तुर पिक फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असताना पिकावर पिसारी पतंग व तुरीवरील शेंगा पोखणारी अळीचे पतंग मोठया प्रमाणात आढळून येतात. ही स्थिती तुर शेंगा पोखणारी अळीच्या वाढीस पोषक असल्यामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या किडींचा प्रादुर्भाव कळ्या, फुले लागल्यापासून शेंगापर्यंत आढळून येतो, त्यामुळे पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान होते.
सध्या आढळणारी किड ही अंडी अवस्था, प्रथम अवस्थेतील अळी असल्यामुळे वेळीच उपाययोजना केल्यास कमी खर्चात किडींचे नियंत्रण होऊ शकते. सुरुवातीस लहान अळया कोवळी पाने, कळया व फुले कुरतडून खातात. शेवटी शेंगा लागताच अळया शेंगा कुरतडून त्यास छिद्र पाडतात व आपले डोके आत खूपसून दाणे खातात.
.
किड व्यवस्थापन:
- पुर्ण वाढ झालेल्या अळया वेचून त्यांचा नाश करावा.
- पक्षांना बसण्यासाठी हेक्टरी 50 ते 60 पक्षी थांबे शेतात लावावेत, जेणे करून त्यावर बसणारे पक्षी शेतातील अळया वेचून खातील.
- शेंगा पोखरणाया हिरव्या अळीसाठी पिक कळी अवस्थेत आल्यापासून हेक्टरी पाच कामगंध सापळे लावावेत जेणे करून किडीची आर्थिक नुकसानीची पातळी कळेल.
- तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे आणि पोत्यावर पडलेल्या अळया वेळोवेळी गोळा करून नष्ट कराव्यात. हरभरा पिक एक महिण्याचे झाल्यावर पिकापेक्षा अधिक उंचीचे टी (T) आकाराचे पन्नास पक्षी थांबे प्रति हेक्टर याप्रमाणात लावावेत.
- दोन अळ्या किंवा 5 टक्के शेंगाचे नुकसान प्रति मित्र ओळ किंवा आठ ते दहा पतंग प्रति कामगंध सापळ्यात सतत दोन ते तीन दिवस आढळल्यास ती आर्थिक नुकसानीची पातळी समजून खालील उपाययोजना कराव्यात.
- पिकास फुले येत असताना सुरुवातीच्या काळात 5 टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
- घाटेअळी लहान अवस्थेत असताना एच ए एन पी व्ही 250 एल.ई विषाणूची 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आणि त्यामध्ये राणीपाल (नीळ) 100 ग्रॅम टाकावा.
- जर किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीच्यावर आढळून आल्यास क्विनाॅफॉस 20 टक्के प्रवाही 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- तसेच अळींचा प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेंन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रॅनीलीप्रॉल 18.5 एसी 3 मिली किंवा लॅम्डासायलोथ्रीन 5 ईसी 10 मिली प्रति 10 लिटर मिसळून फवारणी करावी.
टिप: पावर स्प्रेसाठी (पेट्रोल पंप) किटकनाशकाचे प्रमाण तीनपट वापरावे. किटकनाशकाचा वापर आलटून पालटून गरज पडल्यास दहा दिवसाच्या अंतराने करावा.
सौजन्य :- कृषी विभाग महाराष्ट्र शासन