मराठवाड्यातील शेतकर्यांना दुष्काळाच्या झळा गत काही वर्षापासून भोगाव्या लागत आहेत. अशा परिस्थितीतही ज्याच्या विहीर, बोअलवेलला थोडेफार पाणी आहे, असे शेतकरी आपल्या शेतीत कमी कालावधीत येणार्या भाजीपाला पिकाची लागवड करून त्यापासून चांगले उत्पादन घेवू लागले आहेत. याच पैकी आमडापूर (ता.जि. परभणी) येथील युवा शेतकरी कृष्णा आश्रोबा गिराम आहेत. त्याने आपल्या शेतीत टोमॅटो, फूलकोबी, मिरची आदी भाजीपाला पिकाची लागवड करून भरघोस उत्पादन घेतले आहे. कोबी, टोमॅटो, मिरची विक्रीतून दररोज शाश्वत उत्पन्न मिळत आहे.
परभणी शहरापासून दक्षिण दिशेला ईटलापूर मार्गे 12 किलोमीटर अंतरावर आमडापूर हे गाव आहे. येथील युवा शेतकरी कृष्णा गिराम यांना वडिलोपार्जित साडेचार एकर जमीन आहे. या शिवारातील काही भागात जायकवाडी धरणाच्या कालव्याच्या यंदा काही पाणी पाळ्या मिळू लागल्याने शेतकरी गहू, हरबरा, ज्वारी, कापूस, ऊस, केळी यासह अन्य बागायती पीके घेत आहेत. कृष्णा यांच्या शेतीस मात्र कालव्याचे पाणी मिळत नाही. मात्र आजूबाजुचे शिवारं भिजत असल्याने मुरलेल्या पाण्याने त्यांच्या शेतीत असलेल्या विहीर, बोअरवेलच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे त्यांनी खरिपात दोन एकर फूलकोबी लागवड केली. आता रब्बी हंगामात एक एकर टोमॅटो व मिरचीची लागवड केली आहे. या पिकाचे उत्पादन मिळत आहे.
फूलकोबीचे उत्पादन
जुलै 2018 ला त्यांनी दोन एकर क्षेत्रात फूलकोबी पिकाची 4 बाय 2 फूटावर लागवड केली होती. योग्य व्यवस्थापनामुळे दोन एकरात 60 क्विंट्टल उत्पादन झाले. त्याच्या विक्रीतून 1 लाख 60 हजार रुपये मिळाले होते. उत्पादन खर्च 60 हजार रुपये वजा जाता 1 लाख रुपये निव्वळ आर्थिक उत्पन्न त्यांना मिळाले. हिरवी मिरचीचे देखील उत्पादन चालू असून आतापर्यंत 20 क्विंट्टल मिरचीपासून 50 हजार रुपये मिळाले आहेत.
टोमॅटो लागवड प्रयोग
गिराम यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये एक एकर जमिनीची औताच्या साह्याने नांगरटी व कुळवणी अशी मशागत करून घेतली. त्यावेळी 10 गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकले. यानंतर ठिबक आणि मल्चिंग पेपर आच्छादित केला. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बेडवर सव्वा फूट अंतर लांबीवर टोमॅटो रोपाची लागवड केली. लागवडीत एका एकराचे दोन भाग करून अर्ध्या एकरवर 15 दिवसाच्या फरकाने उशिरा लागवड केली. एका एकरात पाच हजार टोमॅटो रोपे लागली. टोमॅटो लागवडीचा हा त्यांचा पहिलाच प्रयोग आहे.
खताचे नियोजन
सुरवातीला अर्धा एकर लागवड केलेल्या प्लॉटसाठी रोपे लागवडीनंतर आठ दिवसाला 500 ग्रॅम ह्युमिक अॅसिड ठिबकद्वारे दिले. यानंतर 12 व्या दिवसाला 4 किलो 19ः19ः19 हे खत दर 2 दिवसा आड 6 वेळा ठिबकमधून पाण्यासोबत सोडले. तेथून पूढे 20 दिवसाला 5 किलो 13ः40ः13 दर 3 दिवसाआड 5 वेळा दिले. पीक55 दिवसाचे झाल्यानंतर 5 किलो 00ः52ः34 प्रति 3 दिवस आड करून 5 वेळेस दिले. 40 दिवसानंतर 1 किलो कॅल्शियम नायट्रेट, 200 गॅ्रम बोरान ठिकबद्वारे सोडले. पुढे 50 दिवसाला 2 किलो कॅल्शियम, 300 गॅ्रम बोरान व 60 व्या दिवशी 4 किलो कॅल्शियम, 300 ग्रॅम बोरान, 65 दिवसाचे पीक झाल्यावर 2 किलो 13ः00ः45 व 1 किलो सूक्ष्म अन्नद्रव्य दिले. याप्रमाणे पिकाच्या संगोपनासाठी खताची मात्रा दिली.
किडरोग नियंत्रण
टोमॅटो पिकावरील किडरोग नियंत्रणासाठी सुरवातीला 15 ग्रॅम एम-45 बुरशीनाशक, नागअळी व थ्रिप्स च्या नियंत्रणाकरीता दमणचे प्रति पंप 5 मिली 303 बायो हे औषध फवारणी केले. त्यानंतर 20 दिवसाचे पीक असताना प्रति पंप 5 गॅ्रम ईमेमेक्टीन बेन्झॉईट, व 10 ग्रॅम बुरशीनाशक फवारले. पुढे 30 दिवसाला पतंग किडीसाठी प्लॉट मध्ये 5 कामगंध सापळे लावले. 40 दिवसानंतर फुले लगडण्यासाठी 8 एमएल टाटा बहार, 20 ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्य, 10 मिली टॉनिक, 65 व्या दिवशी अळी नियंत्रणसाठी 6 मिली कोराजन, 80 दिवसानंतर करपा व भुरी रोग येवू नये म्हणून 10 ग्रॅम कॅब्रिओटॅब अशा औषधांच्या फवारण्या केल्या.
तोडणी, विक्री व्यवस्थापन
पीक 80 दिवसाचे झाल्यानंतर टोमॅटो परिपक्व होवून पिकू लागल्याने फळांची तोडणी सुरू झाली. दोन दिवसा आड टोमॅटोची तोडणी केली जाते. याकामी त्यांना त्यांची आई, वडील, पत्नी मदत करतात. टोमॅटोचा पहिला तोडा 414 किलो, दुसरा 750 किलो, तिसरा 1000 किलो, चौथा 1250 किलो, तर एकूण 3 हजार 414 किलो टोमॅटोचे उत्पादन झाले असून आणखी 400 क्रेट टोमॅटो उत्पादित होतील. शिवाय आता तोडणीस येणार्या अर्धा एकरमधील व चालू असलेल्या प्लॉट पासून टोमॅटोचे जवळपास 500 क्रेट म्हणजे अंदाजे वजनी 20 हजार 700 किलो टोमॅटो निघतील. सरासरी दर प्रति किलो 15 रुपये गृहित धरल्यास त्यापासून 3 लाख 10 हजार रुपये विक्रीतून येतील आणि त्यातून उत्पादन खर्च 70 हजार रुपये जाता अडीच लाख रुपयांपर्यंत नफा मिळण्याची शक्यता आहे. टोमॅटो परभणी व औरंगाबाद येथील भाजी मार्केट मध्ये नेवून विक्री करीत आहेत.
प्रतिक्रिया
भाजीपाला विक्रीतून शाश्वत उत्पन्न
टोमॅटो उत्पादनाचा हा माझा पहिलाच प्रयोग आहे. या आधी फूलकोबी, मिरची व इतर भाजीपाला उत्पादन घेतले आहे. मात्र यावर्षी लिमला येथील मित्र नंदकुमार कारले, परभणीचे कृषीपदवीधर मोहन ढोले यांच्या भाजीपाला व्यवस्थापन मार्गदर्शनामुळे टोमॅटो पीकाचा प्रयोग यशस्वी होत आहे. भाजीपाल्याच्या विक्रीतून दररोज आर्थिक उत्पन्न मिळू लागल्याने यातून शाश्वत शेती उत्पन्नाचा मुलमंत्र मिळला आहे.
कृष्णा आश्रोबा गिराम
रा. आमडापूर, ता.जि.परभणी.
मो.नं. 9834218187