भारतामध्ये पपईचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात होते. गेल्या दोन वर्षांपासून, महाराष्ट्रातील पपई उत्पादन कमी झाले आहे. बनावट रोपांच्या पुरवठ्यामुळे पपई उत्पादनात घट झाली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बनावट रोपे ओळखण्यासाठी शेतकर्यांनी दक्षता बाळगणे आवश्यक आहे.
मेक्सिको व मध्य अमेरिकेने पपईचे भौगोलिक निर्देशकत्व (जीआय) मिळवले आहे. कॅरिबियन व स्पॅनिश व्यापार्यांनी पपई सर्वप्रथम दक्षिण भारतात सादर केली. दक्षिण भारतातून पपईचा देशभर विस्तार झाला. सध्याच्या प्रचलित आकडेवारीनुसार देशात सरासरी सव्वालाख एकर क्षेत्रावर पपईची लागवड होते. त्यातील 40 हजार एकर क्षेत्र महाराष्ट्रात आहे. परिणामी पपई उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, जालना, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर व सातारा जिल्ह्यात पपईची सर्वाधिक लागवड होते.
उष्ण व समशितोष्ण वातावरणात पपईचे भरघोस उत्पादन घेता येते. यामुळे राज्याच्या कोरडवाहू क्षेत्रात पपईची लागवड होते. कोरडवाहू शेतकर्यांची संजिवनी असलेल्या पपईला सध्या बनावट रोपांचा विळखा बसला आहे. बनावट रोपांमुळे पपई उत्पादनावर परिणाम होतो आहे. बनावट रोपांची वाढ झाल्यानंतर होणारी फलधारणा निकृष्ठ दर्जाची असते. त्यामुळे पपई बियाणांची निर्मिती करणार्या नामांकित कंपन्यांना नुकसान व शेतकर्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विविध अॅप्समुळे शेतकर्यांना घरपोच बियाणे मिळतात. घरपोच मिळणारी बियाणे बनावट व ऩिकृष्ठ असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळेच येणार्या काळात बनावट बियाणे व रोपांपासून सावध राहण्यासाठी शेतकर्यांना दक्ष रहावे लागणार आहे. सध्या पपई रोपांची बनावट विक्री करणारी टोळी राज्यात सक्रीय झाली आहे. सरकारचे शेतकरी विरोधी धोरण, बदलते हवामान याच वरोबर बनावट बियाणे व रोपे याचा सामना शेतकर्यांना करावा लागतो आहे. पपईची लागवड करण्यापूर्वी गुणवत्ताक्षम रोपांची निवड शेतकर्यांना करावी लागते. रोपांची निर्मिती करणार्या अनेक रोपवाटिका शेतकर्यांची फसवणूक करतात. शेतकर्यांनी गुणवत्ताक्षम रोपांची खरेदी करणे ही काळाची गरज आहे.
पपईची रोपे खरेदी करताना घ्यावयाची काळजी
- पपई रोपांची निर्मिती करणारी रोपवाटिका अधिकृत असावी. रोपावाटिकेची सतत्या व विश्वासहार्ता यासाठी परवाना तपासावा. रोपे बनविण्यासाठी लागणारे सोर्स सर्टीफिकेट योग्य असल्याची खात्री करावी.
- रोपांची खरेदी करताना कंपनी किंवा रोपवाटिकेतील अधिकृत व्यक्तीकडूनच रोपांची खात्री करून रोपे घ्यावीत. रोपे घेताना त्याचे छायाछित्र घ्यावे.
- रोपांची खरेदी केल्यानंतर पक्के बील घ्यावे. बीलावर रोपांचा लॉट क्रमांक व व्हरायटीचे नाव याचा उल्लेख करण्याची सूचना संबधित व्यक्तीला द्यावी.
- वरील पैकी कोणत्याही मागणी संदर्भात विक्रेत्यांकडून टाळा टाळ करण्यात येत असेल तर, त्याची तक्रार पंचायत समितीच्या कृषी अधिकार्याकडे करावी.