केदार बंधूचे प्रयोग, सहा एकरात 7 लाखाचे उत्पन्न
केदार बंधूंच्या शेतीची वैशिष्ट्ये
* नोकरी सांभाळूनही शेतीची जबाबदारी सांभाळली.
* सेंद्रिय पद्धतीवर दिला अधिक भर
* दुष्काळातही सातत्याने प्रयोगशीलता जपली
* सिंचन व्यवस्था बळकट केली
* पडीक जमिनीवर डाळिंब लागवडीचे नियोजन
नगर जिल्ह्यातील दुष्काळी असलेल्या पाथर्डी तालुक्याातील सैदापूर-हत्राळ (ता. पाथर्डी) शिवारात सुभाष आणि संजय या केदार बंधूंचे एकत्रित कुटुंब आहे. दोघे भाऊ नोकरी करतात. सुभाष जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागात वरिष्ठ सहायक, तर संजय हे रायगड जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक आहेत. सुभाष यांचा मुलगा सौरभ याने जैवतंत्रज्ञान विषयात बीएसस्सी चे शिक्षण घेतलेले आहे. केदार बंधूंची वडिलोपार्जित 42 एकर शेती आहे. अवर्षणग्रस्त या भागात शेतजमीन खडकाळ, सिंचनाचा अभाव असलेली होती. या परिसरात कापसू, बाजरी, ज्वारी, अशीच पारंपरिक पिके घेतली जातात. केदार परिवारही अशीच पिके घेत. प्रतिकूल परिस्थितीतही केदार बंधूंनी प्रयोगशीलता जपली.
दोन एकरात केळी उत्पादन
केदार परिवाराने वर्ष 2000 मध्ये दोन एकरांवर केळी उत्पादनाचा प्रयोग केला. तीस टन उत्पादनासह ते यशस्वीही झाले. नगरमधील व्यापार्यांना विक्री केली. तीस टन केळीचे उत्पादन निघाले. त्यांनी सन 1996-97 मध्ये तीन एकरांत तैवान पपईची लागवड केली. पाथर्डी, बीड, शेवगाव भागांतील बाजारात नगावर विक्री केली. मोठ्या फळाला डझनाला तीस ते चाळीस रुपये तर लहान नगाला वीस ते तीस रुपयेपर्यंत दर मिळवला. या भागातील हा पहिलाच प्रयोग होता. त्यांनी 2013 मध्ये सहा एकरांवर एरंडी घेण्याचाही या भागातील पहिलाच प्रयोग केला. त्यामुळे केदार परिवार या भागात प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जात आहेत.
गाळ टाकून आंबा लागवड
केदार बंधूंना फळपिकांतून यश मिळाले. पण, पाण्याची व मजूरांची मोठी समस्या होती. यावर उपाय म्हणून अखेर पीक पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कुटूंबातील सर्वांच्या संमतीने नियोजन करून 2006 मध्ये आंबा लागवड करण्याचे ठरवले. त्यासाठी सहा एकर क्षेत्र निवडले. जमीन खडकाळ असल्याने त्यात तलावातील माती आणून टाकली व लागवड केली. खते, पाणी आणि अन्य नियोजनातून उत्पादनात वाढ केली. आज मितीला त्यांच्याकडे सहा एकर क्षेत्रात 320 केशर, 15 तोतापुरी, 60 हापुस, 15 सदाबहार झाडे आहेत. सदाहबार हे कायम उत्पादन देणारा, लोणच्यासाठीच्या उपयोगीचा आंबा आहे. आंब्याचे दोन वर्षांनंतर पहिले पीक हाती आले. सुमारे 30 ते 35 झाडांमधून पहिल्या वर्षी केवळ तीन क्विंटल उत्पादन मिळाले. जागेवर शंभर रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली. दुसर्या वर्षी 40 झाडांमधून पाच क्विंटल उत्पादन निघाले. हळूहळू उत्पादनक्षम झाडांची संख्या वाढू लागली. तसे उत्पादन वाढू लागले. गेल्यावर्षी 250 ते 300 झाडांपासून एकूण सहा टनांपर्यंत उत्पादन मिळाले. आंब्याचा दर्जा, स्वाद दर्जेदार असल्याने मागणीही चांगली राहिली. केशर व हापूसला आत्तापर्यंत 70 ते 90 रुपये प्रतिकिलो असेच दर राहिले. यंदा मात्र दुष्काळाचा फटका बसला.
आंबा बागेत आंतरपीक
आंब्याच्या नव्या बागेत पहिली दोन वर्षे आंतरपिके घेतली. त्यात पहिल्या वर्षी मटकी व त्यानंतर दुधी भोपळ्याची लागवड केली. तिसगाव, पाथर्डी, शेवगाव बाजारात हातविक्री केली. दोन्ही पिकांमुळे आर्थिक हातभार चांगला लागला.
विहिरीच्या पाण्याचा आधार
पाथर्डी तालुक्याातील बहुतांश भागात पाणीटंचाई सातत्याने असते. दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांना रोजगार मिळण्यासाठी झालेल्या पाझर तलावाचा सैदापूर-सात्रळसह परिसराला आधार आहे. केदार यांची एक विहीर तलावानजीक आहे. शिवाय अन्य एक विहीर आहे. त्यातून उपलब्ध होणार्या पाण्याचे नियोजन करून ते शेतीला देतात. तीन किलोमीटर अंतरावरून पाणी आणले आहे. शिवाय केदार यांनी 2011 मध्ये पन्नास लाख लिटर क्षमतेचे शेततळे बांधले आहे. 2013 -14 मध्ये दुष्काळाने पाथर्डी तालुक्यातील बहुतांश डाळिंब, आंबा व अन्य बागा वाया गेल्या. परंतु, शेततळे असल्याने त्याच्या जोरावर दुष्काळात सहा एकर आंब्यांची बाग केदार यांना जगवता आली. यंदाही विकतच्या पाण्यावर झाडे जगवावी लागली असली तरी शेततळ्याचा काही प्रमाणात आधार मिळाला. वर्ष 2000 पासून शेतीत ठिबकचा वापर सुरू केला. केळी, पपईला त्याचा उपयोग झालाच. शिवाय सध्या सहा एकर क्षेत्रालाही तो होतो आहे. ठिबकमुळे अल्प पाण्यावर दुष्काळात झाडे जगवता आली. हळूहळू जास्तीत जास्त क्षेत्र ठिबकखाली आणण्याचा त्यांचा मानस आहे.
सेंद्रिय शेतीवर भर
आंबा बागेत सुरवातीला रासायनिक खतांचा वापर व्हायचा. मात्र, अलीकडील काही वर्षांत जैविक खत व सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. प्रतिझाडाला चार किलो जैविक, तर दोन किलो शेणखत वर्षातून एकदा दिले. गरजेनुसार शेणखत विकत आणले जाते. सेंद्रिय पद्धतीच्या वापरामुळे आंब्याची गुणवत्ता, स्वाद, तसेच टिकवण क्षमताही वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांकडूनही मागणी वाढली आहे. काही वर्षांपूर्वी शेणखतावर भर देत केळीचे पीकही यशस्वी केले होते. अन्य पिकांत बाजरी, तूर, कापूस आदींचा समावेश आहे.
अवर्षणग्रस्त भागात शेतीसाठी शर्थीचे प्रयत्न
पाथर्डी तालुक्यात कायम दुष्काळ आहे. हा भाग अवर्षणग्रस्त असूनही शर्थीचे प्रयत्न केल्याने शेतीतून चांगले उत्पन्न मिळत आहे. दर्जेदार उत्पादन घेतल्याने त्याला बाजारपेठ मिळाजली आहे. येत्या काळात कृषी पर्यटन केंद्र उभारण्याचे नियोजन आहे.
– सुभाष केदार
मो.नं.9421822426