी आणि सून शेतात राबत नसल्यास उत्तमच वाटते. शेतीसाठी मजूरही भेटत नाही. भेटला तर तो थांबत नाही. ही सारी नकारात्मकता कशी आली आणि ही नकारात्मकता कशी घालवावी हा मोठा प्रश्न आहे पण अजूनही बर्याच शक्यता आहेत ती वाट आपण या सदरात धुंडाळू.
पूर्वी शेतांना मोठमोठे आणि रुंद बांधारे होते. या बांधार्यांवर गवते, झुडपे, वेली, मोठे डेरेदार देशी वृक्ष होते. त्यांच्यात मोठीच जैवविविधता होती. या झाडांच्या आसर्याने विविध कीटक, उभयचर, कृमी, सरीसृप, सरडे, पाली, पक्षी, सस्तन प्राणी राहत असत. या सार्यांचा एकमेकांशी जैविक सहसंबंध होता. त्यांची अन्नसाखळी होती. त्यांचे एक मोठेच अन्न जाळे होते. बांधार्या शिवायचे आतले शेत ज्यात पीके उभी असतात त्यातून उत्पन्न अपेक्षित आहे.
त्याशेतातही एक पर्यावरणीय व्यवस्था नांदत होती. शेतातील तण काढून ते बांधावर टाकले जायचे. त्याचे खत व्हायचे. गुरांशिवाय शेत, शेतकरी आणि शेतमजूरही राहत नसत. प्रत्येक मोठ्या शेतकर्याकडे बैल जोड्या, गाई, वासरे, म्हशी, शेळ्या, घोडा, कुत्री, कोंबड्या असायच्या. मजुरांकडेही त्यांच्या आर्थिक वकूबानुसार दोन-चार शेळ्या, पाच-दहा कोंबड्या असायच्या. शेतात चारा वर्गीय पिके मुद्दाम होऊन पेरली जात असत. घरच्या अन्नासाठी भाज्या, पालेभाज्या, कडधान्ये, तृणधान्ये असायचे. शिवाय रोखीची पिके ही पेरल्या जात असत. त्यामुळे भारतभरातील शेती ही खरे तर बहुपीक शेती होती.
या बहुपीक बहुगुणी शेतीतून आम्ही एक पीक शेतीकडे आलो तसे, आम्ही हळूहळू एकात्मिक शेतीला मुकलो. आज एक पीक आणि तांत्रिक शेतीच्या मुळे जमिनी नापिकीकडे सरकत आहेत. शेतीचे वाळवंट होऊ घातले आहे. शेती स्वयंभू होती म्हणजे शेतात मातीतून पिकात येणारी संयुगे सूक्ष्मकण पुन्हा मातीत जात असत. गुरे चारा वैरण खात असत. गुरांच्या मलमूत्रातून मुबलक सेंद्रिय खत मिळायचे. त्या खतातून शेतात सारी संयुगे पुन्हा परतत असत. शेतातून वर्षभरात एकच पीक घेत होतो तेव्हा इतर गवते, धसकुटे, मुळे, पालापाचोळा, शेतातील मातीतच कुजत असे. वर्षभरात एकाच जमिनीत अनेक पिके घेताना हे सारे बंद झाले.
रासायनिक आदानांचा वापर बंद होता तोपर्यंत हे सारे सेंद्रिय निसर्गतः कंपोस्ट होऊन मातीत मिसळून जायचे. मातीतील सूक्ष्म जीवाणू, किटाणू, कीटक, गांडुळे, बुरशी, वाळवी ही सारीच मंडळी सैन्यासारखी कंपोस्टिंग करत असत. आता मात्र तीव्र विषारी रसायनांच्या मार्याने हे सारे सजीव मातीत शेतात नाहीत. पर्यायाने मातीचा जिवंतपणा गायब झाला. नैसर्गिक कंपोस्टिंग ची प्रक्रिया आम्हीच बंद केल्यासारखे आहे. ते आम्हास नव्याने सुरू करावे लागेल. आम्ही वापरत असलेले तंत्रज्ञान त्या दिशेने न्यावे लागेल तसे विशेष तंत्रज्ञान उपलब्ध आहे ते व्यवहारात बसवावे लागेल.
शेतातील मातीतच सूक्ष्म सजीव मुबलक होते. तेव्हा पावसाबरोबर सारे सजीव सक्रिय होऊन मृदगंध दरवळायचा. सॉईल एंजाइम्स् सक्रिय झाल्याचा तो सुगंध असायचा. त्याच्याने बियाणे उगवायला मदत होत असे. बियाणे घरचेच होते. मुबलक असायचे, थोडे जास्त वापरायचो. आता बियाणेच विकतचे घेतोय. तेथूनच शेतात पैसा पेरणे सुरू होते. मातीत सेंद्रिय कमी म्हणून जमीनीला कृत्रिम रसद पुरवावी लागते. खते विकतची आणून शेतात टाकायची तेव्हा पीक येते नाहीतर, पीक येणारच नाही अशी अवस्था आहे. कीड नियंत्रण करायचे तर तीच गत आहे. पूर्वीही कीटक उपद्रव होताच पिके हातची जायचे असा अनुभव आहे. परंतु त्याकाळी मित्र कीटकही मोठ्या प्रमाणावर होते.
परिणामी कीटक नियंत्रण घडत असे. ते जैविक नियंत्रण होते त्यामुळे निसर्ग देईल ते घ्यावे परंतु, मिळायचे ते प्रदूषित नव्हते. आता मिळते ते प्रदूषित आहे कारण कीटक नियंत्रण आता पूर्णतः रासायनिक नियंत्रण आहे. अन्यथा पीक हाती लागणारच नाही. रासायने वापरायचे नसल्यास मित्र कीटक कमी पडतो. जैव विविधता कमी पडते. शेतांना बांधारे नसल्यामुळे कीटकांच्या प्रसारास होणारा अडथळा आता नाही. त्यामुळे पिकावरील रोगप्रसाराचा वेग वाढतो. उपद्रवी कीटकास अनुकूल वातावरण असल्यास दोन-तीन दिवसात शिवारभर रोग प्रसार झालेला पाहायला मिळतो. त्यात शिवारभरात दोन-तीनच पिके प्रमुख असल्यास शत्रू कीटकास अधिकचा फायदा मिळतो. अशा परिस्थितीत शिवारभर आठवड्याच्या आत संबंधित कीटकाचे नियंत्रण करणे गरजेचे असते यात जो शेतकरी आपल्या शेतात कीड नियंत्रणात उशीर करेल त्याचे नुकसान जास्त होते. हे सारे वेळेत आणि अर्थकारणात बसवताना आर्थिक धोका वाढतो. खर्च वाढतो.
मका, ज्वारी, बाजरी अशी पिके घेतली की त्यांचा कडबा हे उपदान असते. भुईमुगाचा पाला तुरीचा पाला हे उपदान असते. मूग, उडीद सोयाबीन यांचे अवशेष लवकर कुजतात सडतात. मात्र इतर पिकांचे उपदान हे गुरांना चारा म्हणून उपयोगाचे ठरतात. पूर्वी शेती कामात बैल वापरत असत. त्यांना हा चारा उपयोगी ठरत असे. गाई म्हशी पाळत असत. त्यातून दूध दुभते होत असे. दोन पैसेही मिळत. अधिकची गुरे विकून चार पैसे गाठीशी असत. शेणखत मिळत असे. हे सारे उपदानाचे उत्पन्न आता बंद झाले आहे. शेती कामासाठी आता स्वयंचलित यंत्रे आली. या यंत्रांच्या किमती भरमसाठ आहेत. त्यांची पुनर्विक्री किंमत मात्र खूप कमी असते. या यंत्रांचा देखभाल खर्च वाढलेला आहे. ही यंत्रे वापरायची तर वीज, डिझेल, पेट्रोल रोखीने खरेदी करावे लागते. खर्च वाढतो पण पर्याय काहीच नाही. शेतातील उपदानाचा पैसा आता कमी होतो. तो अधिक कसा होईल ते पाहावे लागेल. आधुनिक अवजारे कमी खर्चात अधिक काम कसे करतील तेही पाहावे लागेल.
पूर्वी शेतकर्याची चूल सरपण वापरून पेटत असे. सरपण शेताच्या बांधावर मुबलक होते. कापसाच्या पराठ्या, तुरीच्या तुराट्या, निंबू, मोसंबीच्या बागातील जुन्या झाडांचे सरपन याचे ढीग मोठे असतात. आताही असतात मात्र आता चूल बंद झाली. गॅसचा वापर वाढला. ते चांगलेच झाले. धूर बंद झाला. कुटुंबाचे आरोग्य सुधारले. स्वच्छता वाढली पण खर्चही वाढला. हा खर्च कमी करता येईल. त्यासाठी थोडी तसदी घ्यावी लागेल. बदल स्वीकारावा लागेल. हे बदल एकात्मिक शेतीसाठी महत्त्वाचे आहेत उपयोगाचे आहेत. आधुनिकतेची कास धरत असताना आपल्या पारंपारिक शेतीतील एकात्मिक शेतीतील अनेक विविध उपदानांचा कौशल्याने वापर केल्यास उत्पादन वाढ, उत्पन्न वाढ नक्की होईल. जमिनीची सुपीकता ही वाढेल. गरज आहे ती निरीक्षण, अभ्यास, चिंतन, कृतीची आणि एकोप्याची. या वाटा पुढील काही लेखातून प्रशस्त करू.
(क्रमश:)