अपघाताने आलेल्या अपंगत्वाचा बाऊ न करता शेती आणि शेतीपूरक व्यवसायांच्या माध्यामातून महिन्याला 1 लाख रुपये निव्वळ नफा कमविण्याची किमया जळगाव जिल्ह्यातील एका शेतकर्याने करून दाखविली आहे. निसर्ग, व्यापारी आणि प्रशासनासमोर हतबल ठरलेल्या शेतकर्यांसाठी हा आदर्श असल्याचे दिसते.
स्टोरी आऊटलाईन…
- ट्रक चालवताना आले अपंगत्व. पदरी आली बेरोजगारी.
- शेळीपालनाने मिळाली आयुष्याला उभारी.
- शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन, दुधव्यवसाय, औजारे भाड्याने द्यायला केली सुरुवात.
- वार्षिक 12 लाखाचा होऊ लागला नफा.
- स्वतःप्रमाणेच इतराना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी करतात प्रयत्न.
मालखेडा हे चोपडा (जळगाव) तालुक्यातील सुमारे 750 लोकसंख्या असलेले तापी काठावरील गाव. लिलाधर विश्वास पाटील हे येथील अल्पभूधारक शेतकरी. शिक्षण फक्त 10 पर्यन्त झालेले. वडिलोपार्जित फक्त 2 एकर शेती. शेतीच्या या लहानशा तुकड्यावर कुटुंबाचा भार पेलवेना म्हणून मग लीलाधर पाटील यांनी 1995 साली ड्रायव्हिंग व्यवसायाची निवड केली. चार-पाच वर्षे बरी गेली. वाहन चालविणे म्हणजे सतत अपघाताची भिती ठरलेली. नेमके तेच घडले. एका अपघातात डावा हात आणि पायाला जबर दुखापत झाल्याने अपंगत्व आले. पुढची दोन वर्षे मग बेरोजगारीत काढावी लागले. दुखावलेल्या हातापायामुळे ड्रायव्हिंग तर दूर पण शेतीत राबणेही अशक्य होऊन बसले. गावातल्यागावात करता येण्याजोगा पानटपरीचा व्यवसाय थाटला. पण त्यातून फारसा फायदा होत नसल्याने टपरीला टाळे लाऊन पुन्हा शेतीकडे वळले.
ड्रायव्हिंग झाली, पानटपरी झाली पण कमाईचा काही ताळमेळ बसेना. आता उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग शोधण्यापेक्षा आपल्याच शेतीत काही वेगळे करावे व त्यातूनच दोन पैसे मिळवावे हा विचार त्यांच्या मनात डोकावला. पण, तीच ती पारंपारिक झापडे काढून टाकायची हा निश्चय करूनच ते शेतीत उतरले. शेतीला आधुनिकतेची व पूरक व्यवसायाची जोड द्यायला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर 2002 साली गावातच पानटपरी सुरु करून अर्थाजन सुरु केले. परंतु या मधून हवा तसा नफा व प्रगती नसल्याने त्यांनी 2005 सालापासून वडील करत असलेल्या पारंपारिक शेतीमध्ये पूर्णवेळ काम करायला सुरुवात करून त्या शेतीला आधुनिकीकरणाच्या दिशेला नेले.
भाडेपट्ट्यावर शेती कसायाला केला प्रारंभ
स्वतः अल्पभूधारक असल्यामुळे त्यांनी इतर शेतकर्यांची 13 एकर जमीन भाडेतत्वावर घेत त्यामध्ये कापूस व केळी हि नगदी पिके घ्यायला सुरुवात केली. सिंचनाची सोय असल्याने हंगामी कलिंगड, पपई व भाजीपाल्याचे उत्पादन फायद्याचे ठरू लागले. आधुनिक शेतीची कास धरत ठिबक, मल्चिंग, आधुनिक ट्रॅक्टरचलित शेती अवजारे आपल्या शेतीसाठी उपलब्ध केली आहेत. सिंचनासाठी त्यांच्याकडे 2 कुपनलिका आहेत. यावर्षी 55 टन कलिंगडापासून त्यांनी 2.5 लाख रु निव्वळ उत्पन्न मिळविले. 3 एकरात लागवड केलेल्या कापसाचे 30 क्विंटल उत्पादन आल्याने त्यापासून दीड लाख रुपये मिळाले. तसेच केळी, गवार व इतर सर्व पिकांचे मिळून त्यांना 7 लाखापर्यंत निव्वळ नफा मिळाला.
संपूर्ण कुटुंब राबते शेतात
शेतातील सर्व कामामध्ये वडील, तीन भाऊ व परिवारातील सर्व सदस्य मदत करीत असल्याने मजुरांची गरज फारच कमी वेळा लागते. परिणामी मजुरीचा ताण पडत नाही. शेत व पूरक व्यवसायाचा वाढता व्याप लक्षात घेऊन त्यांनी कायमस्वरूपी 2 सालगडी कामाला लावले आहेत.
शेळीपालन
शेतीतस्थिर स्थावर झाल्यावर 2013 साली 40 हजार रुपयाच्या सावकारी कर्जातून सहा शेळ्या आणि एक बोकड विकत घेतला. कालांतराने 2015 मध्ये अपंग वित्त व विकास महामंडळाचे 1 लाख रुपयाचे कर्ज मंजूर झाले. त्यातून सावकारी कर्ज फेडले. उरलेले पैसे वर्ष-दीड वर्षात आले. शेळीपालनाच्या उत्पन्नातून गावालगत शेळ्यांसाठी निवारा शेड उभे केले. आज या गोठ्यात संगमनेरी व स्थानिक जातीच्या चाळीस शेळ्या आहेत. शेळ्यांवर येणार्या आजारांवर उपचार कसे करावे याचे तंत्र त्यांनी आत्मसात केले आहे. शेळीपालन व्यवसायापासून खर्च वजा जाता त्यांना वर्षीक 1लाख रुपये निव्वळ नफा मिळू लागला आहे.
दुग्धव्यवसाय
गावातच दुधडेअरी असल्याने 5 म्हशी व एक जातिवंत रेडा घेवून दुध व्यवसाय सुरु केला आहे. दररोज सरासरी 20 लीटर दूध हे 40 रु दराने विक्री होते. यापासून वर्षाकाठी 2 लाख रुपये निव्वळ नफा मिळत असून शेतीसाठी मोठ्या प्रमाणात शेणखत उपलब्ध होते. शेळीपालन व दुग्धोत्पादनाच्या जोडीला ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारे (पेरणीयंत्र, रोटा, नांगर ) भाड्याने देण्याचा व्यवसायही त्यांनी सुरु केला. जेव्हा ट्रॅक्टरला शेतात काम नसते तेव्हा प्रवासी वाहतूक करण्यासाठी क्रुझर गाडीचा व्यवसाय ते करतात. अशाप्रकारे ते यातून सुमारे 2 लाख रुपये कमवितात. आपल्या प्रत्येक व्यवसायासाठी त्यांनी घरातील एका सदस्यावर जबाबदारी सोपविली आहे. त्यासाठी त्यांना भाऊ शशिकांत व सोनू यांचे सहकार्य लाभते. 2005 सालापासून शेतीत उतरल्यापासून त्यांची आर्थिक प्रगती झाली असून जीवनमान उंचावले असून समाजात सन्मानाचे स्थान मिळाले आहे. 1999 पर्यंत ते भाड्याच्या घरामध्ये राहत आज त्यांचे स्वत:च्या मालकीचे दुमजली घर आहे.
समाजकार्य व पुरस्कार
शेती आणि शेतीपूरक व्यवसायात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा वेळोवेली गौरव करण्यात आला आहे. त्यांना राज्यस्तरीय पाच पुरस्कार मिळाले आहेत. सामाजिक बांधिलकी जोपासत मागच्याच वर्षी त्यांनी एका आदिवासी,विधवा वृद्ध, भूमिहीन इंदुबाई भिल या महिलेस 1शेळी भेट दिली. तसेच 2 दलित कुटुंबांना एकेक शेळी भेट दिली. हेतू हाकी या कुटुंबांची दुधाची गरज भागून उत्पन्नाचे साधन त्यांना मिळावे. शेती व शेतीपूरक व्यवसायात चांगले यश मिळवून त्यांनी स्वत:चे तर जीवनमान उंचावलेच शिवाय समाजऋण फेडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांचा विविध सामाजिक संस्थांनी पुरस्कार देवून गौरव केला आहे.
पुरस्कार
- 2016 – कृषीथॉन , नाशिक
- 2017 – कृषी सन्मान ,दूरदर्शन सह्याद्री
- 2017 – वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान , पुसद
- 2018 – कृषी क्रांती संगमनेर
- 2019 – कृषी सेवक साप्ताहिक पुरस्कार, रावेर